आराधना जोशी
‘शाळेतल्या मुलांनी भाकरी थापून केली शैक्षणिक क्रांती’ अशी बातमी दोन वर्षांपूर्वी आपण सगळ्यांनीच पाहिली ऐकली असेल. शाळेतल्या मुलांनी अगदी एखाद्या सुगरणीने बनवावी अशा भाकरी कॅमेरासमोर करून दाखवल्या. अडीअडचणीच्या वेळी, घरात कोणी नसताना आपलं पोट भरण्याइतका तरी स्वयंपाक यावा हा यामागचा उद्देश होता. लिंग समानतेच्या आपण कितीही गोष्टी केल्या तरी आजही अनेक घरांमधून मुलांनी स्वयंपाक करणं याला विरोधच होताना दिसतो. ते काम मुलींचं किंवा घरातील बाईचं अशी मानसिकता अनेक घरांमधून आजही बघायला मिळते.
कौतुक करावं का?
मुलं लहानपणापासून स्वयंपाकघरात आईलाच बहुतेकदा बघत असतात. आईही मुलींना घरातली कामे सांगते. स्वयंपाकात मदत करायला सांगते. मुलांना मात्र यापासून दूरच ठेवलं जातं. मुलांनाही स्वयंपाक करता येणं यात कमीपणा वाटतो. साधा चहा करणं, वरणभाताचा कुकर लावणंही माझ्या मुलाला जमत नाही, यायचं जाहीर कौतुक होतं. मात्र शिक्षणासाठी, नोकरीनिमित्त घरापासून लांब राहायला लागल्यानंतर याच मुलांचे जेवणाचे हाल सुरू होतात. मेसमध्ये मिळणाऱ्या जेवणाला घरच्या जेवणाची सर येऊ शकत नाही. यासाठीच मुलांनाही बेसिक स्वयंपाक करता येणे ही आजची गरज बनली आहे आणि त्यासाठी आता सुरू होणाऱ्या उन्हाळी सुट्टीचा छान उपयोग करून घेता येईल.
किचन ही प्रयोगशाळाच, कसा कराल वापर?
सुट्ट्या लागल्यावर मुलं घरी त्रास देतात. त्यांना सारखं खेळायचं असतं. खायला चटकदार नवनवीन पदार्थ हवे असतात. मुलांना गुंतवण्यासाठी अनेक शिबिरांचा शोध घेतला जातो. मात्र पालकांनीच जर असं शिबीर आयोजित केलं की, जिथे सोपे सोपे छोटे खाद्यपदार्थ करायची मुलांना संधी मिळेल तर मुलं त्यातून बेसिक कुकिंगचं जीवनकौशल्य शिकतील. याची सुरूवात गॅसचा उपयोग न करता करता येणारे पदार्थ (कुकिंग विदाउट फायर) किंवा त्यांना आवडणारे आणि चटकन तयार होणारे पदार्थ यांनी करता येऊ शकेल.
जीवन जगण्यासाठी जी कौशल्यं लागतात त्यातलं हे वरवर साधं दिसणारं पण शरीराला आणि मनाला शांतवणारं असं कौशल्य आहे. आपल्या मुलांना वाढवताना कुटुंबात स्वयंपाकघर हेही एक संस्कार देणारं असतं हे लक्षात ठेवायला हवं. प्रत्यक्ष स्वयंपाक करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींही तितक्याच महत्वाच्या असतात आणि स्वयंपाकाची तयारी करणंही खूप गरजेचं असतं याचं भान मुलांना यातून येत जातं.
