Neena Gupta : स्त्री-पुरुष समानतेचा मुद्दा वारंवार समोर येतो. सातत्याने स्त्री-पुरुष समानतेसाठी आवाज उठत असला तरी आजही स्त्री-पुरुष समानतेची लढाई सुरू आहे… सोशल मीडियावर स्त्री-पुरुष समानतेविषयी बरीच मते मांडली जातात. नुकतेच प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांनी स्त्री-पुरुष समानतेला धरून एक वक्तव्य केले होते. नीना गुप्ता म्हणाल्या होत्या, “स्त्री आणि पुरुष हे अजिबात सारखे नाहीत. ज्या दिवशी पुरुष गरोदर राहतील तेव्हा आपण स्त्री-पुरुष समान आहोत, असे म्हणू शकतो.” नीना गुप्ता यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
खरं पाहायचं तर आजवर स्त्री-पुरुष समानता ही हक्क आणि अधिकारापर्यंतच सीमित होती, पण नीना गुप्ता यांच्या या वक्तव्याने सीमेच्या पलीकडे जाऊन विचार करायला भाग पाडलं… नीना गुप्ता यांचं वक्तव्य काही लोकांना हास्यास्पद वाटू शकतं, कारण गरोदर राहण्याचा अधिकार देवाने फक्त स्त्रियांच्या वाटेला दिला आहे. मग समानतेविषयी बोलायचं तर याची तुलना कधीही होऊ शकत नाही, असं म्हणणे सहाजिक आहे. पण, चौकटीच्या पलीकडे जाऊन जर विचार केला तर अनेक प्रश्न उभे राहतात..
खरंच स्त्री-पुरुष समानतेसाठी पुरुषांचे गरोदर होणे गरजेचं आहे का?
खरं तर यासाठी आपल्याला सुरुवातीला समानता म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचं आहे. समानता ही फक्त हक्क आणि अधिकारापर्यंतच मर्यादित न राहता सर्वांगीण पातळीवर पुरुषांना आणि स्त्रियांना समान समजले जाणे म्हणजे समानता होय. आजवर स्त्रिया या हक्क आणि अधिकारासाठी लढल्या, पण हक्क आणि अधिकार मिळवताना बाईपण नेहमी त्यांना समानतेपासून दूर नेत होतं, हे वास्तव आहे. “तू स्त्री आहे… तू पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात असली तरी घरी आल्यावर तुला चूल आणि मूल पाहावं लागेल… असं अनेकदा स्त्रियांच्या बाबतीत गृहीत धरलं जायचं. स्त्रियांना मातृत्वाचा अधिकार जन्मतः मिळाला आहे, पण त्याबरोबरच तिला बंधनेही जन्मतः मिळाली आहेत, हे विसरता कामा नये… जरी एका स्त्रीसाठी मातृत्वासारखं दुसरं सुख कोणते नाही, तरी अनेकदा स्त्रियांना याच मातृत्वामुळे आपलं स्वतःचं अस्तित्व विसरावं लागतं, हेही तितकंच खरं आहे. कधी गरोदरपण तिच्या इच्छेनुसार होतं, तर कधी इच्छेविरुद्ध… आजही अनेक महिला गरोदर झाल्यानंतर त्यांच्या करिअरला राम राम ठोकतात. त्यांना जॉब सोडावा लागतो… गरोदर काळात सुट्ट्या मिळतात, पण कामात पडलेली पोकळी पुन्हा भरून काढायला तिला बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो. ‘गरोदर ती… जन्म तिने दिला म्हणून अनेकदा होणाऱ्या मुलाची जबाबदारी तिची’, असे गृहीत धरले जाते… बाळंतपणात घेतलेला ब्रेक कधी मुलाला शाळेत टाकेपर्यंत लांबतो, हे तिलासुद्धा कळत नाही. तिची मनात होणारी घालमेल ही तीच समजू शकते… मग अशात पुरुषाच्या वाटेला ही घालमेल का येत नाही… असे वाटणे सहाजिक आहे…
लग्नापूर्वी एखाद्या जोडप्याने परस्पर सहमतीने शारीरिक संबंध ठेवले, त्यात स्त्री जर गरोदर झाली तर दोष फक्त तिला जातो… कारण बाळ तिच्या पोटात असते म्हणून? अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जिथे अनेकदा लग्नापूर्वी प्रेयसी गरोदर राहिल्यानंतर होणाऱ्या बाळाच्या पित्याने म्हणजे प्रियकराने बाळासह आईचा स्वीकार करायला नकार दिला आहे… त्या गरोदर प्रेयसीच्या मनात पुरुषाच्या वाटेला गरोदरपण यावा असे वाटलेच असेल… येथे स्त्री-पुरुष समानता दूरपर्यंत कुठेच दिसत नाही.
