मासिक पाळी हा महिलांच्या अत्यंत जवळचा विषय आहे. महिलांना दर महिन्याला न चुकता मासिक पाळीला सामोरे जावे लागते. खरे त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणून मासिक पाळीकडे बघितले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीत महिलांना मासिक पाळी येणे हे अत्यंत शुभ प्रतीक मानले जाते; मात्र काही खुळचट चालीरीतींमुळे अनेक महिलांना मासिक पाळीदरम्यान चुकीची वागणूक दिली जात असल्याचे दिसून येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मासिक पाळीदरम्यान महिलांना होणारा त्रास हा सर्वांनाच माहीत आहे. अशात अनेक महिलांना मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी विश्रांती (बेड रेस्ट) किंवा वेदनाशामक गोळ्या (पेन किलर)ची आवश्यकता भासते. काहींना इतका गंभीर स्वरूपाचा त्रास होतो की, ताप येणे, अंग दुखणे, तीव्र डोकेदुखी किंवा सतत मूड बदलणे, अशी अनेक लक्षणे दिसून येतात. अशात अनेकदा काम करणाऱ्या महिलांना थोडा आराम करावासा वाटतो. कामातून थोडी विश्रांती घेऊन मासिक पाळीमुळे आलेला थकवा दूर करावासा वाटतो. पण, खरोखऱ मासिक पाळीदरम्यान आराम करणे हे प्रत्येक महिलेला शक्य आहे का? जर एखाद्या महिला खेळाडूचा उद्या सामना आहे आणि तिला अचानक मासिक पाळी आली, तर ती खरेच सामना रद्द करू शकेल…? दिवसाला मजुरी करून दोन वेळचे पोट भरणाऱ्या महिलेला मासिक पाळीदरम्यान सुट्टी घेणे परवडेल का?

तुम्हाला लक्षात आले असेल मी कशा संदर्भात बोलतेय ते. हो बरोबर! मी मासिक पाळीदरम्यान महिलांच्या पगारी सुटीविषयी बोलतेय. खरेच मासिक पाळीदरम्यान महिलांना पगारी सुट्या मिळाल्या पाहिजेत का? त्यांना या कारणासाठी सुट्टीची आवश्यकता आहे का?

केंद्रीय महिला आणि बालविकास (WCD) मंत्री स्मृती इराणी यांनी ‘मासिक पाळी’साठी भरपगारी सुट्टी देण्यावरून एक मोठे विधान केले आहे आणि सगळीकडे एकच चर्चा रंगली. महिलांना मासिक पाळीच्या काळात रजा मिळावी की नाही यावर संसदेत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर स्मृती इराणी यांनी, कोणत्याही भरपगारी रजेचा विचार करीत नसल्याचं सांगितलं. मासिक पाळीदरम्यान सुट्टी दिल्यास भेदभावाला प्रोत्साहन दिलं जाईल, असे मत व्यक्त केले.
त्या म्हणाल्या, “मी मासिक पाळी येणारी स्त्री म्हणून सांगते. मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही. हा स्त्रियांच्या जीवनाचा नैसर्गिक भाग आहे. त्यांना मासिक पाळीदरम्यान भरपगारी सुट्टी दिली तर स्त्रियांना समान संधी मिळणार नाही.त्यामुळे अशा गोष्टी मांडू नयेत. कारण- ज्यांना मासिक पाळी येत नाही, त्यांचा त्याविषयीचा विशिष्ट दृष्टिकोन असतो.”

हेही वाचा : ॲनिमल’ क्रूरच, बाकी वास्तवात बायका कापल्या जातात हा भाग वेगळा!

पण मग हा प्रश्न निर्माण होतो की, मासिक पाळीत सुट्टी दिल्यामुळे स्त्रियांना खरोखरच समान संधी मिळणार नाही? खरेच मासिक पाळीदरम्यान सुट्टी दिल्यास भेदभावाला प्रोत्साहन दिले जाईल? खरेच महिलांना या कारणासाठी पगारी सुट्यांची आवश्यकता आहे की नाही? लोकसत्ताने या संदर्भात महिलांशी संवाद साधला. आज आपण त्यांची मते जाणून घेऊ.

बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या प्राची वाळुंज सांगतात, “मासिक पाळी हा स्त्रीचा नैसर्गिक गुणधर्म आहे. त्यासाठी कामाच्या ठिकाणी पगारी रजा मागणे चुकीचेच आहे. कारण- प्रत्येक स्त्रीला याचा गंभीर असा त्रासच होतोच असे नाही. तसेच ही गोष्ट म्हणजे स्त्रीला दिलेली देणगी आहे. त्यासाठी रजा मागून आपण पुरुषांना आपला कमकुवतपणा का दाखवायचा. मासिक पाळी ही जरी नैसर्गिक असमानता असेल, तर भरपगारी रजा घेऊन आपणच आर्थिक असमानता का निर्माण करायची? ज्यासाठी स्त्रियांना आधीच खूप संघर्ष करावा लागतोय.”
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रणाली कोरडे सांगातात, “मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही. हे जरी बरोबर असेल तरी मासिक पाळीत होणारा त्रास हा थोड्या कालावधीसाठी का होईना; परंतु शरीर अपंग झाल्यासारखी जाणीव करून देणारा असतो. अशा वेळी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना स्त्रियांना त्या कामाकडे किंवा कामाशी संबंधित गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागते आणि त्यामुळे आणखी तणावाचं वातावरण निर्माण होतं.”

माध्यम क्षेत्रातील प्रिया देशमुख सांगतात, “त्यांना म्हणावं मासिक पाळीमध्ये पोट दुखत असताना आणि लोकल किंवा बसमधून प्रवास करीत एक तास उभं राहून, नऊ तास काम करून पुन्हा लोकल किंवा बस पकडून कुठे मागून डाग तर नाही लागला ना या चिंतेत मासिक पाळीचं दुखणं घेऊन एक दिवस आमच्या सर्वसामान्य स्त्रियांसारखं जगून दाखवा आणि मग असं विधान करा. एसीच्या गाडीत बसून हे असं विधान करणं खूप सोपं आहे. आजकाल मुलींची जीवनशैली बदलली आहे आणि त्याचा परिणाम महिलांच्या मासिक पाळीवर आणि त्यापासून होणाऱ्या अनेक आजारांवर नक्कीच होतोय. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान सुट्या मिळणं गरजेचं आहे. तीन नाही; पण किमान दोन दिवसांची तरी मासिक पाळीदरम्यान पगारी सुट्टी द्यावी.”

एक महिला शिक्षिका नम्रता बावणकर सांगतात, “एक वर्किंग महिला म्हणून सांगायचं झालं, तर मासिक पाळीमध्ये स्त्रीच्या शरीर व मनाला थोड्या आरामाची गरज असते आणि त्यामुळे तिला सुटीची गरज आहे. थोड्या विसाव्याची गरज आहे. मासिक पाळी हा स्त्रियांच्या जीवनातील एक नैसर्गिक भाग जरी असला तरी ज्या स्त्रियांना मासिक पाळीमध्ये त्रास होत असतो, त्या महिलांना यादरम्यान सुटीची गरज आहे.”

हेही वाचा : तुमच्या मुलांना चारचौघात बोलताना, वावरताना बुजल्यासारखं वाटतं का? सोशल एन्ग्जायटी म्हणजे नेमकं काय?

कॉर्पोरेटमध्ये नोकरी करणाऱ्या प्रतिभा वाळुंज म्हणतात, “मी एक कॉर्पोरेटमध्ये नोकरी करणारी महिला असून, मला असे वाटते की, मासिक पाळी ही महिलांसाठी एक नैसर्गिक प्रक्रिया असून, त्यादरम्यान महिलांना काही प्रमाणात अशक्तपणा येतो. पण, त्यामुळे त्यांना आजारी किंवा अगदी अपंग झाल्यासारखे समजले जाऊ नये. त्यावेळी त्यांना जरा आरामाची गरज भासू शकते. त्याव्यतिरिक्त अगदी भरपगारी सुटीची तरतूद करण्याची गरज नाही.
केवळ शक्य असल्यास पाळीदरम्यान कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या महिलांना वर्क फ्रॉम होम दिले जाऊ शकते किंवा फिजिकल काम करण्याऱ्या महिला कर्मचाऱ्यांना कमी अंगमेहनतीचे काम दिले जाऊ शकते; परंतु अत्यावश्यक क्षेत्रातील महिलांना त्यांचे कर्तव्य बजावणे अपर्यायी असते.”

लॉचा अभ्यास करणाऱ्या एक विद्यार्थिनी सांगते, “प्रत्येक व्यक्तीला भारतात भारतीय संविधानानुसार जगण्याचा अधिकार (Right to life, Under Article 21 of Indian constitution) आहे. आपण हे अपेक्षित धरू शकत नाही की, प्रत्येक महिला मासिक पाळीच्या वेळी कामावर हजर राहील आणि काम करील. कारण- मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना, असुरक्षितता, कमकुवत शरीर आणि महिलांच्या स्वच्छ, सुरक्षित व योग्य सुविधांचा अभावामुळे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होते. त्याशिवाय हार्मोनल बदलांमुळे बहुतेक मासिक पाळी आलेल्या महिला किंवा मुलींना त्या दिवसांमध्ये मानसिक अस्वस्थता जाणवते.आपली राज्यघटना नेहमीच असुरक्षिततांच्या संरक्षणाची काळजी घेत असते. सर्वसमावेशकतेच्या तत्त्वासाठी वचनबद्ध आहे. महिलांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणे हेच सुसंस्कृत आणि समतावादी समाजाचे प्राथमिक लक्षण आहे.”

माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या स्नेहल कदम सांगतात, “सामान्य महिला किंवा कर्मचारी महिलांसाठी मासिक पाळीचे पाच दिवस कसे असतात याची कल्पना कुणीच करू शकत नाही. त्यातल्या त्यात मोठ्या पदावर असणाऱ्या महिलांना ना प्रवास करावा लागतो, ना कुटुंबातील इतर काम. त्यामुळे त्या दिवसातील त्रास काय असतो याचा त्या फक्त अंदाज बांधून असं वक्तव्य करू शकतात. बाकी एक महिला म्हणून त्यांनी याकडे बारकाईनं पाहिलं असतं, तर असं विधान केलं नसतं.”

सुशिक्षित गृहिणी असणारी सोनाली बानापुरे सांगतात, “माझ्या मते, मासिक पाळी येणं हा जरी नैसर्गिक भाग असला तरी त्यामध्ये होणाऱ्या वेदना या कुणा कुणासाठी असह्यसुद्धा होतात. काही महिलांना घरच्या कामासाठी मदत करायला ‘कामवाली’ नसते तेव्हा अशा वेळी मासिक पाळीदरम्यान घरातल्या सर्व जबाबदाऱ्या, कामे पार पाडून ऑफिसची कामं करून हा त्रास सहन करणं कठीण होऊ शकतं. त्यामुळे मासिक पाळीमध्ये स्त्रियांना आरामाची अत्यंत गरज असू शकते या मताची मी आहे. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान स्त्रियांना भरपगारी सुटीची आवश्यकता नक्कीच आहे.”

युवा लेखिका रोहिणी वाघमारे सांगतात, ” मासिक पाळी हे मुळात अपंगत्व नाहीच. हे एक स्त्री म्हणून मला मान्य आहे. त्याच बरोबर आपण हे ही समजायला हवं,सगळ्या महिला सारख्या नसतात काहींना मासिक पाळीत प्रचंड वेदना होतात, काहींना काहीच त्रास होत नाही.
मुळात हा त्रास होणं किंवा न होणं हे स्त्रीच्या दैनिक आयुष्य जगण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. घर सांभाळणारी स्त्री असेल किंवा बाहेर नोकरी करणारी स्त्री असेल दोन्ही कधी मासिक पाळीचा बाऊ करताना दिसत नाहीत, त्या सर्व स्त्रिया पाळीच्या दिवसांमध्ये सुद्धा तितक्यात तळमळतेने आपलं काम करत असतात. मला असं वाटत सरकार बाहेरच्या कामात सुट्टी देईल पण तिच्या घरच्या कामात तिला सुट्टी असेल? नाही ना! मग,मुळात हा प्रश्न आणि यात चाललेला वादविवाद चुकीचा ठरेल.”

वरील वेगवेगळ्या क्षेत्रात वावरणाऱ्या अनेक महिलांनी पगारी सुटीची मागणी केली आहे. स्त्रियांना होणारा त्रास हा समजून घेऊन, त्यासाठी पगारी सुट्टी द्यावी, ही या महिलांची अपेक्षा आहे. खरे तर प्रत्येक महिलेला ही सुट्टी मिळणे हे शक्य नाही. कारण- रोजमजुरी करणाऱ्या महिलांना पगारी सुट्या मिळणे शक्य नाही. अनेक प्रायव्हेट कंपन्यांमध्ये साधी एक रजा मागायलासुद्धा १० वेळा अर्ज करावा लागतो. तिथे या महिलांची दखल घेणेही कठीण वाटते. व्यवसाय करणाऱ्या महिला, गृहिणी यांना या पगारी सुट्या तर दूरच; पण साधी एक सुटीसुद्धा मिळणे कठीण असते. त्यामुळे खरे तर हे धोरण प्रत्येकाला लागू होणार नाही हे तितकेच खरे आहे.

मुळात सुट्या मिळणे किंवा न मिळणे हा वेगळा मुद्दा आहे; पण एका महिला नेत्याने भरसंसदेत महिलांचे दु:ख न समजून घेता, असे सरसकट वक्तव्य करणे हे कदाचित अनेक महिलांना आवडलेले नाही. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री या पदावर असताना महिलांचे प्रश्न मांडण्याऐवजी किंवा महिलांचे दु:ख समजून घेऊन, त्यानुसार भाष्य करण्याऐवजी त्यांना स्वत:ला काय वाटते हे सांगणे, नक्कीच कुठेतरी महिलांना खटकले आहे. अशा वेळी महिलांचे म्हणणे ऐकून त्यांची बाजू मांडणे हेच महिलांना अपेक्षित आहे

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is it necesarry for women to get paid leaves during periods read what womens opinions about smriti iranis statement on paid menstrual leave policy for women ltdc ndj