UNICEF Survey : भारतीय महिलांना शिक्षणानंतर लगेच लग्नाऐवजी नोकरी करणे महत्त्वाचे वाटते, असे युनायटेड नेशन्स संघटनेच्या युनिसेफने (युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्र्न्स इमर्जन्सी फंड) नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात समोर आले आहे. लग्न करण्याऐवजी नोकरीला प्राधान्य देणे, यावरून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी महिलांची प्रबळ इच्छाशक्ती दिसते.
पुरुषांनी नोकरी किंवा व्यवसाय करावा, पैसे कमवावेत आणि स्त्रियांनी घर सांभाळावे, अशा प्रकारची व्यवस्था पूर्वीपासून आपल्या समाजात होती. पहिल्यापासून पुरुषालाच घरात जास्त मान होता. कारण- तोच एकमेव कमावता माणूस घरात असायचा. त्याचे आणखी एक कारण म्हणजे स्त्रियांना शिक्षण दिले जात नसे. स्त्रीने फक्त चूल व मूल बघावे हीच अपेक्षा तिच्याकडून केली जायची. त्यामुळे एकंदर भारतीय स्त्रियांची सामाजिक, बौद्धिक प्रगती होऊ शकली नाही; पण आता काळ बदलला आहे. आज मुलीला शिकून नोकरी करण्याची इच्छा असते. मुलींना स्वावलंबी व्हायला आवडते. या सर्वेक्षणातून ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे.
UNICEF च्या सर्वेक्षणात काय सांगितले?
नोकरीमध्ये महिलांचा सहभाग लक्षात घेऊन, UNICEF ने एका सर्वेक्षणातून तरुणाईचे मत जाणून घेतले. युनिसेफच्या युवा व्यासपीठ ‘युवा’ आणि यू-रिपोर्टद्वारे आयोजित या सर्वेक्षणात संपूर्ण भारतातील १८ ते २९ वयोगटातील २४ हजारपेक्षा जास्त तरुण-तरुणींनी सहभाग घेतला होता. या सर्वेक्षणात असे समोर आले की, ७५ टक्के तरुण महिला आणि पुरुषांना महिलांनी शिक्षणानंतर नोकरी करणे महत्त्वाचे वाटते.
नोकरी की लग्न?
मुलीच्या शिक्षणानंतर नोकरी आणि लग्न या दोन गोष्टी नजरेसमोर येतात. या दोन्ही गोष्टी त्या त्या पातळीवर आयुष्यात महत्त्वाच्या आहेत. तुम्ही शिक्षणानंतर नोकरी करणाऱ्या महिला पाहिल्या असतील किंवा शिक्षणानंतर लग्नाला प्राधान्य देणाऱ्या महिला पाहिल्या असतील किंवा लग्न करून नोकरी करणाऱ्या महिला पाहिल्या असतील किंवा लग्न करून घरच्या जबाबदाऱ्यांमुळे नोकरी सोडणाऱ्या महिला पाहिल्या असतील.
पूर्वी भारतात महिलांना शिक्षणासाठी खूप संघर्ष करावा लागत असे. शिक्षण पूर्ण असो किंवा अपूर्ण; मुलीचे खूप लवकर लग्न केले जायचे. पण, आता परिस्थिती बदलली आहे. स्त्रियांना आत्मनिर्भरतेचे महत्त्व कळले आहे. स्त्रिया शिकून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी नोकरीला अधिक महत्त्व देताना दिसतात. त्या स्वत:च्या पायावर उभे राहून नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य मिळते आणि जोडीदारावर अलवलंबून राहण्याची गरज भासत नाही. त्यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने नोकरी किंवा व्यवसाय करताना दिसतात.
UNICEF च्या या सर्वेक्षणाविषयी महिलांना काय वाटते, हे जाणून घेण्यासाठी लोकसत्ताने काही महिलांशी संवाद साधला. त्याबाबतची माहिती जाणून घेऊ.
