‘ए… गई बोला ना…’, ‘काय पो छो’ ‘अरे कटली रे’… अशाच आरोळ्यांनी सारा आसमंत दुमलेला… आकाशात पतंगांची भरलेली जत्रा… सोबतीला डीजेचा दणदणाट… हा माहोल अनुभवायचा असेल तर एकदा येवल्याला याच, असंच येवल्यातील समस्त सखींचं म्हणणं असतं. एरवी पतंगबाजी म्हटली की तीन-चार मुलं-पुरुषांचा घोळका ठरलेला. त्यांना हवं नको ते पाहणाऱ्या बायका. पण अन्य ठिकाणच्या या चित्राला येवल्याची पतंगबाजी छेद देते. अगदी ‘चढाओढीने चढवीत होते… ग बाई मी पतंग उडवीत होते’ असेच काहीसे चित्र येवल्यात आवर्जून पाहायला मिळते.
आणखी वाचा : ‘आर्थिक बाबी मला नाही बाई कळत!’
नाशिकपासून पन्नास किलोमीटरहून अधिक अंतरावर येवला हे गाव आहे. पंतगोत्सव, रंगपंचमी आणि दिवाळीत रंगोत्सव हे येवल्याचं आकर्षण. अवकाशात पतंग भिरकावणे म्हणजे पतंगबाजी नाही, तर पतंग आकाशात झेप घेताना हवेच्या प्रत्येक झोक्याबरोबर आनंद लुटणे ही अस्सल पतंगबाजी. इथे पारंपरिक हलगी वाद्यावर ताल धरत गच्चीवरून मनसोक्त पतंग उडवला जातो. सोबतीला फाफडा, जिलबी, वडा पाव, मिठाई अशा वेगवेगळ्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत पतंगबाजी सुरू राहते. हा पतंगोत्सव तीन दिवस चालतो. मकरसंक्रांतीच्या आधी आणि नंतरही हा उत्सव सुरू राहतो. करीच्या दिवशी या उत्सवाची आतषबाजीने सांगता होते. पतंगबाजी करणाऱ्यांचे गाव ही येवल्याची ओळख. येवल्याचा पतंग अतिशय कमी वाऱ्यात उडतो, कारण पतंगामध्ये वजनाने हलक्या काड्या वापरल्या जातात. मोठ्या आकारातील वेगवेगळ्या प्रकारचे पतंग उडविण्याचे कौशल्य अनेकांकडून दाखवले जाते. यामध्ये पुरूषांचा सहभाग असतो तसा महिलांचा सहभाग असतो. लंगर, बालाजी, अजिंठा, प्रकाश, फाईन, अश्फाक, कोहिनूर, ए-वन असे वेगवेगळे पतंग आकाशात उंच उंच उडत राहतात. पतंगाचा दोर कधी मुलींच्या तर कधी मुलांच्या हातात असतो. येवल्यात पतंग उडवण्यात फक्त मुलेच नाहीत तर मुलीही अग्रेसर असतात. कामानिमित्त येवला सोडून गेलेले कुटुंबीय खास पतंगोत्सवासाठी येवल्यात येतात. तीन दिवस नाही जमले तर करीच्या दिवशी पतंगोत्सवची मजा लुटतात.
आणखी वाचा : तुम्हीही सुपरमॉम सिंड्रोमच्या शिकार झाला आहात का?
या विषयी मूळची येवल्याची आणि सध्या कामानिमित्त मुंबईला असलेली प्राजक्ता नागपुरे सांगते, ‘‘पतंग उडविण्यात फक्त मुलेच नाहीत तर मुलीही तरबेज असतात. पतंगबाजीची खरी मजा लुटण्याची गंमत येवल्यात असते. लहानपणापासून मकरसंक्रांतीला येवल्यात जाणे ठरलेले असायचे. आम्ही मुलींचा असा ग्रुप मिळून पतंग उडवतो. ‘गई बोला’, ‘काय पो छे’, ‘ए लपेट’ या आरोळ्या ठोकण्यात वेगळीच मजा असते. मुलांची टीम विरूध्द मुलींची टीम असा पेच आम्ही लढवतो. काही मुली तर मुलांपेक्षा सफाईदार आणि सरस पतंग उडवतात. मुलीच नाही तर अगदी आजीबाईही या पतंगबाजीत उत्साहात सहभागी होतात. पतंगबाजीचं असं काही टेक्निक मी शिकले नाही. बाबा पतंग उडवायचे तेव्हा हातात आसारी घेऊन उभी राहायचे त्यांना पाणी आणून दे किंवा आईने दिलेले पदार्थ नेऊन द्यायचे असे काही सुरू राहायचे. मग उंच उडालेल्या पतंगाचा दोर बाबा हातात धरायला द्यायचे तो दोर धरता धरता मी पतंग उडवायला शिकले.
आणखी वाचा : आहारवेद : गर्भवतींसाठी वरदान- पालक
येवल्याची वृषाली सांगते, ‘‘मी माझ्या मैत्रीणींसोबत पतंग उडवते. पतंग उडविण्याची सगळी तयारी आम्ही सगळ्या मिळून १५ दिवस आधी पासून करतो. पतंगबाजीची खरी गंमत कन्नी कापण्यात आणि पेच लढवण्यात असते. कोणाचा पतंग कटला की ‘काय पो छे’ म्हणत उड्या मारण्याचा आनंद काही औरच असतो. संक्रांतीच्या दिवशी सगळी कामे लवकर आवरत सकाळी सकाळी गल्लीतल्या सगळ्या बायका गच्चीवर येऊन पतंग उडवतात त्यावेळी त्यांच्यातली एकी कोणीही तोडू शकत नाही. संक्रांतीला डीजेच्या ठेक्यावर पतंग उडवण्याची मजा काही वेगळीच आहे. पतंगबाजी करताना मुलं-मुली असं काहीच डोक्यात नसतं. एकदा का पतंगाचा दोर हातात आला की अवकाशात उडालेल्या पतंगासोबत मनसोक्त आनंद लुटायचा.
पटेल वहिनी सांगतात, ‘‘पतंगबाजीत आधी घरातील पुरूष मंडळींना खायचे पदार्थ ने-आण करण्यात वेळ जायचा. पण नंतर नंतर पतंग कसा उडवतात, हे सारं समजून घेतलं. आता पतंगबाजीत मी पुढे असते. आधी पतंग खूप दूर दूर जायचा, पण आता अवकाशात इतके सारे पतंग असताना केवळ काटाकाटीसाठी पतंग खेळला जातो असं वाटतं. खूप मज्जा येते.”
आणखी वाचा : लग्नानंतर स्त्रियांचे वजन का वाढते? सेक्समुळे वजनावर कसा परिणाम होतो जाणून घ्या
सख्यांनो, हा लेख वाचून येवल्यात जायचं तर फक्त पैठणी खरेदी करायलाच जायचं हा तुमचा विचार नक्की बदलेल यात शंका नाही. आता येवल्यात तुमची लाडकी पैठणी खरेदी करण्यासाठी तर याच पण येवल्यातील तुमच्या मैत्रिणींचा हा पतंगबाजीचा रंगतदार सोहळा पाहायलाही नक्की या!