डॉ. तारा त्यांचं क्लिनिक संपवून घरी निघाल्या. कारमध्ये बसल्या. थोडं निवांत झाल्यावर त्यांना त्यांच्या छोट्या बहिणीसम मैत्रिणीची म्हणजे ओवीच्या मेसेजची आठवण झाली.
‘तारादीदी, मला आजच तुला भेटायचं आहे. आपल्या नेहमीच्या कॅफेत भेटू या,’ हा तिचा मेसेज वाचून त्यांनी होकारार्थी निरोप पाठवून दिला आणि गाडी कॅफेकडे वळवली. कॅफेत ओवी वाटच बघत होती. तिचा मलूल चेहरा बघूनच तारा यांना काहीतरी बिघडलंय याची जाणीव झाली.
“काय झालं ओवी? इतकी का कोमेजलीस? तब्येत बरी नाही का? का गं, हिमेशची काही समस्या आहे का?”
“तब्येत चांगली आहे, पण दीदी, कसं सांगू? हिमेशला ‘तसल्या’ फिल्म बघण्याचा नाद लागला आहे. रात्रीचं जेवण झालं, की बाकी सगळं सोडून देऊन जे मोबाईल घेऊन बसतो की त्याला दुसरं कशाचं भानच राहात नाही. मला ते खूप घाणेरडं वाटतं. त्याचं हे असं वागणं नॉर्मल आहे का?”
“हे बघ, तरुणांचं पॉर्न बघणं ही खरंच खूप सर्वसामान्य बाब आहे. हिमेश जेव्हा तारुण्यात पदार्पण करत होता तेव्हा कदाचित त्याला अशा फिल्म्स बघण्याची फारशी संधी मिळाली नसेल. त्याची ती सुप्त इच्छा आणि लैंगिक आनंद मिळवण्याची उर्मी दाबल्या गेली असेल, पण आता त्याला तसा मोकळा वेळ आणि संधी मिळतेय म्हणून तो थोडा नादी लागला असेल इतकंच. त्यात काळजी करण्या सारखं काहीच नाही.”
हेही वाचा : ४९ व्या वर्षी शिकल्या स्कुबा डायव्हिंग; आज समुद्र संरक्षणासाठी करतायत मोलाचे काम; कोण आहेत उमा मणी?
“फक्त तेवढंच असतं तर मला आक्षेप नसता गं, पण त्या फिल्ममध्ये दाखवतात तसे कपडे आपण घालून बघू, तसे नाटकी वागून बघू, असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा मला ते नको वाटतं. दोघांमधील नाजूक क्षण असे स्क्रिप्ट लिहिल्यासारखे कृत्रिमपणे जगायचे असतात का? मला हे सगळं नकोसं झालं आहे. कुठलीही सवय जेव्हा व्यसन होऊ लागते तेव्हा जगण्यातील नैसर्गिकता हरवते असं नाही वाटतं?”
“तो तुला शारीरिक संबंध ठेवताना काही अनैसर्गिक कृती करण्याचा आग्रह करतो का? कारण अनेकदा असं होतं, की त्या फिल्म्समध्ये अनेक कृती फारच बीभत्स पद्धतीनं दाखवतात. खऱ्या पती-पत्नी मधील ते नाजूक क्षण असे बाजारू नसतात ना. त्यात प्रेमाचा ओलावा असतो, हळूवार भावना असतात, म्हणून विचारलं, की तो तुझ्याशी रानटीपणाने वागतो का?”
“ नाही. अद्याप तरी नाही, पण आपण नाटकातले पात्र आहोत आणि ते बोलतात तसे संवाद म्हणत प्रेम फुलवू असं म्हणतो.
शिवाय सतत पॉर्न बघून त्याच्या दैनंदिन क्रियाशीलतेवर वाईट परिणाम होत असल्याचं जाणवतंय मला. मित्रांबरोबर जात नाही, आम्हीही कुठे बाहेर फिरायला जात नाही, कुणी पाहुणे आले तर त्यांना वेळ द्यायचा नाही. अगं, परवा त्याच्या सख्ख्या बहिणीने जेवायला बोलावलं होतं तर तिथेही न जाता घरात बसून फिल्म्स बघत होता. काय सांगू.”
हेही वाचा : समुपदेशन : ‘लाँग डिस्टन्स’ लग्न टिकतात?
“हे असं असेल तर त्याला समजावून सांगण्याची गरज आहे. त्याची सौरभशी, तुझ्या भावाशी चांगली मैत्री आहे ना. सौरभने समजावून सांगितल्यावर त्याला त्याच्या वागण्यातला अतिरेक नक्कीच लक्षात येईल. सौरभ व्यवस्थित बोलेल हिमेशशी. त्याने समजावूनही फरक नाही पडला तर त्याला आपण समुपदेशनासाठी डॉ. सुधांशू यांच्याकडे घेऊन जाऊ. आवड आणि व्यसन यामध्ये फरक आहे हे त्याला नीट समजणं आवश्यक आहे. त्याला तबला वाजवायला आवडायचं ना गं? आपण त्याला मुद्दाम नवीन तबला भेट देऊ. त्याच्या त्याच्या जुन्या छंदाची आठवण येईल. मग आपोआपच त्याचं पॉर्नमधील लक्ष कमी होईल बघ. लैंगिकता आणि त्यातून मिळणारी शारीरिक मानसिक तृप्ती यासाठी आपल्या रोजच्या आयुष्यात किती वेळ द्यायचा याचं भान प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. आयुष्यात त्या व्यतिरिक्त असंख्य गोष्टी आहेत, ज्या आपलं जीवन परिपूर्ण करत असतात. तुम्हाला एखादं अपत्य झालं, की त्याच्या या सवयीला नक्कीच आळा बसेल. तू काळजी नको करूस, ही एक तात्पुरती ‘फेज’ आहे. आपण यातून नक्की मार्ग काढू.”
डॉ. तारादीदीनं इतकं छान समजावून सांगितल्यावर ओवीची तगमग थोडी कमी झाली. तिनं लगेच तिच्या सौरभदादाला फोन केला. तिच्या डोक्यावरचं फार मोठं ओझं कमी झालं होतं.
adaparnadeshpande@gmail.com