केतकी जोशी

केरळ म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतं, तिथलं निसर्गसौंदर्य, तिथली खाद्यसंस्कृती, नृत्य-कला यांची परंपरा. पण ‘केरळ म्हणजे क्रिकेट’ असं काही समीकरण जुळत नाही. केरळमध्ये फूटबॉल लोकप्रिय आहे. पी.टी. उषासारखी वेगवान धावपटू केरळमधली. पण केरळमधून कोणते क्रिकेटपटू लोकप्रिय आहेत, असं विचारलं तर पटकन नावं आठवणार नाहीत. मुंबई किंवा देशातल्या अन्य अनेक राज्यांसारखं केरळमध्ये क्रिकेट फारसं लोकप्रिय नाही. त्यामुळे इथे महिला क्रिकेटबद्द्ल फारसा गांभीर्यानं विचारही कोणी करत नसेल. एका मुलीनं ही परंपरा मोडत नवा इतिहास रचला आहे. तिचं नाव आहे मिन्नू मणी.

IPL Auction 2025 Mohammad Kaif given advice to RCB about Rohit Sharma
‘रोहित शर्माला कर्णधार म्हणून घ्या…’, मोहम्मद कैफने IPL 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी कोणाला दिला सल्ला? पाहा VIDEO
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Indian Cricket Team Played Foot Volley Match After Returning to Hotel On IND vs BAN
IND vs BAN: दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द होण्यापूर्वी टीम इंडियाने हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर काय केलं? दिनेश कार्तिकने शेअर केला VIDEO
Bengaluru Crime News
Bengaluru : महिलेची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले, बंगळुरूमध्ये धक्कादायक घटना; महिलेची आई म्हणाली, “घरमालकाने…”
Chess Olympiad Nona Gaprindashvili Cup given to India at Chennai 2022 goes missing by Indian Chess Federation
Chess Olympiad: ऑलिम्पियाड करंडक भारताकडून गहाळ, बुद्धिबळ महासंघाची बेफिकिरी, पर्यायी बक्षिस वितरीत होण्याची शक्यता
Rohit Sharma Gets Angry on Teammates Stump Mic Video Viral In IND vs BAN
VIDEO: “ओए, सगळेजण झोपलेत का…”, भडकलेल्या रोहितने मैदानात खेळाडूला घातली शिवी, स्टंप माईकमध्ये आवाज रेकॉर्ड
IND vs BAN Virat Kohli ask to Shakib Al Hasan funny question capture stump mic
Virat Kohli : ‘यॉर्करवर यॉर्कर टाकतोयस, तू काय मलिंगा…’, विराटने शकीबला विचारलेला प्रश्न स्टंप माईकमध्ये कैद, VIDEO व्हायरल
How Divya Deshmukh Wins with Match Winning Move in Just 17 seconds left on clock in Chess Olympiad
Chess Olympiad 2024: १७ सेकंद शिल्लक असताना दिव्या देशमुखने कशी मारली बाजी? निसटलेल्या सामन्यात अनपेक्षित चाल खेळून मिळवला विजय

मिन्नू मणी भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झालेली केरळमधली पहिली महिला क्रिकेटर आहे. सध्या आपल्या पुरुष टीम इंडियाबरोबरच ‘विमेन इन ब्लू’चं नावही जोरदार गाजतंय. हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा यांच्या यादीत आता मिन्नू मणीचंही नाव जोडलं गेलं आहे. मिन्नूला ‘ऑलराऊंडर’ म्हणून ओळखलं जातं. ती बॅटिंग तर करतेच, पण ऑफ स्पिन गोलंदाजीही करते. पण अर्थातच पूर्ण प्रतिकूल परिस्थिती असलेल्या मिन्नूचा इथपर्यंतचा आणि एकूणच टीम इंडियात निवड होईपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता.

