डॉ. किशोर अतनूरकर
‘डॉक्टर, आजकाल मला व्हाईट डीस्चार्जचा खूप त्रास होतोय, पांढरं पाणी खूप जातंय. त्यामुळे अशक्तपणा आलाय आणि त्यामुळेच की काय कंबरसुद्धा खूप दुखत आहे.’ चाळिशीची वनिता तक्रार घेऊन आली होती. तिच्याशी बोलताना लक्षात आलं की, त्याविषयी गैरसमजच जास्त असतात. कारण कित्येक वर्षांपासून स्त्रियांची तक्रार मी ऐकत आलो आहे.
अगदी सुरुवातीलाच स्पष्ट सांगतो की, व्हाइट डीस्चार्ज (श्वेत प्रदर किंवा पांढरं पाणी) मुळे अशक्तपणा येतो किंवा अशक्तपणा आल्यामुळे व्हाईट डीस्चार्ज होतो हे चूक आहे. तसेच व्हाईट डीस्चार्जमुळे कंबर दुखत नसते किंवा कंबर दुखल्यामुळे व्हाईट डीस्चार्ज होतो हे देखील चूक आहे. हा गैरसमज स्त्रियांच्या मनात पिढ्या न् पिढ्या कायम आहे. ग्रामीण भागातील अशिक्षित मुली किंवा स्त्रियांच्याच नाही तर शहरातील सुशिक्षित मुली आणि स्त्रियांच्या मनातून हा गैरसमज सहजासहजी जात नाही. व्हाईट डीस्चार्जचा त्रास एकदाही झाला नाही अशा स्त्रियांची संख्या खूपच कमी असावी. विवाहित स्त्रियांमध्ये तर हा त्रास फार दिसतो. अविवाहित मुलींना देखील व्हाईट डीस्चार्जचा त्रास होऊ शकतो, पण त्याचं प्रमाण कमी असतं. अविवाहित तरुणी जर लैंगिक दृष्टीने सक्रिय (sexually active) असल्यास, तिला हा त्रास होण्याची शक्यता असते. वास्तविक पाहता, जननक्षम वयात योनी मार्गात थोडासा ओलावा हा असतोच. कधी-कधी या नॉर्मल असलेल्या ओलाव्याचं प्रमाण थोडंसं जास्त झालं तर लगेच ती मुलगी किंवा स्त्री काळजीत पडते. का बरं हा त्रास होत असेल? मग कुणीतरी (सहसा मैत्रीण किंवा आई) सांगते, ‘अगं! अशक्तपणामुळे होतं असं कधी-कधीं.’
हेही वाचा >>>अल्पवयीन मुलीशी ‘प्रेमळ’ संबंध ठेवल्याने जामीन मंजूर?
अर्धवट ज्ञान आणि गप्पा मारायची सवय यामुळे गैरसमज पसरायला वेळ लागत नाही. व्हाईट डीस्चार्जच्या बाबतीत नेमकं हेच झालं आणि तेदेखील खूप मोठ्या प्रमाणावर. हवेतून ज्याप्रमाणे विषाणू (Viruses) श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करतात आणि ताप, सर्दी खोकला येतो; ज्याप्रमाणे दूषित पाणी पिण्यात आल्यास, पाण्यात असलेल्या जीवाणू (Bacteria) मुळे पचनक्रिया बिघडून उलटी/पातळ शौचास होणे असा त्रास होतो तसंच व्हाईट डीस्चार्ज देखील इन्फेक्शन किंवा रोगजंतूंच्या प्रादुर्भावामुळे होत असतो. या इन्फेक्शनसाठी प्रामुख्याने तीन प्रकारचे रोगजंतू कारणीभूत असतात. क्लॅमिडीया ( Chlamydia ) किंवा अन्य बॅक्टेरिया, ट्रायकोमोनास आणि फंगस( बुरशी ) या रोगजंतूंमुळे व्हाईट डीस्चार्ज होतो. बाधित पती अथवा पत्नीकडून लैंगिक संबंधातून एकमेकांना हे इन्फेक्शन होऊ शकतं. पती-पत्नी दोघांवर एकाच वेळेस योग्य तो औषोधोपचार दोन आठवड्यासाठी करावा लागतो. त्यावेळी काही ‘पथ्य’ पाळणं अपेक्षित असतं. एक साधारणतः ४० वर्षाची स्त्री व्हाईट डीस्चार्जच्या त्रासासाठी माझ्याकडे आल्यानंतर मी काही गोळ्या लिहून दिल्या. आठ-दहा दिवसानंतर त्रास कमी झाला नाही म्हणून ती परत आली. ‘मला पांढऱ्या कपड्याचा इतका त्रास होतो की, तो कपड्याला लागलेला पांढरा डाग धुतला तर, कपडा फाटतो, पण डाग निघत नाही.’ असे तिचे शब्द होते. माझ्याकडून एखादा मोठ्या आजाराचं निदान चुकायला नको म्हणून मी त्यांची नेमकी आणि आवश्यक ती तपासणी केली. या तपासणीनंतर त्यांच्या योनीमार्गात कुठलंच इन्फेक्शन नसल्याचं किंबहुना तो मार्ग अगदी स्वच्छ असल्याचं लक्षात आलं. मात्र त्यांच्याशी बोलत असताना, त्या कौटुंबिक समस्यांमुळे निराश, अस्वस्थ आहेत, असं लक्षात आलं. त्यांना मी तुमच्या श्वेत पदराचा त्रास कमी व्हावा म्हणून गोळ्या बदलून देतो असं सांगून नैराश्य (डिप्रेशन) कमी होण्याच्या गोळ्या दिल्या. त्यांनी त्या घेतल्या आणि त्यांचा व्हाईट डीस्चार्जची समस्या गायब झाली. मला त्या म्हणाल्या, ‘या गोळीमुळे मला खूप बरं वाटतंय, माझा व्हाईट डीस्चार्ज कमी झाला.’
व्हाईट डीस्चार्जचा त्रास हा काही स्त्रियांमध्ये मनोकायिक (Psychosomatic ) देखील असू शकतो असा मला नंतर काही काळ काही स्त्रियांवर या कारणासाठी उपचार करताना अनुभव आला. त्यामुळे स्त्रियांनी मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणं खूप गरजेचं आहे, असं जाणीवपूर्वक सांगावंसं वाटतं.
(डॉ. किशोर अतनूरकर स्त्रीरोगतज्ञ आहेत)