पूजा सामंत
“सैफ आणि मी एकमेकांच्या स्क्रिप्ट्स नेहमी वाचतो. कधी त्या भूमिकांवर सविस्तर बोलतो आणि भूमिकांसाठी ‘होमवर्क’ कसा असावा, यावरही बोलतो. एकमेकांना सल्ले देतो. सैफनं जेव्हा माझ्या ‘जाने जान’ या नव्या चित्रपटाचं स्क्रिप्ट वाचलं, तेव्हा तो मला म्हणाला, “बेबो, भले तू बॉलिवूड इतकी वर्षं गाजवलंस, पण यातले तुझे सहअभिनेते विजय वर्मा आणि जयदीप अहलावत हे ‘ओटीटी’चे राजे आहेत! या दोघांना कधी गृहित धरू नकोस! तुझ्या भूमिकेची कसून तयारी कर.” करीना कपूर-खान मनमोकळ्या गप्पा मारत आपला ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’चा पहिला अनुभव सांगत होती.
करीना कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘जाने जान’ हा सुजॉय घोष दिग्दर्शित थ्रिलर चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर गुरूवारी (२१ सप्टेंबर) प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्तानं भेटलेली ‘बेबो’ ती आणि सैफ अली खान यांच्यात नवीन चित्रपटांच्या निमित्तानं कसा संवाद होतो, त्याविषयी सांगत होती.
हेही वाचा >>>शिल्पाच्या ‘ऋषीच्या भाजी’च्या ‘वरातीमागून घोड्या’ची गोष्ट!
करीना सांगते, “विजय वर्मा (‘डार्लिंग्ज’, ‘दहाड’ इ.) आणि जयदीप अहलावत (‘पाताल लोक’) हे दोघं सकस अभिनय करणारे आणि प्रत्येक भूमिकेत अभिनयाचा वैविध्यपूर्ण आविष्कार दाखवणारे असे ‘ओटीटी’चे लाडके स्टार्स आहेत. सैफचं सांगणं लक्षात ठेवून मी या गुणी कलावंतांसह काम करण्याचा छान अनुभव घेतला. ओटीटीच्या आगमनानं बॉलिवूडमध्ये अनेक चांगले बदल घडताहेत. हेच माध्यम आता हिंदी चित्रपटांसाठी तीव्र स्पर्धेचं झालं आहे. हिंदी चित्रपट आता अधिक चांगल्या गुणवत्तेचे बनतील. म्हणूनच मलाही ओटीटीसाठी काम करायचंच होतं. तो योग आता जुळून आला.”
‘जाने जान’ या चित्रपटात करीनानं ‘माया डिसुझा’ ही एकल आईची व्यक्तिरेखा साकारली आहे. एका खुनाच्या घटनेनंतर मायावर चौकशीचं सत्र सुरु होतं आणि अनेक रहस्यमय गोष्टी उघड होतात. तिनं ही भूमिका स्वीकारली तेव्हा १०-१२ वर्षांच्या मुलीच्या आईची भूमिका करीना का करतेय, असं म्हणून तिला प्रश्न विचारले जात होते. याबद्दल करीना सांगते, “नेहमी फक्त ग्लॅमरसच भूमिका करायच्या एवढंच काही माझं ध्येय नाही. यापूर्वी ‘रा वन’ चित्रपटात मी ७-८ वर्षांच्या मुलाची आई होते. वर्षभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘लाल सिंग चढ्ढा’मध्येसुद्धा मी एका मुलाची आईच होते. वयाला साजेशा भूमिका करण्यात मी आघाडीवर राहिले आहे असं मला वाटतं. यापूर्वी ‘ओंकारा’, ‘कुर्बान’ या चित्रपटांमध्ये मी ग्लॅमर नसलेल्या व्यक्तिरेखा साकारल्या होत्याच. त्यामुळे ग्लॅमर माझ्यासाठी महत्त्वाचं नाहीये, तर भूमिका आव्हानात्मक असावी.”
हेही वाचा >>>गौरी का आणतात ? खड्याच्या आणि मुखवट्याच्या गौरींची काय आहे प्रथा; जाणून घ्या…
करिअर-मातृत्व-वैवाहिक जीवन याचा मेळ आपण कसा साधतो, हे सांगताना करीना म्हणते, “सैफशी लग्न झाल्यावर मी व्यक्तिगत आयुष्य आणि करिअर हे वेगवेगळं ठेवलं. सैफच्या आई शर्मिला टागोर यांनी त्या काळात आपलं करिअर आणि ३ मुलांचं संगोपन, संसार यांचा सुयोग्य मेळ साधला होता हे मोठं कौतुक आहे. शूटिंगसाठी गेलेल्या शर्मिलाजी आपल्या मुलांची ख्यालीखुशाली विचारू शकत नसत, कारण तेव्हा मोबाईल नव्हते. लँडलाईनवर फोन करणंही सोपं नव्हतं. पण त्यांनी सर्व गोष्टी व्यवस्थित जमवल्या होत्या. मग आजच्या काळात मला करिअर, पालकत्त्व आणि संसार यांचा समन्वय का साधता येऊ नये? प्रत्येक वेळी एक चित्रपट केला, की मी आणि सैफ सुट्टी घेतो आणि मुलांबरोबर मजा करतो. निवडक भूमिका करण्यात आता मी आनंद मानते.”
samant.pooja@gmail.com