इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि त्यांचा जोडीदार आंद्रेया जम्ब्रुनो हे दोघे २०१५ पासून एकत्र, सहजीवनात होते. त्यांना जिनेव्ह्रा नावाची सात वर्षांची मुलगीही आहे. आंद्रेया इटलीमधील ‘मीडियासेट’ या वाहिनीमध्ये काम करतो. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या महिला सहकाऱ्याबद्दल केलेली असभ्य शेरेबाजी उघड झाली आणि स्वाभाविकच त्यावरून टीकाही झाली. यानंतर मेलोनी यांनी आपण विभक्त होत असल्याचे जाहीर केले. मेलोनी नुकत्याच, म्हणजे मागील महिन्यात जी-२० शिखर परिषदेसाठी भारत दौऱ्यावर आल्या होत्या. त्यामुळे स्वाभाविकच, या घटनेची भारतातही बरीच चर्चा झाली.

आपले विभक्त होणे, हे केवळ एका प्रसंगामुळे घडलेले नाही असेही मेलोनी यांनो सूचित केले. ‘वेगळे होण्याची वाटचाल आधीच सुरू झाली होती, आता ते मान्य करण्याची वेळ आली आहे,’ असे मेलोनी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. त्याचवेळी एकत्र घालवलेली काही सुरेख वर्षे, त्यादरम्यान केलेला अडचणींचा सामना आणि मुलीच्या रूपात मिळालेली सुंदर भेट याबद्दल त्यांनी जम्ब्रुनोचे आभारही मानले.

हेही वाचा… गच्चीवरची बाग: इथे विहरती फुलपाखरे

आंद्रेयाने यापूर्वीही महिलांविषयी असभ्य, लैंगिक शेरेबाजी केली होती आणि त्यामुळे तो तेव्हाही वादात सापडला होता. पण त्यावेळी त्याच्या बोलण्याचा गैरअर्थ काढला गेला असे म्हणत मेलोनी यांनी त्याची पाठराखण केली होती. आता मात्र, मेलोनी यांनी त्याला कोणताही पाठिंबा न देता नाते संपवत असल्याचे जाहीर केले.

मेलोनी आणि आंद्रेया या दोघांच्या नातेसंबंधामध्ये कोणताही गुन्हा नव्हता किंवा ते बेकायदा नव्हते, त्यामुळे त्यांच्या नातेसंबंधांवर किंवा ते संपुष्टात येण्यावर कोणतीही शेरेबाजी करणे किंवा न्यायनिवाडा केल्याच्या थाटात मतप्रदर्शन करणे उचित असणार नाही. या घटनेचे काही पैलू मात्र नक्कीच चर्चेत आले आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या देशांमधील भिन्न संस्कृती आणि त्यातही सहजीवनाकडे पाहण्याचा लोकांचा भिन्न दृष्टिकोन, हे प्रामुख्याने दिसून येते.

भारत किंवा ब्रिटन-अमेरिकेसारख्या देशांमध्ये राष्ट्रप्रमुखाने विवाह न करता सहजीवनात राहणे त्या-त्या देशातील नागरिकांना फारसे रुचणार नाही. भारतात विवाह न करता सहजीवनाचे प्रयोग होत असले, कायद्याने मान्यता मिळाली असली, तरी त्याला त्या प्रमाणात सामाजिक आणि कौटुंबिक मान्यता मिळालेली नाही. त्याउलट ब्रिटन-अमेरिकेमध्ये सामाजिक पातळीवर भरपूर खुलेपणा असला तरी राजकीय नेत्यांनी काही बंधने पाळावीत अशी लोकांची अपेक्षा असते. अपली राष्ट्रप्रमुख एकाच वेळी कर्तबगार आणि त्याच वेळी कुटुंबवत्सल असलेली तेथील नागरिकांना आवडते.

हेही वाचा… शासकीय योजना: दिव्यांगांसाठी फिरत्या वाहनांवरील दुकाने

सर्वसामान्य इटालियन व्यक्तीही कुटुंबकबिल्याला महत्त्व देणारी असते. मात्र, मेलोनी या गेल्या वर्षी इटलीच्या पंतप्रधान झाल्या तेव्हा त्यांचे बॉयफ्रेंडबरोबर सहजीवनात राहणे आड आले नाही. या प्रकरणात झालेल्या चर्चेला आणखी एक बाजू आहे. वास्तविक मेलोनी या अगदी पूर्णपणे आधुनिक विचारांच्या नाहीत. उदाहरणार्थ, समलिंगी जोडप्यांनी मूल दत्तक घेण्यास त्यांचा विरोध आहे. त्यांनी जोडीदारापासून विभक्तीची घोषणा केल्यानंतर ‘आता तरी त्यांनी ज्या कुटुंबांना शांतपणे एकत्र राहायचे आहे त्यांना तसे राहू द्यावे’ अशी काहीशी कडवट टीका ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या अधिकारासाठी संघर्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधीने केली. असे काही अपवाद वगळता मेलोनी यांना त्यांच्या निर्णयाबद्दल त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळाला आहे.

एक मात्र खरं, की नवऱ्याने एका स्त्रीबद्दल असभ्य संभाषण केल्यानंतर एक स्त्री विभक्त होण्याचा निर्णय जाहीर करते, ही गोष्ट बहुतेक लोकांना चांगलीच लक्षवेधी वाटली. तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमच्या नवऱ्यानं असं केलं, तर एक स्त्री म्हणून तुमची भूमिका काय असेल?…

lokwomen.online@gmail.com

Story img Loader