स्वयंपाक करण्याआधी चिरणं, निवडणं, भाज्या धुवून घेणं, भाजणं, शिजवणं, फोडणी घालणं, वाटण करणं, तळणं अशी कितीतरी वेगवेगळी कौशल्यं शिकता येतात. मसाले कसे घालायचे असतात, किती घालायचे असतात, तसंच तिखटमिठाचं प्रमाण अशा कितीतरी गोष्टी समजायला लागतात. कोणती कडधान्य कितीवेळ भिजवायची? कोणत्या कडधान्यांना लगेच मोड येतात? कोणाला जास्त वेळ लागतो? यासारख्या गोष्टी मुलांना आवर्जून शिकवा. यामुळे मॅगी आणि चहा करता येतो म्हणजे आपल्याला स्वयंपाक येतो या मुलांच्या मनात असणारा गैरसमज दूर होतो. कुकर कसा लावायचा, कोणती डाळ त्यासाठी घ्यायची? डाळ – तांदूळ कसे धुवायचे? कितीवेळ पाण्यात भिजवून ठेवायचे? त्यामुळे या पदार्थांमध्ये काय बदल होतो? असे कितीतरी प्रयोग मुलांना घरच्या घरी शिकवता येतात. आपलं स्यंपाकघर म्हणजे एक प्रयोगशाळाच असते. त्यामागचं विज्ञान मुलांनाही समजावून सांगितलं तर त्यांनाही मजा वाटते. स्वयंपाकघरातले क्षण पदार्थांची चव घेण्याचे, वेगवेळ्या भांड्यांशी खेळण्याचे, गहू, तेल, तूप, डाळी, भाज्या, हिंग, जिरे, मोहरी, दही यांच्याशी मैत्री जुळवण्याचे असतात.
स्वयंपाक करणं ही एक मोठी जबाबदारी आहे. जेव्हा चवदार, ताजं, गरम अन्न पोटात जातं तेव्हा आत्मा तृप्त होतो. पोट भरतं आणि पोट भरलं की, भणभणणारं डोकं शांत होतं. या गोष्टी मुलांना कळतात. आरोग्याला उपकारक पदार्थ मुलं स्वत: तयार करायला लागतात. त्यांच्या निर्मितीक्षमतेलाही चालना मिळते. यातून मुलं स्वत: पुढाकार घ्यायला, जबाबदारी पूर्ण करायला शिकतात. बाहेरच्या आणि घरातल्या खाण्यासाठी आपण किती खर्च करतो, यांचं भानही त्यांना येतं. रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या एका पदार्थाच्या किंमतीत घरीच आपण पूर्ण जेवण कसं बनवू शकतो याची जाणीव मुलांना व्हायला लागते. अभ्यासाबरोबरच स्वयंपाक करण्याचा आणि दुसऱ्याला खाऊ घालण्याचा आनंद काही औरच असतो हे त्यांना समजायला लागतं. चवीपुरत्या मीठाबरोबरच आनंदी मनाने केलेला स्वयंपाक शंभर टक्के चविष्ट बनतो याचा अनुभव मुलांनाही येऊ लागतो.
हे ही वाचा<< लग्नात Moye Moye गाणं ते बायकोच्या ताटाखालचं मांजर बनणं? Wife jokes खरंच विनोदी आहेत का?
फक्त जेवण नाही पण ‘हे’ ही शिकवा..
स्वयंपाक झाल्यानंतर काउंटर आणि स्वयंपाकघर स्वच्छ करणंदेखील खूप महत्वाचं असतं. स्वच्छता ही स्वयंपाकाइतकीच महत्त्वाची आणि मजेदार असू शकते हे सुद्धा मुलांना शिकवा. जेवण झाल्यावर पालक मुलांना बरोबर घेऊन स्वयंपाकघर आवरण्याचं काम करू शकता. याशिवाय जेवणं झाल्यावर उरलेल्या अन्नाचं नेमकं काय करायचं, छोट्या भांड्यांमधून अन्न काढून ते फ्रीजमध्ये कसं ठेवायचं? याचंही शिक्षण नकळतपणे मुलांना मिळालं तर अन्नाची नासाडी होण्याचं प्रमाण बंद होईल. मुलांनी स्वयंपाकघरात घाम गाळत काही वेळ उभं राहून पदार्थ तयार केले तर त्याची किंमत आपसूकच त्याला समजायला लागतं. चौसष्ट कलांपैकी पाककला ही एक उच्च दर्जाची कला आहे. मुलांनाही सहभागी करून घेऊन या कलेची त्यांना ओळख करून दिली तर अन्नपूर्णेचा त्यांच्यावरही वरदहस्त राहील हे नक्की!