Kiran Rao Speaks About Divorce With Amir Khan: अमक्याची बायको, तमक्याची सून.. स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी कितीही मेहनत केली तरी जेव्हा अशी एखादीची ओळख करून दिली जाते तेव्हा नेमकं तिच्या मनात काय येत असावं? लग्नानंतर निश्चितच काही दिवस सौ. अमुक तमुक अशी ओळख ऐकून कौतुक वाटतं, वाटायलाही हवं पण नंतर जेव्हा आपलं अस्तित्व तेवढंच उरतं तेव्हा हेच कौतुक ओझं वाटू शकतं. लग्नसंस्थेच्या असंख्य नियमांपैकी खरंतर अगदी लहानशी अशी ही एक बाब आहे, पण या व्यतिरिक्त कितीतरी गोष्टी आहेत ज्या विचारात घेण्याची वेळ आता आली आहे, या आशयाचं मत अलीकडे किरण राव हिने एका कार्यक्रमात संवाद साधताना व्यक्त केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किरण राव ही स्वतः एक चित्रपट निर्माती, पटकथाकार, दिग्दर्शक आहे. अलीकडेच OTT वर प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटासाठी तिच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. SheThePeople & Gytree च्या संस्थापक शैली चोप्रा यांनी होस्ट केलेल्या The Rulebreaker Show मध्ये अलीकडेच किरण राव हिने लग्नसंस्था, घटस्फोट या विषयांवर आपले मत मांडले. अभिनेता आमिर खानसह घटस्फोट घेण्याबाबत सुद्धा किरणने या शोमध्ये भाष्य केले आहे.

लग्नानंतर एखाद्या मुलीवर येणाऱ्या सामाजिक दबावाबाबत बोलताना किरणने म्हटले की, “लग्नसंस्थेचे नियम व अटी पुनर्विचारात घेण्याची वेळ आली आहे असं मला वाटतं. आमिर आणि मी लग्नाआधी एक वर्ष एकत्र राहत होतो. तेव्हा सुद्धा आम्हाला या गोष्टीवर विश्वास होता की जर एक जोडपं म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून तुम्हाला वेगवेगळं जगता आलं तर लग्न हे बंधन किंवा बेडी वाटणार नाही. पण मुळात हा विचार किती जण करतात? एक स्त्री लग्नानंतर ज्या जबाबदाऱ्या उचलते त्या तिच्यावर अनेकदा लादलेल्या असतात. तिने घर बांधून ठेवायला हवं, तिने सासू- सासऱ्यांची कामं करायलाच हवी, यामध्ये अनेकदा स्त्रीला स्वतःला काय हवं आहे किंबहुना ती स्वतः कोण आहे याकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसतो. या समस्या सोडवण्यासाठी संवाद आवश्यक आहे. “

आमिर खानसह घटस्फोट घेताना मनात भीती होती का?

अभिनेता आमिर खानसह घटस्फोटाबाबत बोलताना किरणने त्या दोघांच्या नात्याची ताकद व एकमेकांबद्दलचा प्रचंड आदर व प्रेम या तीन गोष्टी विशेषतः अधोरेखित केल्या. ती म्हणते की, घटस्फोट घेण्याचा निर्णय घेताना आमच्यात कोणताही संघर्ष किंवा मतभेद नव्हताच. केवळ दोघांचीही वैयक्तिक वाढ आणि स्वातंत्र्याने जगण्याची इच्छा लक्षात घेऊन हा निर्णय आम्ही घेतला. त्याआधी आम्ही आम्हाला हवा तेवढा वेळ घेतला होता आणि म्हणूनच नंतर कशाचीही चिंता नव्हती.

हे ही वाचा<< रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?

आमिर आणि मी एकमेकांशी खूप चांगल्या पद्धतीने जोडलेले आहोत पण आम्हाला आमचं स्वातंत्र्य हवं होतं. घटस्फोटानंतरही आम्ही परस्पर आदरातून मैत्री जपू शकतो हा विश्वास असल्याने दोघांनाही घटस्फोटाची भीती नव्हती. आमचा घटस्फोट जितका वेगळा होता तितकंच आमचं नातं सुद्धा वेगळं होतं.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran rao divorce with amir khan says i was never scared real reason why kiran amir took divorce need to rethink marriage institution chdc svs
Show comments