कॅट ही देशातील सर्वांत कठीण आणि सर्वाधिक मागणी असलेल्या परीक्षांपैकी एक म्हणून ओळखली जाते. प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIMs) आणि भारतातील इतर प्रमुख व्यावसायिक स्कूलमधील प्रवेशासाठी ही परीक्षा महत्त्वाची मानली जाते. देशातील प्रतिष्ठित संस्थांमधून एमबीए करू इच्छिणारे तरुण ‘कॅट’ परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करतात. आज आपण अशाच एका महिलेबद्दलची माहिती घेणार आहोत; जी दिल्लीची रहिवासी आहे.
दिल्लीची रहिवासी असलेल्या इशिका गुप्ता हिने कॅट परीक्षा २०२३ (CAT 2023)मध्ये उत्कृष्ट गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले. तिने प्रवेश चाचणी कॅट २०२३ मध्ये उत्कृष्ट म्हणजे ९९.९९ टक्के इतके गुण मिळवले आणि एवढे गुण मिळवणारी ती पहिली महिला उमेदवार ठरली आहे. दिल्लीत जन्मलेल्या आणि वाढलेल्या इशिकाचा शैक्षणिक प्रवास मॅक्सफोर्ड स्कूल, द्वारका येथून सुरू झाला. तेथे तिने दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर दिल्ली पब्लिक स्कूल, द्वारका येथून तिने तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. आता इशिका दिल्लीच्या नेताजी सुभाष टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून गणित आणि संगणक विषय बी.टेक. करते आहे. ती २०२४ मध्ये तिच्या अंतिम वर्षाच्या महाविद्यालयीन परीक्षांना बसणार आहे; पण इंजिनीयर क्षेत्रातून आलेल्या इशिकाला तिचे व्यावसायिक कौशल्य वाढवायचे आहे.
इशिकाचे वडील सॉफ्टवेअर इंजिनीयर आहेत आणि आई शिक्षिका आहे. इशिकाला तिच्या सहायक ठरणाऱ्या कुटुंबाकडून नेहमीच प्रेरणा मिळते. तसेच इशिका तिच्या यशाचे श्रेय सातत्यपूर्ण प्रयत्न आणि परीक्षेची तयारी लवकर सुरू करण्याला देते. कारण- मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये तिने परीक्षेसाठी तयारी सुरू केली होती. तिने परीक्षेसाठी अभ्यास तर केलाच; पण त्याचबरोबर अनेक मॉक टेस्टसुद्धा दिल्या. कॅट परीक्षेसाठी मॉक टेस्ट देणे आणि त्यांचे विश्लेषण करणे खूप महत्त्वाचे असते. त्याचबरोबर इशिका सोमवार ते शुक्रवार कॉलेजला जायची आणि कॉलेज संपले की, घरी परतल्यावर ती नियमितपणे ‘कॅट’च्या तयारीसाठी थोडा वेळ द्यायची.
तसेच ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर “या कठीण स्पर्धात्मक परीक्षेत अधिकतर स्त्रिया उत्तीर्ण होतील”, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे. इशिका गुप्ताचा हा एक प्रेरणादायी प्रवास आहे. दुर्दम्य इच्छा, सातत्यपूर्ण प्रयत्न या गोष्टी व्यक्तीला प्रत्येक गोष्ट साध्य करण्यास मदत करू शकतात हे या महिलेने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.