‘शिक्षणासाठी केलेल्या खर्चाची भरपाई म्हणून तरी मुलीनं नोकरी करावी‘
” मी एका सहकारी बँकेत क्लार्क या पदावर आहे. सहा वर्षांपासून मी या क्षेत्रात नोकरी करते. शिक्षणानंतर माझं लगेच लग्न झालं; पण मला नोकरी करायची इच्छा होती. त्यामुळे कुटुंबाच्या सहकार्यानं मी लग्नानंतर नोकरी करण्याचा निर्णय घेतला. पत्नी, सून आणि एका मुलाची आई असताना मी नोकरी करते आणि एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडते आहे. मला वाटतं की, शिक्षण हा कुठल्याही देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, वैज्ञानिक प्रगतीचा पाया असतो. मग त्यात स्त्री-पुरुष हा भेद नसावा. जर एखादा पुरुष शिकून देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देतो; तसाच दृष्टिकोन स्त्रियांच्या बाबतीत लागू झाला पाहिजे. शिक्षण झालं, की लग्न ही कल्पना फार चुकीची आहे. कारण- आई-वडिलांनी मुलाच्या आणि मुलीच्या शिक्षणासाठी समान पैसा खर्च केलेला असतो. त्याची भरपाई म्हणून तरी मुलीनं शिक्षणानंतर नोकरी करणं महत्त्वाचं वाटतं. जेव्हा एक स्त्री बौद्धिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असते तेव्हा ती कुटुंबाला आधार देऊ शकते. स्त्रियांची प्रगती ही संपूर्ण समाजाची प्रगती असते. त्यामुळे शिक्षणानंतर लगेच लग्न करणं हे चुकीचं आहे. घरात स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं ही पुरुषाइतकीच स्त्रियांचीही जबाबदारी आहे.”
– प्राची वाळुंज तिकोणे
‘लग्नानंतर ओळख निर्माण करायची असेल तर नोकरी करावी’
“आमचा नुकताच साखरपुडा झाला. काही दिवसांत आम्ही लग्न करणार आहोत. मी मीडिया क्षेत्रात नोकरी करते. खरं तर नोकरी ही गरज नाही, तर आवड असली पाहिजे. तुम्ही जेव्हा गरजेसाठी जॉब करता, तेव्हा तुम्हाला अनेक नकारात्मक गोष्टींना सामोरं जावं लागतं. पण, जेव्हा तुम्ही आवड म्हणून किंवा आपली ओळख निर्माण करण्यासाठी नोकरी करीत असाल, तर लग्न किंवा वैवाहिक आयुष्य नोकरीच्या मधे येत नाही.
लग्नानंतर तुम्हाला आपली आवड, आपला आदर व ओळख जपायची असेल, तर नोकरी करावी. लग्नाआधीच्या अनुभवावरून व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल राखणं शिकावं. जर तु्म्ही नवऱ्यावर अवलंबून राहून ‘सगळ्या आर्थिक गरजा पूर्ण होतात, तर मी कशाला काम करू?’ हा विचार करून नोकरी सोडत असाल, तर भविष्यात तुम्हाला कदाचित पश्चात्ताप होऊ शकतो.”
– प्रियंका देशमुख
‘प्रत्येक मुलीनं लग्नासाठी नोकरीचा कधीही त्याग करू नये.’
“मी एक गृहिणी आहे. लग्नानंतर पतीच्या नोकरीसाठी मला भारतातून जर्मनीमध्ये स्थायिक व्हावं लागलं. मी लग्नापूर्वी नोकरी करायची; पण आता जर्मनीमध्ये मला नोकरी करणं शक्य नाही. त्यामुळे गृहिणी म्हणून घरची जबाबदारी सांभाळते; पण मला लवकरात लवकर भारतात येऊन माझ्या आवडीच्या क्षेत्रात नोकरी करायची आहे. माझ्या मते- आर्थिक स्वातंत्र्य असणं प्रत्येक स्त्रीसाठी खूप महत्त्वाची बाब आहे. आपल्या देशातली स्त्री-पुरुष असमानतेची रेष पुसायची असेल, तर प्रत्येक मुलीनं लग्नासाठी नोकरीचा कधीही त्याग करू नये. कारण- नोकरी करणं ही गोष्ट स्त्रियांना फक्त आर्थिक सुरक्षितता देत नाही, तर तुमचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्यास मदत करते.”
– सोनाली बानापुरे उंदरे
पुरुषांना नोकरी करणारी पत्नी का पाहिजे?
युनिसेफच्या सर्वेक्षणात ७५ टक्के तरुण महिला आणि पुरुषांना शिक्षणानंतर नोकरी करणे महिलांसाठी महत्त्वाचे वाटते. त्यात पुरुषांना शिक्षणानंतर महिलांनी नोकरी करणे महत्त्वाचे वाटणे, ही खरेच कौतुकास्पद बाब आहे. आज अनेक पुरुष लग्न करण्यापूर्वी मुलगी नोकरी करते का, हे आधी विचारतात. घर सोडून दुसऱ्या शहरात नोकरीसाठी राहणारे तरुण नोकरी करणाऱ्या मुलीला पत्नी म्हणून निवडण्यास प्राधान्य देतात. आर्थिक जबाबदारी वाटून घेणे त्यांना अधिक सोईस्कर जाते. त्यामुळे पुढे लग्नानंतर घर, मुलांचे शिक्षण इत्यादी लहान-मोठ्या जबाबदाऱ्या ते एकत्रितपणे सहज पेलू शकतात.