‘भाग्यवान मी या भुवनी असे’ कुणा झाडास वाटत असेल तर ते आहे फुलांचा अनभिषिक्त सम्राट गुलाबाचे झाड. गुलाबी थंडी आवडणारा, हिमालयासारख्या पर्वतरांगामधील जंगलात अधिवास असलेला गुलाब शेकडो वर्षांपासून माणसाच्या मनावर अधिराज्य करू लागला. कारण त्याचे अनाघ्रात सौंदर्य अन् मोहक सुगंध. या सौंदर्याने माणसाच्या सृजनशक्तीला जणू आव्हान दिले अन् अनेक निसर्गप्रेमी वनस्पतितज्ज्ञ, शास्ज्ञत्र, संशोधकांनी या झाडातील विविध गुण हेरले. त्यातून चांगल्या गुणांचा संकर करून अधिकाधिक गुणांच्या नव्या जाती निर्माण केल्या. गुलाबाची महती फार मोठी असल्यामुळे त्याचा कुलवृत्तान्त जाणून घेतल्याशिवाय आपण त्याच्या लागवडीकडे वळणे योग्य नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुलाबाचे ३० लाख वर्षांपूर्वीचे जीवाश्म सापडतात. तर, शेकडो वर्षांपासून शिल्पकला, संगीत, काव्य, चित्रकला अशा अनेक कलांसाठी हा प्रेरणास्रोत आहे. अनेक चित्रकारांनी केवळ गुलाब चितारण्यात आपले आयुष्य वाहिले आहे. केवळ पाच नाजूक पाकळ्या अन् मधोमध धम्मक पिवळे पुंकेसर असलेला रानवेली अथवा झुडपांचा गुलाब रानावनात आढळतो. रेहडर यांनी गुलाबांचे १२० प्रजातींमध्ये वर्गणीकरण केले आहे. भारतातील जंगली गुलाबांच्या दहा जातींमध्ये पांढरा, गुलाबी, पिवळा, लिंबोणी, सुगंधी फुले असणारी गुलाब प्रजाती येतात. कस्तुरी गुलाब (मस्क रोज) याच प्रकारात मोडतो. उद्यानामध्ये लावल्या जाणाऱ्या गुलाबांचे प्रामुख्याने आठ पूर्वज मानले गेले आहेत. रोझा चीनेनसीस, रोझा देमासिना, रोझा फोटिडा, रोझा गॅलिका, रोझा जायगँटिका, रोझा मॉचसेंटा, रोझा मल्टिफोरा, रोझा व्हेच्युरीएना असे हे पूर्वज आहेत. अभ्यासकांनी गुलाबाचे सन १८०० च्या पूर्वीच्या अन् त्यानंतरच्या जाती असे विभाग केले आहेत. यातही रोझा गॅलिका हा मुख्य पूर्वज मानला जातो. अथक परिश्रमांनी संशोधन करून विविध मूळ जातींमधून गुणसंकराने नवीन प्रजाती संकरित केल्या गेल्या. याचेच फलित सतत भरभरून फुलणारा नाजूक प्रकृतीचा टिज (teas) व मोठय़ा फुलांचा श्रीमंती सुवासाचा कणखर प्रकृतीचा हायब्रिड पप्रेटय़ुला. पुढे यातूनच क्रांतिकारक संकर झाला हायब्रिड टिजचा.

हेही वाचा… ग्राहकराणी: कुरियरने पाठवलेल्या पार्सलमधील वस्तू गायब झाल्या तर….?

रजत गुलाबी गंधित फुलाचा ‘ला फ्रान्स’ याची निर्मिती फ्रेंच गुलाब निर्माता गुलियट याने केली. हे साल होते १८६८. खूप रंगांची, खूप फुलं देणारी पॉलिएंथस जात सुरुवातीला लोकप्रिय होती. परंतु १९३६ नंतर ती मागे पडली आणि हायब्रिड पॉलिएंथस जात फ्लॉरीबंडा नावाने प्रचलित झाली. आज गुलाब विश्वात हायब्रिड टिज आणि फ्लॉरीबंडाचेच वर्चस्व आहे. फ्लॉरीबंडा त्याच्या खूप फुलण्याच्या आणि फुलांच्या आकारामुळे आकर्षक दिसतो. हायब्रिड टिज या जातीवंत गुलाबाचे रंग इंद्रधनुष्याच्या सप्तरंगातले कल्पनेच्या पलिकडचे अगदी काळे, जांभळेसुद्धा आढळतात.

हेही वाचा… परदेशी जाण्याच्या कारणास्तव घटस्फोटित स्त्रीला अपत्याचा ताबा नाकारता येणार नाही

लांब दांडे हे संकरित जातीचे वैशिष्ट्य. दणकट पाने, हळूहळू उमलत जाणारी देखणी कळी, सुरेख पाकळ्या मात्र गंध असेलच असे नाही. पिस, ब्ल्यू मून, आयफेल टॉवर, सुपर स्टार, क्रिमसन ग्लोरी, ख्रिश्चन डायर, हेन्री फोर्ड ही काही वलयांकित नावं. चायना रोज जातीतील हिरवा गुलाब हाही वैशिष्ट्यपूर्णच. नाजूक बटण गुलाब, चिनी गुलाब हे कुंडीत लावण्यासाठी योग्य आहेत. कमानी, सज्जा, लाकडी जाळ्यांवर चढविण्यासाठी हायब्रिड टिजच्या वेली गुलाबांची निवड योग्य ठरते. यातही अनेक रंग, अनेक तऱ्हा म्हणून यांचा तोरा.

फुलांच्या व्यवसायिक क्षेत्रात गुलाबाचा फार मोठा वाटा आहे. बाग छोटी असो, मोठी गच्चीत असो किंवा बंगल्यात गुलाबाच्या रोपाशिवाय त्याला पूर्णत्व नाही. तेव्हा गुलाब कुंडीत लावायचा की वाफ्यात हे ठरवून ठेवा, भरपूर उन्हाची जागा शोधा.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know about different species of rose while cultivating dvr