मिन्नू केरळच्या वायनाड इथली आदिवासी समाजातली मुलगी. तिचे वडील शेतमजूर, तर आई गृहिणी आहे. अर्थातच घरची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची असलेल्या मिन्नूचे वडील तिच्या क्रिकेट खेळण्याच्या विरुध्द होते. अगदी १० वर्षांची असल्यापासून मिन्नूनं तिचे चुलत भाऊ आणि तिच्या आजूबाजूच्या मुलांबरोबर शेतांमध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली. वडिलांना फारसं पसंत नसल्यानं त्यांना न सांगता ती क्रिकेट ट्रेनिंगसाठी केसीएफ स्टेडियमला चक्क ४२ किलोमीटरवर जात असे. त्यासाठी तिला ४ बस बदलायला लागायच्या. पण मिन्नू थकली नाही, की निराशही झाली नाही. तिनं फक्त निष्ठा ठेवली आपल्या खेळावर आणि प्रयत्नांवर. तिच्या शाळेतले क्रिडा शिक्षक एलेस्मा यांना तिच्यातला स्पार्क लक्षात आला आणि त्यांनी तिला क्रिकेट गांभीर्यानं खेळण्याचा सल्ला दिला. ते तिला वायनाड जिल्हा संघाचे कोच शानावास यांच्याकडे घेऊन गेले.

वडिलांना पक्की नोकरी नाही आणि क्रिकेट हा फक्त श्रीमंत लोकांनी आणि त्यातही पुरुषांनीच खेळायचा खेळ असल्याचा समज पक्का होता. पण मिन्नूला योग्य मार्गदर्शन मिळालं आणि तिची राज्याच्या १३ वर्षांखालील मुलींच्या संघात निवड झाली, त्यानंतर स्टेट कँपमध्येही तिची निवड झाली. मग मात्र तिनं मागे वळून पाहिलं नाही. तिच्या वडिलांचा विरोधही मावळला आणि आपल्या मुलीचं स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी तिला प्रोत्साहन दिलं. तिची १६ वर्षांखालील टीममध्ये निवड झाली आणि मग लवकरच सीनियर टीममध्येही तिनं जागा पटकावली. केरळ महिला संघाच्या प्रशिक्षक सुमन शर्मा यांनी मिन्नूला प्रत्येक टप्प्यावर मदत केली. अगदी तिच्या प्रवासखर्चापासून ते तिला आवश्यक ते साहित्य मिळण्यासाठी स्पॉन्सरर्स मिळवून देईपर्यंत, त्यांनी तिची साथ सोडली नाही.

मिन्नूनंही कोणालाच निराश केलं नाही. २०२३ च्या ‘डब्ल्यूपीएल’मध्ये (विमेन्स प्रिमियर लीग) दिल्ली कॅपिटल्सने तिच्यासाठी ३० लाख रुपये मोजले. त्या सीझनमध्ये तिला तीन मॅचेस खेळण्याची संधी मिळाली. आपण एकरकमी ३० लाख आतापर्यंत कधी बघितलेही नव्हते, अशी प्रतिक्रिया शेतात राबणाऱ्या या मजुराच्या कन्येनं दिली होती. त्यानंतर बांग्लादेशमध्ये झालेल्या एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांमधून तिनं आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण केलं.

आता कुठे मिन्नूच्या कारकिर्दीची सुरुवात झाली आहे. अजून तिला बराच पल्ला गाठायचा आहे. आपल्या आईवडिलांना परदेशी घेऊन जाण्याचं मिन्नूचं स्वप्न आहे. आपली मुलगी हेही स्वप्न पूर्ण करेल असा विश्वास तिच्या आईवडिलांना आहे. एकेकाळी क्रिकेट म्हणजे काय, हेही माहिती नसलेली मिन्नू आता आपल्या आंतरराष्ट्रीय महिला टीमचा महत्त्वाचा भाग आहे. क्रिकेटची परंपरा असलेल्या राज्यांमधून अनेक महिला क्रिकेटपटू पुढे येत आहेत, पण केरळसारख्या राज्यातून जिथे महिला क्रिकेटकडे फारसं कुणाचं लक्ष जात नव्हतं, मिन्नूनं आपल्या खेळानं, कर्तृत्वानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे, आणि त्याबरोबरच अनेक मुलींसाठी करियरची, यशाची नवी वाटही दाखवली आहे.