चारुशीला कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आज तुला थोडा वेळ आहे का? बाबांना आज दुपारी पुन्हा दवाखान्यात न्यायचं आहे. त्यांचा मूळ आजार पुन्हा डोकं वर काढतोय. मी मागच्या वेळी त्यांना घेऊन गेले होते, आजही गेले असते, पण घरचं आवरून कामावर वेळेवर पोहोचायलाच दमछाक होते. त्यात आज बॉसची महत्त्वाची मीटिंग आहे. त्यामुळे कारण सांगून बाहेर नाही निघता येणार मला… अरे, तू काही बोलत का नाहीयेस?” श्यामली नीरजचा रागरंग पाहून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती.

नीरज मात्र ऐकून न एकत असल्यासारखा वागत होता. शेवटी बेफिकीरपणे एक तिरका कटाक्ष टाकत तो म्हणाला, “मला वेळ नाहीये. मला महत्त्वाची कामं असतात.”

श्यामली जरा चिडूनच म्हणाली, “म्हणजे? माझं ऑफिसचं काम महत्त्वाचं नाही का? एखाद्या वेळी तू अर्धा दिवस सुट्टी घेऊन गेलास तर?…”

“हो. आता तेवढंच बाकी आहे. मला कामाचं किती प्रेशर असतं ते तुला काय कळणार म्हणा?… तुला वाटत असेल, की ऑफिसमध्ये फक्त चकाट्या पिटायला जातो मी! आणि तू दिलेला मिळमिळीत डब्बा संपवत घरी येतो!” तिला लागेल असं बोलून नीरज बॅग घेऊन घराबाहेर पडलादेखील.

हेही वाचा.. कृष्णसख्याच्या शोधातल्या असंख्य द्रौपदी आणि दुःशासनांची दुनिया!

श्यामली तो गेला त्याच दिशेने पाहत राहिली! खरं तर बाबा म्हणजे त्याचे वडील- तिचे सासरे. आजवर त्यांचा आजार, पथ्यपाणी हे सगळं श्यामलीनं व्यवस्थित सांभाळलं होतं. कित्येकदा ते तिच्यावर चिडचिड करत. पण ‘म्हातारपण हे दुसरं बालपण’ असं मनात धरून ती त्यांची सोय पाहात असे. अगदी त्यांच्या तालावर नाचत असे म्हणा ना! फक्त आता तिलाही मॅनोपॉझचा बराच त्रास व्हायला लागला होता. त्यामुळे नोकरी आणि हे सर्व झेपत नव्हतं. पहिल्यांदाच तिनं नीरजची मदत मागितली, तर त्याचं हे उत्तर! ‘म्हणजे त्याचे बाबा ही फक्त आणि फक्त माझीच जबाबदारी आहेत का?’ हा प्रश्न तिला अनुत्तरीत करून गेला.

श्यामली-नीरजसारखी अनेक जोडपी आहेत. कधी एकच मुलगा किंवा मुलगी म्हणून, तर कधी नाईलाज म्हणून, वृध्दाश्रमाचा रस्ता नको बघायला म्हणून वृद्ध पालक मुलांबरोबर राहणं पसंत करतात. उतारवयात आईवडिलांची जबाबदारी त्यांच्या अपत्यांनी घ्यायला हवी, हे योग्य. पण खूप घरांमध्ये हे काम प्रामुख्यानं घरातली बाई करत असते, असं दिसून येतं. म्हणजे पुरूष आपल्या आई-वडिलांकडे लक्ष देत नाहीत, असं आम्हाला मुळीच म्हणायचं नाहीये. पण वृद्धत्वामध्ये त्यांचं पथ्यपाणी सांभाळणं, लहान लहान गोष्टींवरून ते धरत असलेले आग्रह, काही वेळा हट्ट सांभाळणं, दवाखान्याच्या चकरा, फिरायला घेऊन जाणं, अशा गोष्टी घराघरांमधल्या बायका करत असतात, अशी उदाहरणं खूप दिसतात. यालासुद्धा काही पुरूष अपवाद असतील. पण घरातला कर्ता पुरूष जेव्हा आपल्या नोकरीत गुंतलेला असतो, तेव्हा स्त्रीचं करिअर त्याच्यापेक्षा कमी महत्त्वाचं मानलं जाऊन तिनं घरातल्या वृद्धांसाठी अधिक वेळ द्यावा, अशी अपेक्षा अनेक कुटुंबांत धरली जाते.

