दरवर्षी अनेक तरुण नवनवीन कल्पना घेऊन व्यवसाय सुरू करतात. त्यांपैकी काहींचे उद्योग उत्तमरित्या यशस्वीही होतात. यात महिला वर्गही मागे नाही. आज आपण अशाच एका उद्योजिकेबद्दल जाणून घेऊ या, जिने तिच्या क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढून स्वत:ची ओळख प्रस्थापित केलं, इतकंच नव्हे तर अल्पावधीत स्वत:च्या कंपनीला त्या क्षेत्रातील उच्च स्थानावरील कंपनी बनवली. त्या उद्योजिकेचं नाव आहे ‘जेट सेट गो’च्या कनिका टेकरीवाल. व्यावसायिक क्षेत्राशी जोडलेल्या किंवा व्यवसायात रुची असणाऱ्यांना हे नाव नवीन नाही. नवउद्यमींसाठी तर त्या एक प्रेरणास्थान ठरल्या आहेत.
कोण आहेत कनिका टेकरीवाल?
कनिका यांचा जन्म भोपाळमधील एका मारवाडी कुटुंबात झाला. त्यांचे वडील रिअल इस्टेट आणि रसायन उद्योगाशी निगडीत होते. कनिका यांचं सुरुवातीचं शिक्षण बाेर्डिंग स्कूलमध्ये झालं. नंतर त्यांनी इकॉनॉमिक्स विषयातून पदवी पूर्ण करून डिझाईन क्षेत्रात पदविका घेतली.
हेही वाचा… लष्करात सुभेदारपदी नियुक्त होणारी पहिली स्त्री- प्रीती रजक
कर्करोगाशी सामना
सर्व काही सुरळीत चालू असताना वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी कनिका यांना कर्करोग असल्याचं निष्पन्न झालं. पण त्याही परिस्थितीत न डगमगता त्यांनी धीटपणे कर्करोगाशी सामना केला. भविष्यातील ध्येयाविषयी एकीकडे संशोधन करत राहिल्या. अखेर काही महिन्यांनी कर्करोगातून पूर्णपणे बऱ्या झाल्यावर त्यांनी आपल्या ध्येयाकडे पुन्हा वाटचाल सुरू केली.
‘जेट सेट गो’ काय आहे?
कनिका यांना सुरुवातीपासूनच पायलट व्हायची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षी एका एव्हिएशन कंपनीमध्ये काम करायला सुरुवात केली. तिथे काम करत असताना त्या क्षेत्रातील अडचणी, ग्राहकांच्या अपेक्षा अशा सर्व बारीकसारीक गोष्टींचा अभ्यास केला. याच क्षेत्रात आपण करिअर करायचं हे ध्येय त्यांनी निश्चित केलं. पण आधी नमूद केल्याप्रमाणे दरम्यानच्याच काळात त्यांना कर्करोगाचं निदान झालं. एखादी व्यक्ती अशा वेळी डगमगली असती, पण कनिका यांनी हिंमत हरली नाही आणि त्यांनी आपलं ध्येय गाठलंच.
हेही वाचा… नातेसंबंध: परदेशी राहण्याचा हव्यास घातक?
‘जेट सेट गो’ ही कंपनी सुरुवातीला ज्यांच्याकडे विमानं आहेत त्यांच्याकरिता विमान चालवणं, विमानाची देखभाल, तसंच काही ठराविक करारानुसार विमानं भाडेतत्वावर देणं, या सेवा पुरवीत असे. कंपनीचा विस्तार वाढत गेला, तसं ते हेलिकॉप्टरसुद्धा भाड्यानं पुरवू लागले. सध्या कनिका यांच्याकडे स्वत:च्या मालकीची दहा विमानं असून त्यांची कंपनी क्लाउड आधारित शेड्युलिंग, एअरक्राफ्ट मॅनेजमेंट-सेवा आणि विमान, हेलिकॉप्टरच्या पार्ट्सची सर्व्हिस, या सेवा देते. कंपनीच्या वेबसाइटद्वारे प्रवासी खासगी विमान, हेलिकॉप्टर आणि एअर ॲम्ब्युलन्स बुक करू शकतात. बिझनेस ट्रिपपासून वाढदिवसाच्या पार्टीपर्यंत सर्व गोष्टींसाठी जेट किंवा हेलिकॉप्टरची सुविधा ही कंपनी पुरवते.
कनिका यांच्या बिझनेस मॉडेलची दखल घेऊन पुरुषांची मक्तेदारी असलेल्या एव्हिएशन क्षेत्रात कमी वेळात उत्तुंग झेप घेतल्याबद्ल ‘फोर्ब्स’ मासिकानं २०१६ मध्ये त्यांची दखल घेतली. भारत सरकारकडूनदेखील त्यांना युवा उद्योजक म्हणून गौरवण्यात आलं.
कर्करोगावर मात करून प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पुरुषांची मक्तेदारी असलेल्या एका क्षेत्रात स्त्रीनं स्वत:चं स्थान निर्माण करणं सोपं नाही. आयुष्यात अडचणी आल्या, तरी हार न मानता त्यांवर मात करून आपण यशाचा झेंडा रोवू शकतो, हे कनिका यांनी दाखवून दिलं आहे.
lokwomen.online@gmail.com