हल्लीच्या पिढीत विदेशातील शिक्षणाचे आकर्षण अनेकांना आहे. काहींना मूळ शिक्षणाची आवड म्हणून तर काहींना वाटते की, विदेश शिक्षण म्हणजे नंतरच्या नोकरीची पुरेपूर हमी!
सातासमुद्रापलीकडे शिक्षण म्हणजे युरोप- अमेरिकेत शिक्षण असेच समीकरण आपल्याकडे वर्षानुवर्षे होते. आता ऑस्ट्रेलिया, रशिया आणि चीन- जपान आदी पौर्वात्य देशामध्येही विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. जमाना बदलला आहे. पूर्वी विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांमध्ये मुलांची संख्या अधिक होती आणि आता मुलीही त्यात मागे राहिलेल्या नाहीत. मात्र अनेकदा विदेशातील शिक्षणाचा खर्च फार मोठा असल्याने अपवाद वगळता मुलींना परदेशी शिक्षणासाठी पाठवण्यास पालक धजावत नाहीत. मात्र आता त्याची काळजी करण्याची गरज नाही, कारण महाराष्ट्र शासनामार्फत परदेशातील उच्च शिक्षणासाठी खुल्या संवर्गातील उमेदवारांनाही शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय जाहीर झाला आहे.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे शिष्यवृत्तीसाठी निवड करताना ३० टक्के जागांवर मुलींना प्राधान्य दिले जाणार आहे. जागतिक क्रमवारीतील पहिल्या २०० शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल. ही क्रमवारी टाइम्स हायर एज्युकेशन (THE) किंवा क्वॅकक्वारेल्ली सायमंडस (QS) या दोनपैकी कोणत्याही एका संस्थेने निर्धारित केलेली असावी, अशी अट आहे.
या शिष्यवृत्तीअंतर्गत पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी १० आणि पीएचडीसाठी निवड झालेल्या उमदेवारांसाठी १० अशा एकूण २० शिष्यवृत्ती आहेत. या शिष्यवृत्ती कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, विधि, अभियांत्रिकी/ वास्तुकला आणि औषधनिर्माण शास्त्र या विषयांच्या अभ्यासासाठी दिल्या जातात. अभियांत्रिकी आणि वास्तुकला शास्त्र अभ्यासक्रमासाठी चार शिष्यवृत्ती असून इतर सर्व विषयांसाठी प्रत्येकी एक शिष्यवृत्ती आहे.
या शिष्यवृत्तीमध्ये संबंधित मुलीला प्रवेश मिळालेल्या अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्काचा समावेश आहे. ही रक्कम तंत्रशिक्षण विभागामार्फत संबंधित संस्थेला थेट अदा केली जाते. (परदेशातील शिक्षण संस्था किंवा विद्यापीठाच्या प्रवेशपत्रात नमूद शैक्षणिक शुल्कात भविष्यात काही कारणास्तव वाढ झाल्यास वाढीव रक्कम देण्याचीही तरतूद आहे. मात्र त्यासाठी संबंधित देशातील भारतीय उच्चायुक्तांची शिफारस आवश्यक आहे) या मुलींचा परदेशातील कालावधीसाठीचा निर्वाह भत्ता, परदेशातील त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. त्यासाठी भारतात राष्ट्रीयकृत बँकेत आणि परदेशात प्राधिकृत बँकेत खाते उघडणे बंधनकारक आहे. याच खात्यावर शिष्यवृत्ती डिजिटली अदा केली जाते. ही रक्कम संबंधित संस्थेने ठरवलेली अथवा शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे असते.
प्रवेश घेण्यासाठी जाताना व अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर भारतात परत येण्यासाठी विमानाचा खर्च (इकॉनॉमी क्लास) देण्यात येतो. परदेशातील कालावधीत संबंधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिल्यानुसार वैयक्तिक आरोग्य विमा काढावा लागतो. त्यासाठीचा खर्च शासन देते.
हा लाभ मिळण्यासाठी परदेशी शिक्षण संस्थेतील प्रत्येक सत्राची परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असून त्यासाठी संबंधित शिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका आणि प्रगती अहवाल सहा महिन्यातून एकदा शासनास सादर करावा लागतो.
अभ्यासक्रमांचे विषय
अभियांत्रिकी शाखेमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल, प्रॉडक्शन, इंडस्ट्रिअल, एन्व्हारोन्मेंटल, पेट्रोकेमिकल, मायनिंग, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिक्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ इन्फॉर्मेशन सिस्टिम/ इन्फॉर्मेशन सायंस/ कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक इंजिनीअरिंग, नॅनो टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री इंटरनेट ऑफ थिंग्ज, सायबर लॉ/सायबर सिक्युरिटी, बायोमेडिकल इंजिनीअरिंग, क्लायमेट चेंज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आर्किटेक्चर अशा २१ विषयांचा सध्या समावेश आहे.
व्यवस्थापन शाखेत एमबीए (फायनान्स, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स, सिस्टिम ॲनॅलिसिस) आणि हॉटेल मॅनेजमेंट या विषयांचा समावेश आहे.
विज्ञान शाखेत- कृषी, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, सामान्य विज्ञान, पशुवैद्यकीय, उद्यानविद्याशास्त्र या विषयांमध्ये शिष्यवृत्ती मिळू शकते. (या शिष्यवृत्ती अंतर्गत विज्ञान/अभियांत्रिकी शाखेतील विषय ढोबळ मानाने ठरवण्यात आले असले तरी सध्याच्या काळातील नव्या भविष्यवेधी विषयांचा सुध्दा विचार केला जाऊ शकतो. या विषयांमध्ये ॲटमॉस्फेरिक सायन्स, ॲडॅप्टेशन ॲण्ड मिटिगेशन ऑफ क्लायमेंट चेंज, ऑटोमेशन ॲण्ड आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, रिन्युएबल एनर्जी, एनर्जी एफिशिअन्सी टेक्निक्स, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, बेसिक ॲनॅलिटिक्स आदींचा समावेश आहे.)
कला आणि वाणिज्य शाखेमध्ये समाजशास्त्र, मानसशास्त्र, तत्वज्ञान, अर्थशास्त्र आणि वाणिज्य विषयांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर पदवी किवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांसाठी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून पदवी आणि पीएचडी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलींनी पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
(या शिष्यवृत्तीच्या अटी आणि शर्ती पुढील लेखात…)