माझ्या चित्रपट कारकिर्दीला नुकतीच १० वर्षे पूर्ण झालीत. २०१२ मध्ये आयुष्मान खुराणासोबत माझ्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्या माझ्या पहिल्या चित्रपटाचे नाव होते, ‘विकी डोनर’. त्यानंतर ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’, ‘दसवी’, ‘बाला’ हे माझे चित्रपट विशेष गाजले. आज १० वर्षांनंतरही मी या चित्रपट क्षेत्रात टिकले आहे, तेही माझ्या तत्वांवर. कपडे आणि भूमिका या बाबत मी कधीच तडजोड केली नाही तरीही माझ्याकडे चांगल्या भूमिका येत आहेत याचा मला आनंदच आहे. त्यातलाच एक म्हणजे सध्या ‘झी फाईव्ह’ वर रिलीज झालेला ‘द लॉस्ट’ हा चित्रपट. त्याला उत्तम चित्रपट असे रिव्ह्यूज मिळत आहेत.
अमिताभ बच्चन, तापसी पन्नू मुख्य भूमिकेत असलेल्या ‘पिंक’ या चित्रपटाला खूप प्रशंसा लाभली. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी यांनीच ‘द लॉस्ट’ दिग्दर्शित केला असून ज्येष्ठ कलाकार पंकज कपूर यांनी माझ्या आजोबांची भूमिका केली आहे. राहुल खन्ना, निल भूपालन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. माझी भूमिका क्राईम रिपोर्टर विधी सहानी या युवतीची असून ती अचानक गायब झालेल्या ‘थिएटर अॅक्टिव्हिस्ट’ ईशान भारती (तुषार पांडे) याच्या शोधात आहे. मात्र या कथेला अनेक आवरणं आहेत. ‘लॉस्ट’चे चित्रीकरण आम्ही २०२१च्या करोना काळात पूर्ण केले. फार होमवर्क करायला वेळ मिळाला नाही, पण अनिरुद्ध रॉय चौधरी यांना माझ्या अभिनयात सहजता हवी होती. त्यांच्या निर्देशानुसार मी विधी सहानी ही साहसी, खंबीर पत्रकार रंगवली आहे. सध्या या भूमिकेचे समीक्षकांकडून कौतुक होतंय, याचा मला आनंद वाटतोय.
आणखी वाचा : जातिभेदाविरोधात अमेरिकेत लढा देणाऱ्या क्षमा सावंत आहेत तरी कोण?
माझ्या वडिलांनी काही पंजाबी फिल्म्स दिग्दर्शित केलेल्या असल्याने मला चित्रपट क्षेत्राची माहिती आहे. या क्षेत्रात प्रवेश करताना मी माझी भूमिका पक्की केली होती. एका ठराविक मर्यादेत काम करायचं, कुठे थांबायचं हे मला पक्कं ठाऊक असल्याने मी माझ्या भूमिका त्याच तत्वावर साकारल्या. माझ्यात असलेल्या मध्यमवर्गीय मूल्यांचा मला सार्थ अभिमान आहे. ‘अगर कोई बड़ी फिल्म का हिस्सा मैं अपने उसूलों के कारण नहीं बन पायी, तो मुझे कोई अफ़सोस नहीं होता। ऐसी कई फिल्में मैंने छोड़ दी है। मेरे कई ज्युनियर -कन्टेम्पररी आर्टीस्ट बड़ी फिल्में, ज्यादा फिल्में करने के मामले में मुझसे आगे निकल गए, लेकिन मुझे उसका कोई अफ़सोस नहीं, ना कभी होगा। जोपर्यंत एखादी भूमिका करणे माझ्या अंतर्मनाला ग्वाही देत नाही तोपर्यंत त्या भूमिकेला होकार देणे मला जमलेले नाही. मनाला आनंद देणाऱ्या भूमिका करायच्या आहेत, बिग बॅनर, तगडे मानधन, नामांकित स्टारची नायिका असणे या बाबी माझ्यासाठी महत्वाच्या नाहीत. मी पोषाखाबाबत, भूमिकेबाबत ‘कम्फर्टेबल’ असणे माझ्यासाठी अतिशय महत्वाचे आहे, माझा प्रवास तसाच घडला आहे. आणि आज १० वर्षांनंतरही माझ्याकडे उत्तम भूमिका येताहेत याचं समाधान आहे. अर्थात कभी खुद्द को हारा हुआ भी महसूस किया, पण जिद्द, चिकाटी कायम राहिलेत माझ्यासोबत. कसल्याही तडजोडी न करता बॉलिवूडमध्ये १० वर्षे टिकून राहणे सोपे नव्हते, नाही… पण मी टिकले, तेही माझ्या तत्वांसह!
