आजपर्यंत आपण अनेकदा भारतीय महिलांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा, कला यांसारख्या क्षेत्रांत कमावलेल्या यशाबद्दल वाचले आहे, ऐकले आहे. मात्र, २६ मे २०२२ रोजी गीतांजली श्री यांना आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक (International Booker Prize) मिळाले असून, हे पारितोषिक पटकावणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या होत्या. त्याबद्दल अगदी निवडक व्यक्तींना माहिती असावी. गीतांजली यांना यांच्या ‘टॉम्ब ऑफ सँड’ [Tomb of Sand] नावाच्या हिंदी कादंबरीसाठी पुरस्कार मिळाला होता. अरुंधती रॉय आणि इतर अनेक कादंबरीकारांनी जरी याआधी हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकला असला तरीही, मूळ हिंदी भाषेत असणाऱ्या आणि नंतर डेझी रॉकवेलने इंग्रजीत अनुवाद केलेल्या पुस्तकासाठी पुरस्कार मिळवणाऱ्या गीतांजली मात्र पहिल्या ठरल्या आहेत.

गीतांजली श्री यांचा सुरुवातीचा प्रवास

गीतांजली श्री यांचा जन्म १२ जुलै १९५७ साली उत्तर प्रदेशातील मणिपूर येथे झाला होता. मात्र, गीतांजली यांचे वडील सरकारी सेवक होते. त्या नोकरीमुळे त्यांना सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहावे लागत असे. त्यामुळे त्यांना लहानपणी पटकन इंग्रजी भाषेतील एखादे लहान मुलांचे पुस्तक वाचण्यासाठी मिळत नसे. म्हणून मग गीतांजली ज्या मिळतील, त्या हिंदी भाषेतील कादंबऱ्या वाचत राहिल्या. या सर्व गोष्टींमुळे, तसेच उत्तर प्रदेशातील संगोपनामुळे गीतांजली यांचे हिंदी भाषेशी नाते अधिकत्वाने जुळत गेले.

हेही वाचा : अंबानींचे प्री-वेडिंग ते बॉलीवूड चित्रपटांमध्ये मेहेंदी कलाकार म्हणून कोणाला आहे सर्वाधिक मागणी? जाणून घ्या…

शालेय शिक्षणांनंतर दिल्लीतील श्री राम कॉलेजमध्ये त्यांनी इतिहास विषयाचा अभ्यास सुरू करून, नंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून मास्टर्सची पदवी प्राप्त मिळवली. मात्र, गीतांजली यांनी आपले शिक्षण तिथेच थांबवले नाही, तर पुढे त्यांनी बडोद्यातील सयाजीराव विद्यापीठातून पीएच.डी.ची पदवी मिळवली. तिथे त्यांनी प्रख्यात हिंदी लेखक मुन्शी प्रेमचंद यांच्या कार्यावर आपले संशोधन सुरू केले. हा अभ्यास करतानाच गीतांजली यांना हिंदी साहित्याची आवड निर्माण झाली. त्याच काळात त्यांनी आपल्या पतीसह बडोदा ते दिल्ली अशा रेल्वे प्रवासात पहिली लघुकथा लिहिली. जेव्हा त्यांच्या पतीने ती लघुकथा वाचली, तेव्हा आपण नवीन लेखकाचे काम वाचत आहोत, असे मुळीच वाटत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली असल्याची माहिती ‘शी द पीपल’ [shethepeople]च्या एका लेखावरून समजते.

रांचीमध्ये असताना, आपल्या श्रोत्यांशी बोलताना, त्यांनी एक IAS अधिकारी व्हावे, असे त्यांच्या वडिलांचे स्वप्न असल्याचे गीतांजली यांनी सांगितले होते. इतकेच नाही, तर गीतांजलीने आपले [वडिलांचे] स्वप्न पूर्ण करावे यासाठी तिला १०० रुपयांचे आमिषही दाखवले होते. मात्र, गीतांजली यांना, स्वतःला लेखिका व्हावे, असे वाटले होते आणि त्यांनी त्या प्रवासाकडे वाटचालदेखील सुरू केली होती.

“मला कधीच एक आयएएस अधिकारी होऊन मग लग्न करायचे नव्हते. माझे लेखिका बनण्याचे स्वप्न होते. तेही एक हिंदी लेखिका म्हणून”, असे गीतांजली यांनी म्हटले आहे.

