-अपर्णा देशपांडे

तीन दशकांपूर्वी सॉफ्टवेअर कंपन्या आणि आयटी तंत्रज्ञानाची प्रचंड उलाढाल यामुळे फार मोठ्या संख्येने तरुण मुलं परदेशात गेले. तिकडे नोकरीनिमित्त जाणाऱ्यांची एक मोठी लाट आली होती. त्यानंतर काही वर्षांनी तशीच लाट आली ती तिकडे उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्यांची. शिक्षण पूर्ण करून एकदा का तिकडे नोकरी लागली की भारतात परत येणारे फार कमी. आता तर परदेशात शिक्षण घेणाऱ्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. देशाबाहेर जाण्याची अपूर्वाई पूर्वी इतकी राहिली नसली तरी जाण्याची ‘क्रेझ’ अजिबात कमी झालेली नाही. तिकडे नोकरी करणाऱ्या मुलींची संख्याही लक्षणीय आहे. अशा वेळी त्यांचं लग्न तिकडच्याच भारतीय मुलाशी व्हावं, अशी त्यांची इच्छा असते. भारतात असलेल्या बऱ्याच मुलींना देखील तिकडे नोकरी करणारा मुलगा हवा असतो. अनेक विवाह नोंदणी संस्था परदेशी स्थळासाठी वेगळे शुल्कही आकारतात, पण त्या कुटुंबाच्या आणि मुलाच्या माहितीची सत्यता पडताळण्याची जबाबदारी तर मुलीच्या पालकांनाच घ्यावी लागते. मुलगी स्वतः तिकडेच राहणारी असेल तरीही तो मुलगा सांगतोय ती माहिती कितपत सत्य आहे हे तपासून घेणं अत्यंत गरजेचं आहे.

आणखी वाचा-समुपदेशन : नात्यात तुलना कशाला?

मनाली सारख्या मुलीचं उदाहरण बघितलं तर याचं महत्व लक्षात येईल. मनालीनं भारतात अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं आणि परदेशात नोकरी मिळवण्याचे खूप प्रयत्न केले. त्या देशात जाण्यासाठी तिथे नोकरी करणारा भारतीय मुलगा शोधला. त्याचे आईवडील भारतात असल्याने त्यांच्याकडे जाऊन घर बघून झालं, संमती झाली. व्हीझीटर व्हिसावर लग्न करून ती तिकडे गेली, चार पाच दिवसातच तिला समजलं, की त्या मुलाचं तिथल्या परदेशी मुलीशी आधीच लग्न झालेलं आहे. तसं करण्याने त्याची तिथे कायम राहण्याची सोय झालेली होती. भारतात त्याच्या आईवडिलांना याची अजिबात माहिती नव्हती. मनालीला जेव्हा सत्य समजलं तेव्हा तिनं भारतात परत जाण्याचा हट्ट सुरू केला, पण त्यावर त्याचा युक्तिवाद बघा. तो म्हणाला, अगं, लग्नाची बायको तूच आहेस माझी, पण इथे कागदावर ती माझी पत्नी असुदेत, आपल्याला इथे कायम राहता येईल. एकदा का तुला नोकरी मिळून ग्रीन कार्ड मिळालं, की मग मी हिला घटस्फोट देईन. हे ऐकून त्याच्या नीचपणाची तिला चीड आली. एकाच वेळी तो दोघींनाही फसवत होता. भारतात तिच्या विवाहाची नोंदणी झाली असली तरी इथे तिचा विवाह कायदेशीर नव्हता आणि अशा ढोंगी माणसासोबत आयुष्य काढायचं नव्हतं म्हणून ती भारतात परत आली.

आणखी वाचा-उत्पन्न असो वा असो, पत्नीची देखभाल ही पतीचीच जबाबदारी…

परदेशातील प्रत्येक मुलाच्या बाबतीत असं नक्कीच होत नाही, पण फक्त तिकडे राहायला मिळावं या लालसेपायी लग्न करताना खूप काळजी घेण्याची आवश्यकता आहे. इथे भारतात देखील लग्न ठरवताना वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक झाल्याची कैक उदाहरणं आहेत, पण इथे मुलाला किंवा मुलीला लगेच घरच्यांचा पाठिंबा मिळणं सोपं आहे. एकदा का देश सोडून मुलगी तिकडे गेली, आणि ती अडचणीत असेल तर पालक फार हवालदिल होतात.

तिथे आपल्या नात्यातील किंवा मित्र मंडळीपैकी कुणी व्यक्ती असल्यास त्यांच्या मार्फत त्या मुलाची बारकाईने चौकशी व्हायला हवी. तो सांगतो त्या कंपनीत नक्की नोकरी आहे ना, पगार नक्की किती आहे, इथे भारतात त्याचे पालक असतील तर त्यांच्याशीही सगळ्या शंका स्पष्ट बोलण्यास कचरू नये. मुलीने देखील आपला पासपोर्ट आपल्याच जवळ राहील याची खबरदारी घ्यावी. आपला देश सोडून इतक्या अंतरावर लग्न करून गेलेली मुलगी जर तिथे अडचणीत आली तर आपल्याकडे त्वरित मदतीची काय सोय आहे, कुणी नातेवाईक किंवा जबाबदार मित्र आहेत का हे खूप आधीच बघणे गरजेचे आहे. आपलं वैवाहिक आयुष्य सुखी आणि आनंदाचं होणं गरजेचं आहे. केवळ परदेशात राहण्याची भुरळ घेऊन लग्न ठरवताना वरवर चौकशी करून भागणार नाही, याचं भान ठेवावं लागेल.

adaparnadeshpande@gmail.com

Story img Loader