भारतीय लोक आणि विशेषत: महिला जगभरात त्यांच्या बुध्दीमत्तेसाठी ओळखले जातात. आणि यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालंय. भारतीय महिला आणि पुरुष बुध्दीबळपटूंनी जागतिक ऑलिंपियाडमधलं जगज्जेतेपद मिळवलंय. आपली महिला बुध्दीबळ टीम वर्ल्ड चँपियन ठरली आहे. या टीममध्ये हरिका द्रोणावल्ली, रमेशबाबू वैशाली, वंतिका अग्रवाल, तानिया सचदेव आणि नागपूरची दिव्या देशमुख यांचा समावेश होता. या टीमचे कोच होते अभिजीत कुंटे.

दिव्या देशमुख

हंगेरीमधल्या बुडापेस्ट इथं झालेल्या या स्पर्धेत भारतीय महिला टीमनं आपल्या बुध्दीमत्तेच्या जोरावर आणि चिकाटीने अजिंक्यपदावर आपलं नाव कोरलं. या विजयात नागपूरच्या दिव्या देशमुखनं मोठी भूमिका बजावली. ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यानंही तिचा खास उल्लेख केला आहे. या विजयामुळे दिव्या वयाच्या केवळ १८ व्या वर्षी जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानावर पोहोचली आहे. ती ऑलिंपियाडचे सर्व ११ राऊंड्स खेळणारी एकमेव भारतीय खेळाडू आहे. अझरबैझानविरुध्दच्या अंतिम सामन्यात तिनं तिसऱ्या बोर्डवर वैयक्तिक सुवर्णपदकही मिळवलं. ९ डिसेंबर २००५ रोजी जन्मलेली दिव्या नागपूरची आहे. तिची आई नम्रता आणि वडील जितेंद्र हे दोघेही डॉक्टर आहेत. दिव्या वयाच्या पाचव्या वर्षापासून बुध्दीबळ खेळते. तिची मोठी बहीण बॅडमिंटन खेळते, पण लहान वयात रॅकेट पकडणं अवघड जात असल्यानं आईवडिलांनी तिला चेस अकादमीमध्ये घातलं. तिला बुध्दीबळ आवडू लागलं. ऐतिहासिक FIDE ऑनलाईन बुध्दीबळ ऑलिंपियाडच्या विजेत्या टीममध्येही ती होती. दिव्यामध्ये सौंदर्य आणि बुध्दीमत्तेचा मिलाफ दिसतो. या वर्षाच्या सुरुवातीलाच टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेच्या सुरुवातीला तिला लैंगिक भेदभावाला सामोरं जावं लागलं होतं. ती खेळत असताना तिच्या दिसण्यावरुन कमेंट्स केल्या जात होत्या. त्या ऐकून चिडलेल्या दिव्यानं सोशल मीडियावर बुध्दीबळ खेळताना महिला खेळाडूंना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं यावर एक पोस्टच लिहिली होती. ही पोस्ट भरपूर व्हायरल झाली आणि फक्त बुध्दीबळच नाही अनेक अन्य क्षेत्रांतल्या महिला खेळाडूंनीही तिवं समर्थन केलं.

Jayant Patil
Maharashtra News: महाविकास आघाडीचं जागावाटप ‘या’ तारखेला होणार जाहीर; जयंत पाटलांची मोठी घोषणा!
26th September Rashi Bhavishya & Panchang
२६ सप्टेंबर पंचांग: दिवसाच्या सुरुवातीला ‘या’ राशींना होणार…
malaika arora father anil arora suicide
अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन
tupperware
डबे, बाटल्या तयार करणारी लोकप्रिय ‘टपरवेअर’ कंपनी झाली दिवाळखोर; कारण काय? या कंपनीचे नक्की काय चुकले?
amitabh bachchan talked about rekha
रेखा यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल विचारल्यावर अमिताभ बच्चन म्हणाले होते, “ती माझी…”
Akshay Shinde Mother and Father
Akshay Shinde Encounter : “अक्षयचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही, कारण…”; आई वडिलांनी नेमकं काय म्हटलं आहे?
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?

हे ही वाचा… नव्या सिंग ठरली मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धेत सहभागी होणारी पहिली ट्रान्स वुमन!

वैशाली रमेशबाबू

आपल्या विजयानंतर ‘इतके दिवस आर. प्रज्ञानंदची बहीण म्हणून मला ओळखलं जात होतं, आता माझी स्वत:ची ओळख असेल,’ अशी प्रतिक्रिया आर. वैशालीनं दिली. वैशालीचा छोटा भाऊ प्रज्ञानंद ग्रँडमास्टर आहे आणि तो बुध्दीबळ ऑलिंपियाडच्या पुरुष टीममध्ये होता. वैशालीचा जन्म २००१ मध्ये चेन्नईत झाला. तिचे वडील रमेशबाबू तामिळनाडू राज्याच्या कॉर्पेरेशन बँकेत ब्रँच मॅनेजर आहेत. तिची आई त्यांच्या प्रत्येक स्पर्धेला न चुकता हजर असते. वैशाली आणि तिच्या भावाची ती सर्वात मोठी सपोर्ट सिस्टिम आहे. वयाच्या १२ व्या वर्षापासूनच ती बुध्दीबळ खेळतेय. कोनेरु हंपी आणि हरिका द्रोणावल्लीनंतर ग्रँडमास्टरचा किताब मिळवणारी ती भारताची तिसरी महिला बुध्दीबळपटू ठरली आहे. २०२२ च्या ऑलिंपियाडमध्ये तिनं कांस्य पदक मिळवलं होतं. तिला अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