बेलपत्र ते ‘टॉम्ब ऑफ सँड’

१९८७ साली गीतांजली यांची ‘बेलपत्र’ नावाची लघुकथा हंस या साहित्यिक मासिकात प्रसिद्ध झाली होती. हे त्यांचे प्रकाशित झालेले पहिले लिखाण होते. ‘टॉम्ब ऑफ सँड’ या कादंबरीआधी गीतांजली यांनी दोन लघुकथांचे संग्रह आणि चार कादंबऱ्यांचे लिखाण केले आहे.

‘टॉम्ब ऑफ सँड’ या कादंबरीमध्ये एका ८० वर्षांच्या नुकत्याच विधवा झालेल्या महिलेची आणि तिच्या स्वतःच्या शोधाच्या प्रवासाची कहाणी मांडण्यात आली आहे. त्यात त्या महिलेच्या फाळणीदरम्यानच्या आठवणी, त्या आठवणींमधील उदासीनता आणि त्या सर्व प्रसंगांमुळे पीटीएसडीशी [PTSD] झालेला तिचा सामना दाखविण्यात आला आहे.

हेही वाचा : वर्षभराचा खंड पडूनही किरण पहलची कौतुकास्पद कामगिरी! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कसे मिळविले स्थान, पाहा….

गीतांजली यांच्या या पुस्तकाचा [इंग्रजी अनुवाद] यूके व यूएस यांसारख्या पाश्चिमात्य देशांमध्ये वाचकवर्ग अधिक असल्याचे पाहून, गीतांजली यांना विश्वासच बसत नव्हता. कारण- या पुस्तकाला भारतात अपेक्षेपेक्षा फारच कमी प्रमाणात पसंती मिळत होती. मात्र, या पुस्तकासाठी गीतांजली यांना आंतरराष्ट्रीय ‘बुकर’ पुरस्कार मिळाल्यानंतर ही कादंबरी म्हणजे अतिशय उत्कृष्ट साहित्य असल्याची प्रचिती सर्वांना आली. कादंबरीच्या या यशानंतर अनेक भारतीय प्रकाशकांनी अनुवादासाठी अशा प्रादेशिक साहित्याची निवड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे असंख्य लहान-मोठ्या प्रादेशिक लेखकांनादेखील खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळाले.

“जर तुम्हाला खरंच आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करायचं असेल, तर तुमच्या लिखाणाचा अनुवाद करणे गरजेचे आहे. इतकंच नाही तर, भारतातदेखील ‘टॉम्ब ऑफ सँड’च्या यशामुळे भाषांतरांकडे पूर्णतः वेगळ्या नजरेने पाहिले जाऊ शकते.” असे पेंग्विन रँडम हाऊस इंडियाच्या मुख्य संपादक मानसी सुब्रह्मण्यम म्हणाल्या असल्याची माहिती ‘शी द पीपल’च्या एका लेखावरून मिळते.

इंग्रजी भाषेत साहित्य लिहू शकत असतानादेखील, केवळ आपल्या मातृभाषेवर असणारे प्रेम आणि लिखाणातील सहजता यांमुळे गीतांजली या कायम इंग्रजीपेक्षा हिंदी भाषेत लिखाण करीत असतात. इंग्रजी भाषेत लिहिण्याबद्दल त्यांना कोणताही संकोच वाटत नसला तरीही त्या “आपल्यापैकी काही जण हिंदी, तर काही जण इंग्रजी भाषेची निवड करतात. यामागे काय कारण असू शकते”, असा प्रश्न मात्र त्या उपस्थित करतात.

गीतांजली यांना मिळालेल्या भरघोस यशानंतर त्यांच्या नावाची नोंद फोर्ब्स आणि बीबीसीमध्ये, जगभरात आणि नवीन पिढीतील महिलांना प्रेरणा देणाऱ्या इतर दक्षिण आशियाई महिलांमध्ये करण्यात आली आहे. गीतांजली यांनी अनेक साहित्य संमेलनांना हजेरी लावली असून, विविध मुलाखती दिल्या आहेत. परंतु, हे सर्व करताना त्यांनी आपले लिखाण मुळीच थांबविलेले नाही. गीतांजली श्री त्यांच्या सहाव्या कादंबरीवर काम करीत असून, त्या नेमके कशाबद्दल लिहीत आहेत हे अजून तरी गुलदस्त्यात असल्याचे समजते.