पुरुष नैसर्गिकरित्या नाही, पण कृत्रिमरित्या गरोदर होऊ शकतो का?
खरं तर नैसर्गिकरित्या पुरुष गर्भवती होऊ शकत नाही, कारण त्याच्याकडे गर्भधारणेसाठी आवश्यक असलेले अंडी आणि गर्भाशय नसते. त्याच्याकडे फक्त शुक्राणू असतात. याशिवाय आयव्हीएफ आणि गर्भाशय प्रत्यारोपणाद्वारेसुद्धा पुरुष गर्भवती होऊ शकत नाही. पुरुषाच्या शरीरात गर्भाशयाचे प्रत्यारोपण करणे इतके सोपे नाही. पण, एब्डॉमिनल गर्भधारणेमुळे पुरुष आई होऊ शकतो. गर्भाशय नसलेले पुरुष असो की महिला, याद्वारे गर्भवती होऊ शकतात. एब्डॉमिनल गर्भधारणा इतकी सोपी नाही… या दरम्यान व्यक्तीचा जीवसुद्धा जाऊ शकतो. (लोकसत्ताच्या जुन्या लेखातून)
पुरुषांनी गरोदर होणे आणि मातृत्व स्वीकारणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत?
गरोदर होणे आणि मातृत्व स्वीकारणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. अनेक पुरुष मातृत्व स्वीकारताना दिसून येतात… पती-पत्नीचा घटस्फोट झाला असो किंवा जोडीदाराचा मृत्यू झाला असेल अशावेळी पुरुष मातृत्व स्वीकारतात. लग्न न करता मातृत्व स्वीकारणारे तुषार कपूर आणि करण जोहर ही चांगली उदाहरणे आहेत. पुरुषांनी मातृत्व स्वीकारणे हे निश्चितच त्यांच्यासाठी आव्हानात्मक असले तरी यापेक्षा पुरुषांनी गरोदर होणे हे त्याच्या कितीतरी पटीने आव्हानात्मक असेल, हे तितकेच खरे आहे.
हेही वाचा : जागरुकता वाढली अन् तक्रारीही! महिलांविरोधातील अन्याय थांबणार तरी केव्हा?
नीना गुप्ता यांचे वैयक्तिक आयुष्य
” ज्या दिवशी पुरुष गरोदर राहतील तेव्हा आपण स्त्री-पुरुष समान आहोत, असे म्हणू शकतो”, असं म्हणणाऱ्या नीना गुप्ता यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी तुम्हाला माहिती आहे का? नीना गुप्ता यांचं वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू विवियन रिचर्डशी अफेअर होतं. या नात्यात असताना त्या गरोदर राहिल्या आणि मसाबा नावाच्या मुलीला त्यांनी जन्म दिला. नीना यांनी एकल माता बनून मसाबाचा सांभाळ केला.
‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या एका मुलाखतीत नीना सांगतात, “गरोदर असल्याचं कळल्यावर मला खूप आनंद झाला होता, कारण मी विवियन रिचर्डवर प्रेम केलं होतं. मी त्याला फोन केला आणि विचारलं की, ‘तुला हे मूल नको असेल तर मलाही नकोय.’ तेव्हा तो म्हणाला होता की, ‘मला हे मूल तुझ्यासाठी हवंय.’ बाळाला जन्म देऊ नकोस, असे अनेकांनी मला समजावून सांगितले. कारण विवियन रिचर्ड आधीच विवाहित होता आणि मी त्याच्याशी लग्न करू शकत नव्हते.”
त्या पुढे सांगतात, ” आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा आपण आंधळे असतो आणि प्रेमासंदर्भात निर्णय घेताना आपण कुणाचेही ऐकत नाही, मीसुद्धा तशीच होती.”
नीना यांच्या वैयक्तिक आयुष्यात जे काही घडले, त्यावरून आपण अंदाज लावू शकतो की एका पुरुषाचे गरोदर राहणे त्यांना का महत्वाचे वाटत असावे. त्यांनी एकल माता म्हणून केलेला संघर्ष खूप मोठा असावा, ज्याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. मसाबाला लहानाचं मोठं करताना त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा विचारही कधी केला नाही. दरम्यान, वयाच्या पन्नाशीत त्यांनी विवेक मेहराबरोबर लग्न केले. वयाच्या पन्नाशीत लग्न केल्यामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या होत्या.