गेली ३-४ वर्षे सातत्यानं मराठी आणि हिंदी मालिकेत चमकणारा आकर्षक चेहरा म्हणजे शिवानी सुर्वे. अनेक वर्षे संघर्ष, धडपड करूही जे यश अनेकांच्या वाट्याला येत नाही ते शिवानीला अल्पावधित मिळालं. घरातून अभिनयाचं कुठलंही बाळकडू मिळालं नसताना तिला लाभलेलं हे यश लक्षवेधी ठरतं. शिवानीचा एक महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपट ‘वाळवी’ १३ जानेवारीला रिलीज होत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिच्या भूमिकेने वाहवा मिळवली आहे. चाकोरीबाहेरील विषयावरील अत्यंत संवेदनशील, तरल कथा, कलाकारांचा तितकाच संयत अभिनय यासाठी या चित्रपटाचं कौतुक होतंय. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक परेश मोकाशी यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते यांच्या मुख्य भूमिका आहेत.
हेही वाचा- अहंकार… मोह आणि सुखी संसाराचे स्वप्नभंग
शिवानी या चित्रपटाविषयी सांगते, ‘‘ माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला ‘वाळवी’ हा चित्रपट १३ जानेवारीला रिलीज होतोय. दिग्दर्शक परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, सुबोध भावे असे बिनीच्या कलावंत आणि दिग्दर्शकासोबत काम करणं माझ्यासाठी स्वप्नवत होतं. माझ्या बकेट लिस्टमध्ये परेश मोकाशी हे नाव अग्रस्थानी होतंच, पण प्रत्यक्षात ही संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. परेश मोकाशी म्हणजे दर्जेदार कलाकृती हे जणू समीकरणच दृढ झालं आहे. एक दिवस मला एका व्यक्तीचा फोन आला, ती व्यक्ती म्हणाली की. ‘तू परेश मोकाशी यांना जाऊन भेट. त्यांच्या नव्या फिल्ममधे ते तुला घेऊ इच्छितात.’ या फोनने मला सुखद धक्काच दिला, पण पुढच्याच क्षणी मी भानावर आले ! कारण आमचा एक मित्र आवाज बदलतो आणि ‘सरप्राईझ’ देण्यासाठी असे फोन करतो ! मी विचार केला, मला परेश मोकाशींकडून कसा फोन येईल? हे काम आमच्या त्या मित्राचंच असावं असं म्हणत मी या फोनकडे दुर्लक्ष केलं. पुन्हा त्याच नंबरवरून फोन आला, तो मी कट केला… पुन्हा फोन आला. तर ती व्यक्ती सांगत होती, ‘दिग्दर्शक परेश मोकाशी त्यांच्या आगामी फिल्मसाठी तुम्हाला भेटू इच्छितात. त्यांच्या घरचा पत्ता हा हा आहे – उद्या त्यांना भेटा.’
या फोन नंतर मी अस्वस्थ झाले. खरंच का मला ते एखादी भूमिका देतील ? कोणती भूमिका असेल ? अशा अनेक प्रश्नांनी माझ्या मनात काहूर माजलं. त्यांच्याशी बोलताना मी कुठेही कमी पडता कामा नये, त्यांच्या सिनेमांचा अभ्यास असला पाहिजे म्हणून मग त्या १६ तासांत त्यांचे सर्व चित्रपट पुन्हा एकदा पाहिले. मी होमवर्क करून सज्ज होते. रात्री जराही डोळा लागला नाही. मी त्यांना भेटले तेव्हा माझं खूप छान स्वागत केलं. हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. परेश सरांसोबत त्यांच्या पत्नीही होत्या. आम्ही सगळे त्यांच्या नव्या सिनेमाविषयी (वाळवी ) सविस्तर बोललो. स्क्रिप्टवर चर्चा झाली. मला मध्यवर्ती भूमिका करायला मिळणार होती म्हणून मी मनोमन सुखावले होते. मी आत्मविश्वासानं त्यांना म्हटलं, ‘येस, ही भूमिका मी मनापासून करेन.’
दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्याशी झालेली ती पहिली भेट आणि त्याबाबतचा किस्सा सांगतानाही तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ती घटना २०१९ मधली होती. अभिनय क्षेत्रात ती फारशी स्थिरावली नव्हती. ‘वाळवी’ सिनेमाचे शिवधनुष्य- तेही परेश मोकांशींसारख्या दिग्दर्शकासोबत पेलायचं हे मोठं आव्हान होतं. तिच्यासह चित्रपटात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते यांसारखे कसलेले नामांकित कलाकार असणं हे तिच्यासाठी चॅलेंजिंग होतं.
शिवानी पुढे म्हणाली, ‘वाळवी’ हा माझा दुसरा चित्रपट होता, सिनेमा हे माध्यम माझ्यासाठी तसं नवीनच होतं. या माध्यमात काम करताना मी कुठेही कमी पडेन का, याविषयी साशंक होते.
हेही वाचा- चॉइस तर आपलाच : अपेक्षांचा ताण
चित्रपट सुरू होण्यापूर्वी दोन दिवस आधी वर्कशॉप होतं. त्यात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते हे बडे कलाकारही होते. मी मनातून खूप धास्तावले होते. माझा आत्मविश्वास कमी होत होता. पण मीच मनाला समजावलं, ‘या बड्या कलाकारांचं एवढं दडपण का घ्यावं?’ मी मोठ्या आत्मविश्वासानं त्या वर्कशॉपला गेले. त्या वर्कशॉपनंतर माझ्यातला आत्मविश्वास दुणावला आणि मोठ्या ताकदीनं मी देविका साकारली. मला स्वत:लाच माझ्यातला हा बदल अनपेक्षित वाटत होता.
या चित्रपटातली देविका आपल्या प्रेमात अडथळा येतो म्हणून आपल्या प्रियकराच्या बायकोचा काटा कसा काढावा याचा कट अगदी सहज- तेही पिझ्झा खाताना करते, हे माझ्या विचारांच्या चौकटीत बसणं शक्य नव्हतं, पण देविकासाठी हे ‘सहज’ आहे- अगदी पिझ्झा खाण्यासारखं ! ही कथा विवाहबाह्य संबधांवर आधारित आहे, पण स्वतःचं व्यक्तिमत्त्व हे पडद्यावरील व्यक्तिरेखेच्या विरुद्ध असलं की हा ती व्यक्ती आणि भूमिकेतला विरोधाभास आपल्यासाठी चक्रावून टाकण्यासारखा असतो ! हा अनुभव तिच्यासाठी भारी होता हे ती आवर्जून सांगते.
एकूणच थ्रिलर – रॉमकॉम प्रकारात काम करणं एक वेगळाच अनुभव होता. त्यातही परेश मोकाशी आणि स्वप्नील जोशी यांच्यासारख्या सीनिअर कलाकारांसोबत काम करणं हे एक अभिनेत्री म्हणून खूप काही शिकण्यासारखं होतं. या कालाकारांनीही तिच्यासारख्या नवोदित अभिनेत्रीला खूप मोलाचं सहकार्य केलं. त्यासाठी ती त्यांची सदैव ऋणी राहील.
माझं अभिनय क्षेत्रात येणं हा एक योगायोग होता. मला डेंटिस्ट व्हायचं होतं. तशी माझ्या आईचीही इच्छा होती. मराठी, हिंदी, इंग्लिश या तीनही भाषांसह माझं सायन्स चांगलं होतं. मी डेंटिस्ट व्हायचं ठरवलं होतं. पण आपण जे ठरवतो त्यापेक्षा नियती काही तरी वेगळेच आडाखे ठरवून ठेवते. माझी आई पुण्याची. आईनं मला भरत नाट्यम शिकवलं, तिच्या प्रोत्साहनामुळेच मी अभिनय, नाट्य, नृत्य अशा स्पर्धांमध्ये भाग घेत असे, त्यामुळे माझ्यात स्टेज फिअर नव्हतंच. पदवीचं शिक्षण पूर्ण करण्याआधी मी एक हिंदी नाटकाचा ग्रुप जॉईन केला. अभिनयाची आवड म्हणून मी नाटकात काम करू लागले.
