-डॉ. स्मिता प्रकाश जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माधवीचा फोन आला म्हणून मुग्धा घाईघाईनं तिच्या घरी आली. “ मुग्धा अगं, लग्न तीन आठवड्यांवर आलेलं आहे आणि नुपूर म्हणते आहे, मला हे लग्न करायचंच नाही. तूच सांग आता काय करायचं?”
“माधवी अगं, तिच्या मर्जीनंच तर आपण सर्व ठरवलं आहे. साखरपुडा थाटात झाला, सर्व खरेदी मनासारखी झाली, मग आता बिघडलं कुठं?”

“मुग्धा, खरंतर अगदी किरकोळ गोष्ट आहे, पण नुपूरनं त्याचा खूपच बाऊ केला आहे. लग्नाचं कार्यालय तिला जे हवं ते मिळालं नाही. डेकोरेशनच्या बाबतीत तिला फुलांची सजावट न करता ग्रीन वॉलची सजावट हवी होती, पण नचिकेतच्या घरच्यांना ते नको आहे, लग्नाच्या स्वागताच्या वेळेस रेशमी कपड्यांच्या पायघड्या घालू, असं तिचं म्हणणं होतं, पण त्यांना गुलाबाच्या पाकळ्यांच्या पायघड्या हव्या आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. आता तूच सांग व्याही मंडळींचं म्हणणं ऐकून घ्यायला हवंच ना? आज जेवणाचा मेनू ठरवायचा होता. नुपूरनं कितीतरी दिवस आधीच ठरवून ठेवलं होतं की, तिच्या लग्नाच्या जेवणातील स्वीट हे ‘अंगुर मलई’ असेल आणि त्यांना ‘गुलाबजाम’ हा मेनू हवा आहे, जे तिला आजिबात आवडत नाहीत. पण त्यांच्या इच्छेनुसार आम्ही मेनू ठरवला आणि आज ही इतकी रागावली आहे, की मला हे लग्नच करायचं नाही असं म्हणते. मला खूप टेन्शन आलं आहे, तू एकदा तिच्याशी बोलून पाहतेस का?”

आणखी वाचा-“१७-१८ व्या वर्षी रस्त्यात पुरुषाने पकडलं तेव्हा…”, अभिनेत्रीला ‘त्या’ क्षणी झाली स्त्रीत्त्वाची जाणीव, पण ही ओळख हवीये का?

लगेच माधवी म्हणाली, “मुग्धा,अगं तिला तू समजावून सांगावंसं म्हणून मी तुला बोलावलं, पण तू तर तिचीच बाजू घेत आहेस.”
“ माधवी, लग्न नुपूर आणि नचिकेतचं आहे, त्यामुळं तिच्या इच्छेचाही विचार तुम्ही करायलाच हवा. वरपक्षाची बाजू वरचढ असते आणि लग्नात त्यांचंच सगळं ऐकायला हवं अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. आता मुलीही शिकलेल्या आहेत, त्यांनाही त्यांचे विचार, त्यांच्या इच्छा आहेत. मुलींनीसुद्धा त्यांच्या लग्नाची स्वप्न बघितलेली असतात, मग त्यांनी स्वतःच्या इच्छा का दडपून टाकायच्या? माधवी अगं, सर्व गोष्टी नचिकेतच्या किंवा त्याच्या घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणेही होणार नाहीत, नुपूरच्याही मनातील काही गोष्टी पूर्ण करायच्या आहेत हे तू त्यांनाही मोकळेपणानं सांगायला हवंस. ते लोक काय म्हणतील याचा विचार करून तू स्वतःचा ताण का वाढवून घेते आहेस?”

आणखी वाचा-अवघे ३०० रुपये घेऊन घर सोडलेली मुलगी झाली अब्जाधीश; वाचा चिनू कालाचा संघर्षमय प्रवास

आपली बाजू कुणीतरी समजून घेतंय हे नुपूरला छानच वाटलं. ती मावशीच्या जवळ जाऊन बसली, तेव्हा मुग्धानंही तिला जवळ घेतलं आणि म्हणाली, “अगं वेडाबाई, एवढ्याशा कारणावरून असं लग्न मोडण्याची भाषा करायची नसते. तू स्वतः नचिकेत आणि त्याच्या आईवडिलांशी बोलून घे, कदाचित तुला काय हवंय, काय आवडतंय हे त्यांना माहितीही नसेल. तुझ्या आवडीनिवडींचा, विचारांचा तेही आदर करतील, पण एक लक्षात ठेव, सर्वच गोष्टी तुझ्या इच्छेप्रमाणे घडतीलच असं नाही, दुसऱ्याचं मनही वाचता यायला हवं. तू जो निर्णय घेणार आहेस त्याचा तुझ्या आईवडिलांच्या मनावर काय परिणाम होणार आहे, तुझ्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे याचाही विचार व्हायला हवा. तू निर्णय घेतलास पण, आता पुढं काय? हा प्रश्न तुझ्या आईबाबांना सतावतो आहे. तुझ्या आयुष्यात आनंदाचे क्षण यावेत, तू सुखी व्हावीस, म्हणून तर सगळा खटाटोप चालू आहे, तुझ्या आनंदापेक्षा त्यांना काहीही मोठ्ठं नाही. त्यामुळे सगळा नीट विचार करून निर्णय घे.’’

मावशीचं बोलणं ऐकून नुपूर तिच्या गळ्यात पडून रडू लागली. मुग्धानं तिला थोपटलं आणि म्हणाली, “चल, खूप कामं बाकी आहेत, मेंदीसाठी संगीतची तयारी करायची आहे आणि पार्लरमध्ये जाऊन ये, तुला लग्नात खूप छान दिसायचंय ना?”
“हो मावशी,” असं म्हणून नुपूरनं डोळ्यातील अश्रू बाजूला सारले आणि ती कामाला लागली. तिच्याकडं बघून माधवीही निश्चिंत झाली.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smitajoshi606@gmail.com)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is dangerous to rush into any decision mrj
Show comments