तन्मयी तुळशीदास बेहेरे
“वूमनहूड ” हा फेसबुक ग्रुप महिलांचे हक्क आणि गरजू महिलांना कायदा, आर्थिक, शैक्षणिक मदत देण्यासाठी सध्या सक्रिय असल्यामुळे ट्रेंडिंग आहे. यंदा महिला दिनाच्या निमित्ताने स्नेहसंमेलनाचे आमंत्रण होते. उंची मंद सुगंधाचा दरवळ, खऱ्या फुलांची आरास, सिल्क शिफॉन साड्या आणि पार्टी ड्रेसेसची लगबग सुरु होती. गोल टेबलावर बसून महिला हास्यविनोदात रंगल्या होत्या. सगळ्या वातावरणात प्रसन्नतेचा शिडकाव होता. कार्यक्रम सुरु झाला. वूमनहूडच्या संस्थापिका मालविका राव यांनी प्रास्ताविक केलं. नावाजलेल्या, कर्तबगार महिला स्वतःहून पुढे येऊन आपले विचार मांडत होत्या. कोणी आयएएस अधिकारी होत्या, कोणी संशोधिक, कोणी धावपटू, वकील, अभिनेत्री, पायलट तर कोणी सामाजिक कार्यकर्त्या. सगळ्याजणी आपापल्या बुद्धिमत्तेने, आपापल्या क्षेत्रात पुढे आलेल्या. समाजात स्वतःची ओळख निर्माण केलेल्या आणि आता आपण समाजाचं काही देणं लागतो म्हणून समाजातील शोषित स्त्रियांसाठी काय विधायक कार्य करता येईल का, याची चर्चा करत होत्या.
‘या खऱ्या सावित्रीबाईंच्या लेकी’ असं मला आपसूक वाटून गेलं. इथे सावित्रीबाई असत्या तर त्यांना कृतार्थ वाटलं असतं. या स्त्रिया आपापल्या क्षेत्रात पुढे आल्या म्हणून नव्हे तर एस्टॅब्लिश होऊनसुद्धा समाजातल्या तळागाळाच्या स्त्रियांसाठी काही करता येईल का, या प्रश्नाचा विचार त्या करतात म्हणून. आपल्या देशात जन्माला आलेल्या सहा ते चौदा वर्षांमधील मुलाला मोफत प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार राज्यघटनेने दिला आहे. शिक्षणासाठी स्त्रीला समाजाशी झगडावं लागत नाही. कारण फक्त आणि फक्त सावित्रीबाई. ही लढाई त्या दीडशे वर्षांपूर्वी लढल्या म्हणून आज त्यांनी लावलेल्या रोपाची फळे आम्ही मुली चाखत आहोत.
हे विचार मनात घोळत होते तेवढ्यात माझ्या मोबाईलच्या व्हायब्रेशनमुळे माझी तंद्री भंग पावली. ट्विटरची नोटिफिकेशन्स येत होतं, ब्रेकिंग न्यूज होती, इराणमधील घोम शहरातील शाळांमध्ये विद्यार्थिनींना विषबाधा! कशी? का? हे समजायच्या आत त्यावर रिट्विट आले. इराणची न्यूज एजन्सी आयआरएनएनुसार इराणचे उप आरोग्यमंत्री युनूस पनाही यांनी असे प्रतिपादन केले की समाजातील काही घटकांना मुलींचे शिक्षण बंद करायचे आहे म्हणून त्यांना जाणीवपूर्वक विष दिले जात आहे. मुलींचं शिक्षण बंद करायचं म्हणजे त्यांचे पंखच छाटून टाकायचे. जगात काय चाललंय ती ज्ञानाची खिडकीच बंद करून टाकायची, बुद्धिवादी, तर्कशुद्ध विचार बंद, पदरात काय पडणार तर गुलामगिरी आणि गळचेपी. आपोआपच पुरुषांचं महत्व वाढणार, आर्थिक दृष्ट्या त्याच्यावरच अवलंबून राहावं लागणार. राजकीय वर्चस्वही त्यालाच मिळणार. सत्ता मिळाल्यावर हाच पुरुष मग पुरुषधार्जिणे निर्णय घेणार. म्हणजे हे दुष्टचक्र चालत राहणार. शिक्षण नाही म्हणजे स्त्रियांचं अस्तित्व फक्त वंश वाढवण्यासाठीच मर्यादित राहिलं का? मला महात्मा फुलेंचीच कविता आठवली.
विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली
नीतिविना गती गेली
गतिविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले
एवढे अनर्थ एका अविद्येने केले.
म्हणजे इराणमध्ये स्रियांच्या शोषणाची सुरुवात मूळावर घाव घालूनच केलेली आहे का?
इसवी सन १८४८ साली पुण्याच्या भिडे वाड्यात महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा काढली. शाळेत शिकवायला शिक्षक मिळेना म्हणून फुलेंनी आपल्या पत्नीला सावित्रीबाईंनाच शिकवले. सावित्रीबाई शाळेत शिकवायला जाऊ लागल्या की लोक त्यांच्या अंगावर शेण फेकायचे, थुंकायचे तरी सावित्रीबाईंनी अव्याहतपणे आपले विद्यादानाचे कार्य सुरूच ठेवले. समाजाची अवहेलना, वाळीत टाकणे या त्रासाने उलट त्यांचा स्त्रीशिक्षणाचा निश्चय अधिकाधिक पक्का होत गेला.
मग जाणवलं म्हणजे आज दीडशे वर्ष उलटली तरी परिस्थिती बदललेली नाहीच उलट अजूनच जहाल झालेली आहे का? तेव्हा मुलींवर थुंकायचे आता थेट मारूनच टाकतात.शिक्षणाची एवढी भीती घातल्यावर कोणते पालक आपल्या मुलीला शाळेत पाठवतील का? आपल्याकडे सावित्रीबाई होत्या म्हणून आज आम्ही शिक्षण घेऊन पुरूषांच्या बरोबरीने समान अधिकार, समाज दर्जा अनुभवू शकतो. पण मग इराणच्या मुलींना शिक्षणाअभावीच राहावं लागणार का?
मला वाटतं आताच्या इराणला गरज आहे सावित्रीबाईंची. कारण सावित्रीबाईच आहेत ‘ती’ ठिणगी जी स्त्रीशिक्षणाचा वणवा पेटवेल. आजही त्या एक विचार आहेत जो स्त्रियांच्या पुढच्या शेकडो पिढ्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अस्तित्वासाठी आणि प्रगतीसाठी आवश्यक आहे. त्यांना कोणतीही राजकीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी नव्हती पण जेव्हा मुलींची शाळा सुरु करायला विरोध झाला तेव्हा आता सर्व स्त्रियांच्या वतीने आपणच उभे राहिलो नाही तर स्त्रियांना शिक्षणापासून कायमचं वंचित राहावं लागेल आणि त्याचे परिणाम पुढच्या पिढ्याना भोगावे लागतील याची त्यांना जाणीव झाली म्हणून त्या लढल्या.
अशाच सावित्रीबाई हव्या आहेत आजच्या इराणला. ज्या त्यांच्यातूनच उभ्या राहतील, ज्यांच्याकडे समाजाच्या विरोधाला न जुमानणारी जिद्द आणि विजिगिषु वृत्ती आहे. ज्या काळाच्या पुढे जाऊन विचार करतील. स्त्रीशिक्षणासाठी कोणत्या पुरुषावर अवलंबून न राहता आपणच आपल्यासाठी उभे राहिले पाहिजे ही जाणीव ज्यांच्याठायी असेल. अशा सावित्रीबाईंच इराणच्या स्त्रियांना उंबरठा ओलांडण्याचे सामर्थ्य देतील. मला राहून राहून वाटलं आता इथपर्यंत पोचण्यासाठी इराणमध्ये सावित्रीबाई कधी बरं जन्म घेतील?
tanmayibehere@gmail.com