हरिका द्रोणावल्ली

गर्भारपणाच्या नवव्या महिन्यात ऑलिंपियाड खेळणारी हरिका द्रोणावल्ली मूळची आंध्र प्रदेशातली आहे. २०२२ मध्ये भारतात, चेन्नईत ऑलिंपियाड झाली त्यावेळेस हरिका नऊ महिन्यांची गरोदर होती. पण आपल्या मायभूमीत होत असलेली ही स्पर्धा ती खेळली. त्यासाठी तिनं सेरेना विल्यम्सचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं होतं. आंध्रातल्या गुंटूमरमध्ये १२ जानेवारी १९९१ रोजी तिचा जन्म झाला. कोनेरु हंपीनंतर भारताची ती दुसरी महिला ग्रँडमास्टर आहे. २०१२, २०१५ आणि २०१७ या तीनही जागतिक बुध्दीबळ स्पर्धेत तिनं तीन कांस्य पदकं मिळवली होती. २०२२मध्ये झालेल्या ऑलिंपियाडमध्ये तिच्या टीमला कांस्य पदक मिळालं होतं. तिला २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. गेली २० वर्षे बुध्दीबळ खेळणाऱ्या हरिकाचं जगज्जेतेपदाचं स्वप्नं अखेर पूर्ण झालंय.

हे ही वाचा… ऑस्करमध्ये भारतीय महिलांचा जलवा; किरण रावच नव्हे, तर ‘या’ महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांनाही मिळाली होती एन्ट्री

वंतिका अग्रवाल

मूळची नोएडाची असणारी वंतिका अग्रवाल तिच्या भावाला खेळताना पाहून वयाच्या नवव्या वर्षापासून बुध्दीबळ खेळायला लागली. २०१६ मध्ये तिनं जागतिक युवा बुध्दीबळ चँपियनशीप अंडर-१४ मध्ये कांस्य पदक मिळवलं. २०२० मध्ये FIDE ऑनलाईन बुध्दीबळ ऑलिंपियाडही ती जिंकली होती. तिचे आई वडील दोघेही चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. दोघेही कामात बिझी असल्याने वंतिकाला काही स्पर्धांना मुकावं लागत होतं. तिच्या खेळातलं प्रावीण्य बघून तिच्या आईनं नोकरी सोडली आणि ती तिची मार्गदर्शक आणि गुरूही झाली. आशियाई चँपियनशीप स्पर्धेतही तिनं चमकदार कामगिरी केली होती.

तानिया सचदेव

तानिया उत्तम बुध्दीबळपटू तर आहेच, पण ती चांगली क्लासिकल डान्सरही आहे. मूळ दिल्लीच्या असलेल्या तानियाला क्रीडा क्षेत्रातली ग्लॅमर गर्ल म्हणूनही ओळखलं जातं. तिचे सोशल मीडियावर भरपूर फॅन फॉलोईंग आहे. तिनं २००६ आणि २००७ मध्ये भारताच्या राष्ट्रीय महिला प्रीमियर बुध्दीबळ चँपियनशीप जिंकली आहे. २००८ नंतर ती महिला टीममधून भारतासाठी ऑलिंपियाडमध्ये खेळत आहे. २०२२ मध्ये चेन्नईत झालेल्या ऑलिंपियाडमध्ये तिनं वैयक्तिक गटातही कांस्य पदक जिंकलं होतं.

हे ही वाचा… राजस कमळ

या पाचहीजणी देशाच्या वेगवेगळ्या भागांतून आल्या आहेत. प्रत्येकीची खेळण्याची पध्दतही वेगळी आहे, पण ऑलिंपियाडमध्ये भारताला विजेतेपद मिळवून देण्याचं एकच ध्येय त्यांच्यापुढे टीम म्हणून खेळताना होतं. हरिका पोझिशिनल प्लेअर म्हणून ओळखली जाते, तर वैशाली तिच्या आक्रमक खेळीसाठी प्रसिद्ध आहे. दिव्या या स्पर्धेतली सर्वात उत्तम कामगिरी करणारी खेळाडू ठरली आहे. तिच्या खेळात सातत्य आहे. अत्यंत कठीण परिस्थितीही ती सामना आपल्या बाजूला फिरवू शकते इतकी क्षमता तिच्या आहे. वंतिकाही सामना अटीतटीला आला तरी डगमगून न जाता त्याला तोंड देते आणि जिंकू शकते. तानिया प्रत्येक सामन्यात तिचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करते.

आपल्या या बुध्दीमान मुलींनी जगात भारी असल्याचं दाखवून दिलंय. पंतप्रधान मोदींपासून ते अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. महत्त्वाचं म्हणजे या जगज्जेत्या टीमचं मायदेशात परतल्यावर दणक्यात स्वागतही झालंय. यापुढे बुध्दीबळात करियर करू इच्छिणाऱ्या या मुलींमुळे आशेचा मोठा किरण निर्माण झाला आहे.