हेही वाचा- यशस्विनी : डिप्रेशन, पीएच.डी आणि कुटुंबाची मोलाची साथ (उत्तरार्ध)
माझी आई गृहिणी, माझ्या वडिलांचा डिझायनर साड्यांचा बिझनेस होता, तर माझ्यापेक्षा ७ वर्षांनी लहान बहीण… असं आमचं चौकोनी आणि सुखी कुटुंब आहे. अभिनयाच्या क्षेत्रात माझं कुणीही नव्हतं. त्यामुळेही कुणी गॉडफादर / मेंटॉर असण्याचा प्रश्नच नाही. माझ्या बाबांचे मित्र प्रदीप जाधव एकदा त्यांना म्हणाले, ‘शिवानीमध्ये स्पार्क आहे, नृत्य, अभिनय अशा कलांमध्ये ती विशेष प्राविण्य मिळवेल.’ त्याच्या या मतामुळे माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. एक डान्स परफॉर्मन्स बघण्यासाठी ‘झी’चे क्रिएटिव्ह हेड आले होते. त्यांनी थेट ‘अगले जनम में मोहे बिटिया ही कीजो’ या मालिकेसाठी माझं कास्टिंग केलं. हे सगळं अचानकच झालं. मला होकार किंवा नकार देण्याची सवडच मिळाली नाही. पण हा प्रवासही तसा सोपा नव्हता. काही वाईट प्रसंगही वाट्याला आले. हा एक प्रसंग तर मी कधीच विसरू शकणार नाही. माझं शूटिंग सुरू होतं. मी सेटवर डायलॉग पाठ करून गेले होते. कुठल्याही क्षणी कॅमेरा रोल होणार होता. मी कॅमेरासमोर जाणार इतक्यात मला सेटवरच सांगण्यात आलं, ‘आपकी रिप्लेसमेंट हुई है ! आपकी जगह किसी और ने ले ली है !’ हे माझ्यासाठी अपमानकारक आणि धक्कादायकही होतं ! त्याक्षणी का, कशासाठी, माझा दोष काय… असे असंख्य प्रश्न माझ्या ओठांवर होते, पण ते मी विचारू शकले नाही. खिन्न मनाने घरी आले. स्वतःचं आत्मपरीक्षण केलं. पण मी जिद्दीने पेटून उठले आणि एकामागे एक ऑडिशन्स देत गेले. मला फक्त स्वतःला प्रूव्ह करायचं होतं. २-३ वर्षांत मला टीव्ही शोज मिळत गेले आणि ज्या प्रॉडक्शन हाऊसने मला बाहेरचा रस्ता दाखवला होता त्याच प्रॉडक्शन हाऊसने नंतरच्या काळात मला ३ शोज दिले ! मी टिकून राहिले ‘देवयानी’ या मालिकेमुळे मला खूप प्रसिद्धी मिळाली. नाव दिलं. अर्थात देवयानी मालिकेत मुख्य भूमिका मिळतेय म्हणून मी हिंदी टीव्ही शो स्वतःहून सोडला.
हेही वाचा- विवाह समुपदेशन : भांडा सौख्यभरे
पण या एका या प्रसंगाने मात्र मला खूप काही शिकवलं. मी आठवीत असताना दोन मालिका केल्या, तर दहावीत असताना ‘देवयानी’ मालिका केली. आज अशा कितीतरी अमराठी मुली अभिनय क्षेत्रात येत आहेत, मग माझ्यासारख्या मराठी मुलींनी हिंदी मालिका का करू नयेत ?
[Message clipped] View entire message