डॉ. शारदा महांडुळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उन्हाळ्याच्या दिवसांत तयार होणारे, कलिंगड हे फळ म्हणजे आपल्यासाठी एक वरदान आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रखर उष्णतेने अंगाची लाहीलाही होते, त्या वेळी कलिंगडाच्या सेवनाने शरीराला शीतलता प्राप्त होते आणि अतिघामामुळे निर्माण झालेला थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होतो.

मधुर, शीतल, तृष्णाशामक आणि उत्साहवर्धक अशा कलिंगडाला शास्त्रीय भाषेत ‘स्रिटलस व्हल्गॅरिस’ असे म्हणतात. मूळ आफ्रिकेतील असणारे हे फळ भारतात कर्नाटकमध्ये सर्वाधिक प्रमाणात तयार होते. त्याच्या अनेक जाती आपल्याकडे प्रचलित आहेत.

औषधी गुणधर्म –

कलिंगड हे अल्कली गुणधर्माचे फळ आहे. त्यामुळे आम्लतेने निर्माण होणाऱ्या आजारांवर ते उपयोगी पडते. उष्णतेने निर्माण होणाऱ्या घामातून शरीरातील जलउत्सर्जन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे शरीरातील खनिजे घामाद्वारे निघून जातात. पर्यायाने अशा वेळी थकवा जाणवतो. त्या वेळी कलिंगड खाल्ल्याने तहान भागते व घामाद्वारे शरीरातील झालेला खनिज द्रव्यांचा ऱ्हास भरून येतो. कलिंगडाच्या बियांचा उपयोग शक्तिवर्धक म्हणून केला जातो. कारण या बियांमध्ये ‘कुम्बोट्रिन’ नावाचा ग्लुकोसाइड घटक असतो. यातील साखर सहज पचून रक्तामध्ये मिसळत असल्याने ते आरोग्यपूर्ण आहे. कलिंगड शक्तिवर्धक, पौष्टिक, दाहशामक, पित्तनाशक आहे. त्याची साल, फळ व बी या तिघांचाही उपयोग केला जातो.
कलिंगडामध्ये पाणी व पोटॅशिअमचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. त्यामुळे मूत्राशयाच्या व किडनीच्या तक्रारींवर व लघवीला जळजळ होत असेल तर कलिंगड खाल्ल्यास फायदा होतो.

आजारावर उपयोग

  • मूतखडा झाला असेल तर तो लघवीतून पडून जाण्यासाठी कलिंगडाचा रस सतत काही दिवस द्यावा.
  • आम्लपित्ताचा त्रास होत असेल तर पित्त कमी करण्यासाठी कलिंगड खावे.
  • उन्हातून आल्यानंतर किंवा उष्णतेच्या विकाराने डोकेदुखीचा त्रास होत असेल तर गर काढलेल्या अर्ध्या कलिंगडाची टोपी डोक्यात घालावी. डोकेदुखी थांबून शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो.
  • कलिंगडामध्ये टोमॅटोप्रमाणे लायकोपिनचे प्रमाण भरपूर असते. लायकोपिन ॲण्टिऑक्सिडेंट असल्यामुळे कर्करोग दूर ठेवायला उपयुक्त ठरते.
  • कलिंगड खाल्ल्याने त्यामध्ये असणारा चोथा व आर्द्रतेमुळे मलावरोधाची तक्रार कमी होऊन पोट साफ होते.
  • उष्माघातामुळे शरीराची आग होत असेल तर तसेच उष्णतेमुळे डोळ्यांची, तळपायांची आग होत असेल तर कापलेल्या टरबुजाची साल त्या भागावर ठेवावी. थोड्याच वेळात शरीराची आग कमी होते.
  • सौंदर्यवर्धनासाठीही कलिंगड उपयुक्त ठरते. कलिंगडाची साल चेहऱ्यावर चोळल्याने चेहऱ्यावरचा तजेला वाढतो.
  • कलिंगडाचे बी हे अतिशय पौष्टिक व चवदार असते. मुखशुद्धीसाठी बडीशेपमध्ये कलिंगडाचे बी वापरावे तसेच घरी बनवलेले लाडू, बर्फी यामध्येही या बीचा सजावटीसाठी वापर करावा. यापासून केलेले तेल हे पौष्टिक असते. त्याचाही खाद्यपदार्थ म्हणून वापर करता येतो.
  • कलिंगडाचे बी टणक असल्यामुळे सोलायला कठीण असते. म्हणून थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करावे व त्याचा रस गाळणीतून गाळून घ्यावा व हे गाळलेले पांढरे दूध रश्श्याच्या भाजीत किंवा आमटीत घालावे. या बियांमध्ये प्रथिने, क्षार व शरीरास उपयुक्त असा मेद भरपूर प्रमाणात असतात व त्याचा आरोग्य चांगले राहण्यासाठी उपयोग होतो.
  • कलिंगडाचा लाल गर काढल्यानंतर, सालीचा पांढरा गर हा फेकून न देता त्याचा वापर कोशिंबीर, थालीपीठ, कटलेट, भजी, धिरडे, भाजी यांमध्ये करावा.
  • कलिंगडाची हिरवी साल स्वच्छ धुऊन बारीक किसून सांडगे बनविण्यासाठी वापरावी यामध्ये लोह, चोथा व ‘ब’ जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते.
    सावधानता-
    कलिंगड हे फळ पिकल्यानंतर माठाखाली ठेवावे. पाण्याने ओले केलेले थंड कापड त्यावर टाकावे. त्यानंतर चार ते पाच तासांनी कलिंगड खावे. फ्रिजमध्ये ठेवून थंड केलेले कलिंगड खाऊ नये. तसेच एकदा कापलेले कलिंगड पुन्हा फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाऊ नये. कारण फळ कापल्यानंतर त्यातील पौष्टिक घटक कमी होतात. म्हणून ते लगेचच खावे. अनेक जण कलिंगड खाताना त्यात मीठ टाकून खातात; परंतु कलिंगडामध्ये नैसर्गिकरीत्याच सोडियम क्लोराइड, पोटॅशिअम हे क्षार असतात व मीठ टाकून या क्षारांचे प्रमाण अधिकच वाढते. म्हणून मीठ, साखर यांचा वापर न करता आहे त्या नैसर्गिक स्थितीतील पिकलेले कलिंगड कापून लगेचच खावे. फ्रिजमध्ये कापून ठेवलेले शिळे कलिंगड खाल्ल्यास अनेक वेळा फूड पॉयझनिंग (अन्न विषबाधा) होऊन जुलाब, उलट्या, ताप, सर्दी, खोकला हे आजार होतात.

sharda.mahandule@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know about benefits of eating watermelon in summer mrj