Jane Dipika Garrett : जगातील सर्वात प्रसिद्ध सौंदर्य स्पर्धा मिस युनिव्हर्स नुकतीच पार पडली. या स्पर्धेत निकारागुआची शेनिस पॅलासिओस हिने मिस युनिव्हर्स २०२३ चा किताब पटकवला. पण या स्पर्धेत शेनिस पॅलासिओसपेक्षा एका नावाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. ते नाव म्हणजे जेन दीपिका गॅरेट.
अवघ्या २३ वर्षांची जेन मिस युनिव्हर्सची पहिली प्लस साइज मॉडेल बनली आहे. सहसा मिस युनिव्हर्सच्या मॉडेल या सडपातळ असतात आणि त्या स्वत: खूप फीट राहतात. मात्र यंदा या प्लस साइज मॉडेलने सुंदरतेची एक नवीन परिभाषा निर्माण केली आहे. सुंदर दिसण्यासाठी वजन महत्त्वाचं नाही, असं जगाला सांगणाऱ्या जेन दीपिका गॅरेट नेमकी आहे तरी कोण? जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेन दीपिका गॅरेट कोण आहे?

जेन दीपिका गॅरेटने मिस युनिव्हर्स २०२३ मध्ये नेपाळ देशाचे प्रतिनिधित्व करत सहभाग घेतला होता. अमेरिकेत जन्मलेली दीपिका सध्या नेपाळमध्ये राहते. तिने मिस नेपाळचा किताब सुद्धा आपल्या नावी नोंदवला आहे. जेन ही मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभाग घेणारी पहिली प्लस साइज मॉडेल बनली आहे. जेन ही २३ वर्षांची असून तिचे वजन ८० किलो आहे. मॉडलिंगसह ती नर्स आणि बिझिनेस डेव्हलपरसुद्धा आहे. शारीरिक सकारात्मकता आणि महिलांच्या हार्मोनल आणि मानसिक आरोग्यासंदर्भात ती काम करते.

हेही वाचा : IND vs NZ : विराटच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिलेली अनुष्का; पतीच्या यशासाठी पत्नीचा सहभाग किती मोलाचा?

सुंदर दिसण्यासाठी वजन महत्त्वाचं नाही

सौंदर्याची परिभाषा प्रत्येकाची वेगवेगळी असते. जो तो त्याच्या नजरेतून सौंदर्य शोधत असतो. सहसा सुंदर मुली या सडपातळ असतात, असा सर्वसाधारण समज आहे. त्यामुळे वजन जास्त असेल तर अनेक मुलींना अवघडल्यासारखं होतं. वजन कमी करण्यासाठी त्या वाट्टेल ते प्रयत्न करतात, पण मैत्रींनो, सुंदर दिसण्यासाठी वजन महत्त्वाचं नाही. मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभाग घेणारी पहिली प्लस साइज मॉडेल जेन ही एक उत्तम उदाहरण आहे.

वजन हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. काही लोकांना शारीरिक आजार, हार्मोनल बदल आणि वजन वाढीच्या समस्येमुळे सुद्धा लठ्ठपणा येऊ शकतो. सुंदर दिसण्यासाठी वजन कमी असण्याचा अट्टहास धरणे, चुकीचे आहे. सुंदर दिसण्यासाठी मनाची सुंदरता असणे किंवा विचारांमध्ये सुंदरता असणे, आवश्यक आहे. जेन दीपिका गॅरेटनी हे जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेत सहभागी होऊन दाखवून दिले.

हेही वाचा :जागरुकता वाढली अन् तक्रारीही! महिलांविरोधातील अन्याय थांबणार तरी केव्हा?

मिस नेपाळचा किताब आपल्या नावी नोंदवताना जेन दीपिका गॅरेटने २० मॉडेल्सना मागे टाकले होते. मिस नेपाळ जिंकल्यानंतर जेन दीपिका म्हणाली होती, “एखादी महिला कर्व्ही (curvy) असेल तर ती सौंदर्याच्या चौकटीत बसत नाही. मी अशा महिलांचे प्रतिनिधित्व करत आहे ज्या कर्व्ही आहेत, वजन वाढीच्या समस्यांनी ग्रासलेल्या आहेत किंवा ज्या हार्मोनल समस्यांचा सामना करत आहेत.”

खरं तर जेन दीपिका गॅरेट ही लाखो मुलींसाठी प्रेरणा आहे, ज्या दररोज आरशासमोर स्वत:चे वाढलेले वजन बघून संकुचित होतात किंवा टेन्शन घेतात. जेननी अख्ख्या जगाला दाखवून दिले की वजन कधीच सुंदरतेत आडवे येत नाही. त्यामुळे शरीराची ठेवण, रंग, रुप, उंची किंवा वजन इत्यादी गोष्टींवरुन स्वत:ला कमी लेखू नका. तुम्ही जसे आहात तसे सुंदर आहात फक्त विचारांमध्ये सुंदरता गाठण्याचा प्रयत्न करा.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jane dipika garrett nepals first plus sized model miss universe 2023 contestant who establish new definition of beauty ndj
Show comments