हेही वाचा… गच्चीवरची बाग: परसदारी श्रावण घेवडा

श्यामलीपुढे नेमका हाच गुंता होता. श्यामली या विचारात असतानाच तिनं एकीकडे बाबांसाठी डॉक्टरांची अपॉईंटमेंट घेतली. कामाची वेळ सांभाळून लंच ब्रेकच्या आधी घरी परत आली आणि बाबांना डॉक्टरांकडे घेऊन गेली. त्यांना घरी सोडून पुन्हा कामावर! तिच्या या चकरा पुढे सुरूच राहिल्या. या सगळ्यात श्यामलीचं ऑफिसच्या कामाकडे दुर्लक्ष होत राहिलं. तिच्या मैत्रिणी या तिच्या या गुंत्यावर वेगवेगळे पर्याय सुचवत होत्या. काहींनी सांगितलं, की नीरजशी स्पष्टपणे बोल, तर काहींनी सुचवलं, बाबांसाठी ‘केअरटेकर’ नेम. काहींनी थेट बाबांना वृध्दाश्रमात ठेवण्याचा सल्ला दिला. तिला खरं यातले काही नको वाटत होतं. तिला नीरजची मदत घेऊन हा तिढा सोडवायचा होता. पण नीरजनं स्वत: आपली जबाबदारी ओळखावी, बायकोचे कष्ट ओळखावेत, असं तिला वाटत होतं. ती त्याच्यापेक्षा पैसे कमी मिळवत असली, तरी तिच्याही करिअरला महत्त्व आहे, हेही त्यानं ओळखावं असं तिला वाटत होते. पण श्यामली मुकाट्यानं सर्व करतेय म्हटल्यानर नीरजला त्याचीच सवय झाली होती. तो तिला सुरूवातीपासूनच गृहित धरत होता.

अशाच एका सायंकाळी तिनं नीरजला पुन्हा एकदा बोलतं करण्याचा प्रयत्न केला. संसारातल्या लहानमोठ्या गोष्टी गप्पा मारता मारता सांगितल्या. जबाबदाऱ्या, मुलांचा अभ्यास, त्यांची आजारपणं, तिच्या ऑफिसातल्या कामाचा ताण, सासऱ्यांचं आजारपण, त्यांचा विक्षिप्त स्वभाव, हे सर्व एकदम हाताळणं तिला आता झेपेनासं होतंय, हे सुचवलं. तिला त्याच्या मानसिक आधाराबरोबर आता त्याचा प्रत्यक्ष मदतीचा हातही हवा होता. घरातील आर्थिक बाजु भक्कम रहावी यासाठी तिने तसाही स्वत: काम करत पुढाकार घेतला होता. या उतार वयात सासऱ्यांना वृध्दाश्रमात किंवा अन्य नातेवाईकांकडे ठेवत ते आपल्या संसारातील अडगळ आहे हा शिक्का तिला नको होता.

हेही वाचा… अति वाढलेल्या ‘स्क्रीन टाईम’चा लहान मुलांमधील ‘मेटॅबोलिक सिंड्रोम’शी संबंध!

“नीरज, तुझी नोकरी महत्त्वाची आहेच आणि त्यामुळेच आपली आर्थिक बाजू चांगली राहिलीय, हे मला मान्य आहेर रे… पण आता घरात तुझी थोडीशी मदत मलाही लागतेय… माझीही नोकरी माझ्यासाठी तुझ्याइतकीच गरजेची आहे.” तिनं समजावणीचा सूर पकडला.

त्यावर नीरजनं पुन्हा त्याच्या कामाचा पाढा वाचला. “पाहतो काय करता येईल…” असं सांगत त्या वेळेपुरती सुटका करून घेतली.

म्हणजे ठोस उत्तर नाहीच. श्यामली पुन्हा तिला पडलेल्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात…

lokwomen.online@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is taking care of senior citizens at home the only responsibility of women asj
First published on: 04-09-2023 at 11:30 IST