गौरी विसर्जन नुकतंच झालं आणि मोबाइल विविध ठिकाणच्या गौरींच्या फोटोंनी भरून वाहतच होता तितक्यात एका फोटोवर नजर थबकली. मोबाइलवर एका घरातल्या उभ्या गौरींचा फोटो आला होता. सजावट सुरेखच होती पण गंमत म्हणजे त्यातल्या गौरींनी साड्या नेसल्या नव्हत्या तर चक्क छानसे इव्हिनिंग गाऊन घातले होते. फिकट गुलाबी आणि निळ्या रंगाचे गाऊन घालून सजलेल्या या आधुनिक गौरी आणि सायकलवर बसलेलं त्यांचं छोटंसं बाळ…फारच गोड दृश्य होतं ते…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गौरी कुणाच्या घरच्या होत्या कोणजाणे पण खास आणि दखलपात्र होत्या नक्कीच.

आता या फोटोवर हजारो प्रतिक्रिया आल्या असतील…. त्यातल्या अनेक नकारात्मक असतील….

गौर अशी का दाखवतात? पारंपरिक रुपातली गौरच छान दिसते हो.. आमच्याकडे नाही बाई असली थेरं चालत. हल्लीच्या मुली….यांच्या घरातल्या आज्या, काकवा वगैरेंना कसं चालतं कोण जाणे… या त्यातल्या काही मुख्य प्रातिनिधिक असाव्यात.

आणखी वाचा : पारंपरिक-आधुनिक शैलींचा मेळ, गौरींचे ‘ट्रेण्डी’ दागिने

पण मला मात्र या गौरी फार आवडल्या. मुख्य म्हणजे गौरींना असं सजवणाऱ्या घराचा अॅटिट्यूड आवडला. किती झक्कास आहे तो. देवाला किती छान सामावून घेतलंय त्यांनी. त्याच्याबद्दलचं अवडंबर बाजूला ठेऊन एकदम लाडाकोडाचं करून टाकलंय. या घरच्या गौरी खरोखरच्या घरच्या लेकींसारख्या लाडाच्या भासल्या. मोठ्या झाल्या तरी बालपण जपणाऱ्या. मनासारखं वागणाऱ्या… त्यांचं कौतुक वाटून घेणाऱ्या कुटुंबातल्या लेकीबाई गौराया !

आपण कायम संत साहित्यात वाचतो. देव कसा त्या त्या संतांच्या जीवाभावाचा झाला होता. अगदी त्यांच्यातलाच एक, त्यांच्याचसारखा एक झाला होता. त्यामुळेच सगळे संतजन विठूरायाला अभंगात एकेरी संबोधतात, आपल्या जवळचा, आपल्या हक्काचा मानून त्याच्याशी हितगुज करतात. मग तो विठूरायासुद्धा जनाबाईसाठी कपडे धुणारा, छोट्या नामदेवाच्या हातचा नैवेद्य खाणारा.. मुक्ताईच्या आग्रहाला मानणारा असा एकदम कंटेम्पररी का काय तोच होऊन जातो. तर देवाचं हे असं भक्तांमध्ये मिसळून जाणं, भक्तासारखं होणं किती सुरेख आहे. या फोटोतल्या गौरींचंसुद्धा मला अगदी तसंच वाटलं म्हणूनच फार सुरेख वाटलं.

बाई म्हणजे कशातही मिसळून जाणारी अशी एक पारंपरिक व्याख्या केली जाते. ती काही अंशी खरीही आहे. खरोखरच बायका बऱ्यापैकी लवकर अॅडजस्ट होतात. फक्त घर संसाराचं म्हणत नाहीये मी… एकूणच. नाती असतील, नोकरी असेल नाहीतर परिस्थिती… बायका वातावरणाशी नुसत्या मिसळून जातात असं नव्हे तर त्यातला आनंदही शोधतात. मग गौरीदेवीसुद्धा त्याला कशी अपवाद असेल… तीही बाईच खरंतर आद्य बाईच की ती.

आणखी वाचा : नातेसंबंध : नात्यात नेमकं काय चुकतंय?

तर या दोन्ही गौराई आणि त्यांचं घरसुद्धा असंच वाटलं मला. आता आपण साड्या नेसतोच की पण गाऊनसुद्धा घालतो, वनपीस घालतो, पंजाबी घालतो आणि असे सगळे कपडे नीट कॅरी करतो. मग आपल्या देवांनीसुदधा अशी चैन केली तर… काय मस्त ना. या घराने ती गंमत करून पाहिली आणि त्यांच्या गौरी साजिऱ्या तर दिसल्याच… गौरींना सुंदर साड्या, दागदागिने, हार,गजरे का आणतो आपण तर त्या सुरेख दिसाव्यात म्हणूनच की… सुरेखपेक्षाही खरंतर समाधानी, साजिऱ्या दिसाव्यात म्हणून..मग या फोटोतल्या गौरींचंही तसंच झालं की…. फिक्कट निळ्या आणि फिकट गुलाबी गाऊन्समध्ये गौरी अगदी देखण्या दिसत होत्या.

शेवटी गौरीचा सण म्हणजे माहेरवाशिणीचा सण असं घरातल्या जुन्या बायका कायम म्हणतात… ते खरंसुद्धा आहे. माहेरवाशीण म्हणजे घरची लेक. तिचा आनंद नक्की कशात आहे, हे घराने नव्याने शोधलं तर छानच आहे की. लेकीचा आनंद तिला सजवणाऱ्या सुनेनेच शोधला असेल तर त्यासारखं दुसरं खास काही नाही. भगिनीभाव जपायला हवाच की आपण बहिणींनो… घरच्या लेकी, सुना यांचे आनंद नक्की कशात आहेत त्यांना काय आवडेल, हे त्यांचं त्यांनाच ठरवू देण्यात खरं समाधान, खरा सण आहे…

बाकी परंपरा, प्रतिष्ठा अनुशासन वगैरे गोष्टी ‘मोहोब्बते’मधल्या नारायण शंकरसाठीच राखीव ठेवलेल्या बऱ्या नाही का? (!)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jyeshtha gauri 2022 gown latest fashion trend wear to gauri for celebration nrp