आणखी वाचा : चॉइस तर आपलाच : मुलांच्या मनात शिरायचं कसं?
४ जून २०२१ रोजी माझे लग्न ‘उरी-द सर्जिकल’ चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांच्याशी साधेपणाने पार पडले. ‘उरी…’ करताना लक्षात आले, की दिग्दर्शक आदित्य धर यांच्याशी माझे विचार जुळतात. आमची विचारसरणी, राहणीमान, कौटुंबिक मूल्ये यात समानता जाणवली आणि आम्ही दोघांनी कुटुंबाच्या साथीने लग्न केले. आदित्य मूळचे काश्मीरचे तर मी हिमाचल प्रदेशातील, बिलासपूर येथील. अर्थात माझ्या वडिलांचे पोस्टिंग चंदिगढचे असल्याने माझे शिक्षण चंदीगढला झाले. माझे वडील मुकेश गौतम -पंजाबी ‘पीटीसी चॅनल’चे व्हाइस प्रेसिडेंट तर आई अंजली गौतम गृहिणी. माझ्या आईला ऑरगेनिक फार्मिंगची खूप आवड होती, पण मी, माझी बहीण आणि भाऊ या तीन मुलांच्या संगोपनात त्यावेळी ते करणे तिला शक्य झाले नाही. आता मी, माझे पूर्ण कुटूंब, नवरा आदित्य सगळे मिळून ऑर्गेनिक फार्मिंग आवर्जून करतो. कीटकनाशके कुठली वापरावीत, ती हानिकारक असू नयेत म्हणून आम्ही ती देखील घरी तयार करतो, त्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण आईने घेतले आहे. फार बारीक-सारीक अभ्यास करून आमचे सेंद्रिय शेतीचे प्रयोग चालत आहेत, आमच्या घरी देखील आम्ही हेच अन्नधान्य,भाज्या, दूध दुभते वापरतो. लवकरच हा सेंद्रिय शेतीचा प्रयोग आम्ही अधिक मोठया प्रमाणावर व्यावसायिक पद्धतीने करणार आहोत. विशेष म्हणजे आदित्य देखील त्यांना वेळ मिळेल तेंव्हा आमच्या या फॅमिली फार्मिंगमध्ये मनापासून रस घेताहेत.
आणखी वाचा : ‘ती’ची यशोगाथा : डाऊन सिंड्रोम व्याधीग्रस्त महिलेने नकार पचवून उभारला स्वतंत्र यशस्वी व्यवसाय!
अलीकडच्या काळात अनेक अभिनेत्री विवाहित झाल्या आहेत. अनुष्का शर्मा, सोनम कपूर, करीना कपूर यातर आई देखील आहेत. त्यामुळे विवाह हा अभिनेत्रींच्या कारकिर्दीत अडचण आहे, असं मला अजिबातच वाटत नाही. उलट लग्नानंतर माझ्याकडे उत्तम स्क्रिप्ट्स येताहेत ही वस्तुस्थिती आहे. आदित्यने लिहिलेल्या ‘धुमधाम ’फिल्ममधे मी आहे, ज्याचा नायक प्रतीक गांधी असून हा चित्रपट मे महिन्यात रिलीज होईल. दरवर्षी प्रमाणे यंदाही आपण ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतो आहोत. मला असं वाटतं, शहरात राहणाऱ्या स्त्रियांपेक्षा खेड्यात राहणाऱ्या स्त्रियांना महिला दिनाची व्याप्ती, त्याचा खरा अर्थ समजला पाहिजे. आजही आयुष्यभर घर सांभाळणारी स्त्री जेव्हा ‘फक्त गृहिणी ’म्हणून नकळत हिणवली जाते तेव्हा मी दुखावली जाते. अपार कष्ट करून कुटुंबाची सगळी व्यवस्था सांभाळणाऱ्या स्त्रीला आपल्या समाजव्यवस्थेत मान असू नये याचा मला खेद वाटतो. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची शत्रू नाही तर मित्र असावी. एका स्त्रीचा विजय साजरा करण्यासाठी अन्य स्त्रियांनी पुढे यावे, स्त्रियांनी एकमेकींना मदत केली , तिला प्रोत्साहन दिलं तर तो खरा महिला दिन असेल.
महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा…