-अर्चना मुळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गौरी आणि तिची बहीण ईश्वरी दोघी मिळून आर्किटेक्ट फर्म चालवायच्या. ईश्वरी वास्तुविशारदतज्ञ होती. गौरी इंटीरियर डेकोरेटर होती. त्याचबरोबर फर्मची आर्थिक जबाबदारी गौरीवरच होती. त्यांच्या फर्मला तीन वर्षे पूर्ण झाली होती. काम खूप विस्तारलं होतं. सतत दोघींची धावपळ सुरू असायची. गौरी फर्मचा सोशल मीडियादेखील हँडल करायची. त्यात फर्मचे मेल चेक करणं, त्याला रिप्लाय करणं हेही असायचं.

एक दिवस व्यवसायाच्या दृष्टिकोनातून एक मोठ्ठं काम त्यांच्या फर्मला मिळण्याची शक्यता होती. म्हणून ती घाईघाईत मीटिंगसाठी गेली. लगेचच मीटिंग चालू झाली. त्याच वेळी तिला एक महत्त्वाचा मेल आल्याचं नोटिफिकेशन दिसलं. तिने मीटिंगमधल्या लोकांना सॉरी म्हटलं. खूप महत्त्वाचा मेल असल्याचं सांगून रिप्लायसाठी वेळ घेतला. तो मेल उघडला. मेलवर विचारलेली सगळी माहिती पटपट दिली. कारण तिला मीटिंगही तेवढीच महत्त्वाची होती. ती मीटिंग आटोपून ती तिच्या फर्ममध्ये आली. थोड्या वेळाने तिला एक पेमेंट करायचं होतं म्हणून ऑनलाइन खातं उघडलं तर तिच्या खात्यात पैसेच नव्हते. असं कसं झालं. तिला काही कळेचना. पटकन तिने बँकेत फोन केला. बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिचं खातं ब्लॉक केलं. तिने ईमेल कुठून आलाय काहीही वाचलं नव्हतं. गौरीला आलेल्या मेलमध्ये तुमचं बँक अकाऊंट कुणी तरी लॉगइन केलंय. जर तुम्ही आता ते लॉगइन केलं नसेल तर दिलेल्या लिंकवर लगेच क्लिक करा असा तो मेल होता. क्लिक करून ती बँकेच्या खोट्या वेबसाइटवर पोहोचली. तिथे तिने बरीच माहिती दिली आणि फसली.

आणखी वाचा-ग्राहकराणी: जाहिरातींना भुलताय?

डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट अशी बरीच ओळखपत्रं आजकाल आपल्याकडे असतात, जी अनेक ठिकाणी आपली ‘ओळख’ सिद्ध करतात. अलीकडे तर आधारकार्डशिवाय कामं होतंच नाहीत. ट्रॅफिक पोलीस, बँक खातं, पैशांचे व्यवहार करताना ही ओळखपत्रं दाखवावी लागतात. जेव्हा आपल्याला तुमचं अकाऊंट कुणी तरी लॉगइन केलंय, केवायसी नसल्यानं तुमचं खातं बंद झालं आहे, तुम्ही केलेला नोकरीचा अर्ज मान्य झालाय, तुम्ही आमचे लकी कस्टमर आहात, तुम्हाला फ्री गिफ्ट मिळालं आहे, असं सांगून उर्वरित माहिती भरायला लावतात. असा मेसेज मेल, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामवर येतो. जिथे आपण ॲक्टिव्ह असतो आणि घाईगडबडीने अर्धवट वाचून किंवा कधी घाबरून, कधी आनंदात आपली माहिती देतो. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकतात हेच खरं.

आपल्या या माहितीचा उपयोग करून जशीच्या तशी नवी कार्ड्स तयार केली जातात. आपली माहिती विकलीही जाऊ शकते. क्रेडिट कार्डचा मोठमोठी बिलं वापरण्यासाठी उपयोग होऊ शकतो. एखाद्या गुन्हेगाराला परराज्यात, परराष्ट्रात निघून जाजला मदत करण्यासाठी या माहितीच्या आधारे त्यांची खोटी ओळख पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा तयार करतात. अशा वेळी आपले कार्ड्स आपल्याच जवळ असतात. तरीही आपली ‘ओळख’ चोरी होते. कधीकधी न केलेल्या गुन्ह्यात आपण अडकू शकतो. विशेष करून ऑनलाइन खरेदी, विविध फॅशन्सचे कपडे, अनेकविध वस्तूंसाठीच्या या पोर्टल असू शकतात. यांच्या जाहिरातीच्या लिंक्स आपल्याकडे येतात. अमुक बक्षीस मिळाल्याचं सांगून थोडी रक्कम भरायला सांगतात. काहीबाही कारणं सांगून पुन:पुन्हा पैसे भरायला लावतात. पैसे भरताना माहितीही विचारून घेतात. अशा वेळी माहिती न देणं यातच शहाणपणा असतो. ही चोरी करणारे लोक जे सहज फसू शकतात अशा लोकांच्या शोधात असतात. तेव्हा स्त्रियांनी थोडं टेक्नोसेव्ही व्हावं, तंत्रज्ञान समजून घ्यावं, जेणेकरून फसगत होणार नाही.

आणखी वाचा-ग्राहकराणी: एका वर्षात दामदुप्पट?

‘ओळख’चोरीमुळे नोकरी- व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, गृहिणी, नोकरी शोधणाऱ्या तरुणी यापैकी कुणाचीही फसवणूक होऊ शकते. अशा फसवणुकीला जर कुणी बळी पडली असेल तर पहिल्यांदा तिने ॲप्स मॅनेजरमध्ये जाऊन ऑनलाइन स्ट्रीमअप अनइन्स्टॉल करावं.

तुमची ‘ओळख’ चोरी होऊ नये म्हणून –

१) कोणत्याही वेबसाइट लिंकची सुरुवात http:// अशी असते. बहुतेक वेळा फक्त http:// बघून लिंक उघडली जाते. ती फसवी लिंक असू शकते. तिथे क्लिक करू नका. लिंक पूर्ण पाहा. ती योग्य असेल तरच क्लिक करा. २) स्वत:ची कोणतीही महत्त्वाची माहिती ऑनलाइन कोणालाही देऊ नये. ३) वेळोवेळी एटीम, मोबाइल, यूपीआय पिन यांचे पासवर्ड बदलत राहावेत. हे पिन सहजासहजी कुणाला अंदाज येऊ नये असे असावेत. आपल्याकडे एकापेक्षा जास्त कार्ड्स असतील तर सगळ्या कार्ड्सना एकच पिन ठेवू नये. ४) कुणीही टीम व्ह्यूवर किंवा एनी डेस्कसारखे रिमोट ॲक्सेस सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगत असेल तर तसे करू नये. फसगत होण्याची शक्यता वाढते. ५) आपल्या डेबिट, क्रेडिट कार्डचे तपशील ई काॅमर्स ॲपमध्ये सेव्ह करू नयेत. ६) आर्थिक व्यवहारासाठी सार्वजनिक किंवा अनोळखी ठिकाणचं विनामूल्य वायफाय कधीच वापरू नये. ७) फसवणूक झालीच तर सायबर क्राइम सेल किंवा सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. ८) ज्या बँकेचं कार्ड असेल त्या बँकेतील खातं ब्लॉक करायला सांगावं. खात्याचा पासवर्ड त्वरित बदलावा.

लेखिका समुपदेशक आहेत.

archanamulay5@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is someone stealing your identity know what to do if something happen like this mrj
Show comments