स्त्रीपुरूष समानता अर्थात लिंगसमानतेसंदर्भातील कामासाठीचा दक्षिण आशियातील पहिला कमला भसीन पुरस्कार नेपाळच्या नातिसारा राय आणि भारताच्या विद्या राजपूत यांना अलीकडेच प्रदान करण्यात आला. आझाद फाऊंडेशन, आयपार्टनर इंडिया आणि नॅशनल फाऊंडेशन फॉर इंडिया यांच्यावतीने हा प्रत्येकी एक लाखाचा पुरस्कार दोन्ही विजेत्यांना प्रदान करण्यात आला. राय या शक्ती मिलन समाज (एसएमएस) संस्थेच्या संस्थापक आणि कार्यकारी संचालक आहेत. नातिसारा राय यांना वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी वेश्या व्यवसायामधे ढकलण्यात आलं. या व्यवसायामुळे त्या एचआयव्ही पॉझिटिव्ह झाल्या आणि आज त्यांचीच एसएमएस ही संस्था नेपाळमधल्या हजारों एचआयव्हीग्रस्त महिलांना आरोग्यसेवा पुरवण्याबरोबरच सन्मान्य काम तसंच शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहित करते आहे.
आणखी वाचा : महिलांसाठीची सुपरफूडस्
एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या राय यांना सामाजिक हेटाळणीचा आणि भेदभावाचा सामना करावा लागला. मात्र सगळ्या अडचणींवर, अडथळ्यांना तोंड देत त्यांनी या रोगातून बचावलेल्या आपल्यासारख्या अनेकींना सोबत घेत अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी तसंच एकता वाढवण्यासाठी सक्षम आघाडी तयार केली. लैंगिक समानतेच्या लढाईत आम्हांला कायम मार्गदर्शक राहिलेल्या कमलादिदींच्या नावाचा हा पुरस्कार मिळाल्याने सन्मान वाढला आहे, असं भावपूर्ण प्रतिपादन राय यांनी पुरस्कार स्वीकारताना केलं. किंबहुना हा पुरस्कार स्वीकारताना आपल्यावर अधिक जबाबदारी असल्याचं जाणवलं असून यापुढे मी माझ्या शब्दांशी, विचारांशी अधिक एकनिष्ठ रहात कमलादिदींनी सुरू केलेल्या मानवी अधिकाराच्या लढ्याचा वारसा पुढे नेईन, असंही राय म्हणाल्या.
आणखी वाचा : पोटच्या मुलीची हत्या करताना, तिने काय केला असेल विचार?
छत्तीसगड बस्तर येथे २००९ साली स्थापन झालेल्या ‘मितवा’ संस्थेच्या विद्या राजपूत सहसंस्थापक आहेत. तृतीयपंथीयांना एकत्र करून त्यांच्यामध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या हक्कांबाबत जाणीव जागृतीसाठी काम ही संस्था करते. मितवासोबतचे विद्याच्या कामाची मूळं तिच्या वैयक्तिक जीवनातल्या संघर्ष, कष्ट आणि लिंगअसमानतेशी दिलेल्या लढ्यात पहायला मिळतात. गेल्या काही वर्षांत समुपदेशन आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यात आणि राज्याच्या धोरणावर चांगला प्रभाव टाकण्यात विद्या यशस्वी झाल्या.
आणखी वाचा : ‘त्या’ ठिकाणचे केस काढण्यापूर्वी हे वाचा!
हा पुरस्कार म्हणजे प्रोत्साहन असून त्यामुळे फक्त मलाच नाही तर माझ्यासारख्या अनेकींची उमेद वाढण्यास मदत होईल. याचं कारण आजपर्यंत आम्हां तृतीयपंथीयांना स्वतःच्याच कुटुंबाकडून, समाजाकडून कायमच झिडकारण्यात आलं. या सन्मानाने आमच्या समाजात आत्मविश्वासाचे नवे वारे वाहू लागतील आणि भविष्यात सकारात्मक बदल नक्कीच घडून येतील, असा दृढ आशावाद पुरस्कार स्वीकारताना विद्याने बोलून दाखवला. अनु आगा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय परीक्षकांनी पुरस्कारविजेते निवडले. याप्रसंगी आगा म्हणाल्या, की कमला भसीन पुरस्कार कार्यक्रमाची एक परीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळणे हे भाग्य आहे. या पुरस्कारासाठी अतिशय अटीतटीचा सामना म्हणावा इतक्या गुणवत्तापूर्ण स्पर्धक समोर होत्या. आपल्या कामात आयुष्य झोकून देणाऱ्या आणि कमला भसीन यांच्या कार्याला साजेशा दोन विजेत्या निवडू शकल्याचं समाधान आहे. बांग्लादेशच्या खुशी कबीर, नेपाळच्या बिंदा पांड्ये, भारताचे सलिल शेट्टी आणि नमिता भंडारे हे अन्य परीक्षकही यावेळी उपस्थित होते. स्त्रीवादी चळवळीच्या कार्यकर्त्या, कवयित्री आणि लेखिका कमला भसीन यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो. सप्टेंबर २०२१ मधे त्यांचे निधन झाले. दक्षिण आशियाई देशांतल्या आणि भारतातल्या स्त्रीवादी चळवळीसाठी भसीन यांनी भरीव योगदान दिले आहे.
(शब्दांकन : साक्षी सावे)