रविवार दि. १८ जून हा म्हणे ‘आंतरराष्ट्रीय पिकनिक डे’ आहे. ‘हल्ली कसले कसले डे साजरे करतील, काही नेम नाही बुवा!’ असं तुमच्या मनात आलं असेल, तर निष्कारण ‘मानसिक प्रौढत्त्वा’नं तुम्हाला ‘ग्रासलंय’ असं समजा! ‘डे’ हे फक्त निमित्त असतं आणि ‘पिकनिक डे’ वगैरे तर अगदी शुद्ध निमित्तच, मजा करायचं. पण मुळात कार्यबाहुल्यानं खांदे वाकलेल्या कितीतरी ‘चतुरां’ना मुळात हे पटवून देणंच कठीण आहे, की असल्या फुसक्या ‘डें’ची निमित्तं काढून मजा करायची असते. मुळात, ‘बाई, आयुष्यात छान मजा करणे हा तुझा जन्मसिद्ध हक्क आहे!’ हेच अनेकींना कुणीतरी सांगायची गरज आहे. त्यासाठी हा लेख.
तर लाडक्या ‘चतुरां’नो, स्वत:च्या स्मरणशक्तीला थोडा ताण द्या. यापूर्वी आपण अगदी एका दिवसाच्या सहलीला- पिकनिकला कधी गेलो होतो ते आठवतंय का?… एक मिनिट, यात कुटुंबाबरोबरची पिकनिक धरता येणार नाही. कारण कुटुंबाबरोबरची, नवरा, मुलंबाळं, सासू-सासरे, सुना-जावई, इतर नातेवाईक, यांच्याबरोबरच्या पिकनिकांमध्ये गप्पांचे विषयही कुटुंबाचेच असतात. ते थोडेसे बाजूला ठेवून जिवलग सख्यांबरोबर (या सख्यांमध्ये मैत्रिणींबरोबर मित्रही आले हं! त्यांना मज्जाव करायचं काहीच कारण नाही.) केलेली पिकनिक आठवत असेल तर बोला. एकदम शांत झालात ना? अनेकींना पटकन काहीच आठवलं नसेल. मित्रमैत्रिणींबरोबर आपण कधी फिरायला गेलो होतो?… ‘कॉलेजमध्ये… अमुक ठिकाणी’ अशा त्रेतायुगातल्या आठवणी नकोत. अलिकडे गेला असाल तर सांगा. नाही ना आठवत?… का होतं आपणा ‘चतुरां’चं असं?…
हेही वाचा – वाद पती-पत्नीचे… भोग मुलांचे!
कॉलेज संपतं. जिवाभावाचे मित्रमैत्रिणी एकेक करून आपापल्या करिअरमध्ये किंवा आपल्या संसारांमध्ये रमतात. आपल्यापैकी अनेक जणी नोकरी-व्यवसायाबरोबर घर, संसार आणि मुलाबाळांमध्ये व्यग्र होऊन जातात. त्यातून घरकामांना कितीही मदतनीस ठेवल्या, तरी अजूनही भारतीय घरांमध्ये स्त्रीला घरातल्या प्रत्येक कामात लक्ष घालणं चुकलेलं नाही. अगदी घरातला कचरा गोळा करून, सेग्रिगेट करून तो टाकण्यापासून आठवड्याची भाजी किंवा महिन्याचं वाणसामान किती शिल्लक आहे, ते बघून खरेदीची यादी करण्यापर्यंत. सगळीकडून आपणा स्त्रियांवर लहानमोठी कामं पडत राहतात. आपणही ती करत जातो आणि कधी पुरत्या अडकून जातो, तेच कळत नाही. मग कामांनाच वेळ पुरेनासा होतो. त्यात पिकनिका कुठून करणार? प्रसंगी कौटुंबिक ट्रिपा होतात, घरात सणसमारंभ होतात, त्यात उसंत मिळते. पण कॉलेज-कट्ट्यावरची मजा, मित्रमैत्रिणींबरोबर अगदी काहीही विषयांवर मारलेल्या गप्पा, एकमेकांची चेष्टामस्करी आणि तो खास असा गडगडाटी हास्याचा धबधबा, याला आपल्यापैकी खूप जणी जवळपास कायमच्या दुरावतात.
‘नवरा ना, वेळ सापडेल तेव्हा त्याच्या कट्ट्यावर जातो गं…’ किंवा ‘आमच्या ‘ह्यां’चं म्हणजे ना असं आहे!… ऑफिसनंतर मित्र भेटतात आणि चहा-सिगारेट पिता पिता इतका वेळ घालवतात की काही सांगायला नको!’ अशी किंचित कौतुकमिश्रित वाक्यं खूप मैत्रिणींकडून ऐकायला मिळत असतात. पण याचा अर्थ ‘ह्यां’नी आपला मित्रांचा कट्टा जपलाय आणि सखे, तुला मित्रमैत्रिणींच्या व्हॉटस्ॲप ग्रुपच्या मेळाव्याला जाणं जमू नये?… मुलाच्या शाळेत मीटिंग होती गं… सासूबाई गावाला जाणार होत्या, त्यांची तयारी करून द्यायची होती गं… ऑफिसमध्ये आयत्या वेळी महत्त्वाची मीटिंग ठरली गं… तुझी व्यग्रता संपणारच नाहीये गं! पण या वर्षी थोडा बदल करायला जमेल का?… तू सक्षम आहेसच सगळी सगळी कामं करायला… पण जरा सांग ना आजूबाजूच्यांना, की माझंही एक जग आहे… मलाही मित्रमैत्रिणी आहे. मलाही कधीतरी केवळ माझ्या-माझ्या ग्रुपबरोबर सहली करून धमाल करावीशी वाटते… सखे, त्यातून तुला जी मानसिक शांतता मिळेल ना, ती तुला खूप दिवस पुरेल. आणि अशी धमाल करण्यासाठी पिकनिकपेक्षा चांगला बहाणा असूच शकत नाही!
हेही वाचा – नवऱ्याच्या घरात भावंडांत दुजाभाव?… कसं वागावं?
मग, ‘चतुरां’नो जरा मानसिक तयारी करा. छान पावसाळ्याचे दिवस आहेत. व्हॉटस्ॲपवरच्या आपल्या मित्रमैत्रिणींना गदागदा हलवून जागं करा! लाडिक दरडावून सांगा त्यांना, की ‘भेटू आता जरा! जाऊ कुठेतरी सहलीला मस्त दिवसभर… चहा, खादाडीबरोबर गप्पांचा आस्वाद घेऊ फक्त. घरचे, मुलांचे आणि ऑफिसचे विषय तिथे बोलायला बंदी! रमू या थोडं नॉस्टॅल्जियामध्येही… आणि भविष्यासाठी ऊर्जा मिळवूया. कुणीही कारणं सांगितलीत, नाटकं केलीत तर बघा!’ बघा, जमतंय का तुम्हाला हे!
या वर्षीचा ‘पिकनिक डे’ उगाच रविवारी आलाय. पण सख्यांनो, पुढच्या वर्षापासून लक्षात ठेवा. ‘पिकनिक डे साजरा करायचा आहे’ असं भक्कम निमित्त देऊन, साठलेल्या आणि नंतर ‘लॅप्स’ होऊन वाया जाणाऱ्या रजांमधली एक तरी नक्की कारणी लावता येईल!