डॉ. मेधा ओक
हल्ली कर्करोगाचे प्रमाण वाढताना दिसते. चुकीची जीवनशैली आणि व्यसने याला कारणीभूत असावीत. थायरॉइड कर्करोगाबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसते, त्यामुळे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. थायरॉइड ग्रंथींच्या पेशींची अनियंत्रित वाढ झाल्यास कर्करोग होऊ शकतो. त्यामागच्या कारणांचा शोध घेणे सुरू आहे. अनुवंशिकता हे एक कारण असू शकते. रेडिएशन तसेच जनुकीय बदल ही कारणे इतर कर्करोगांमध्ये दिसतात, तसेच इथेही कारणीभूत ठरू शकतात.
थायरॉइड कर्करोग संथ गतीने वाढणारे असतात. दोन टक्के लोकांमध्ये फक्त हा कर्करोग आढळतो.
आणखी वाचा : थायरॉइड आणि सहव्याधी
थायरॉइडच्या कर्करोगाचे पाच प्रकार
१) अँनाप्लास्टिक : हा सर्वात दुर्मीळ पण गंभीर प्रकार आहे. मुख्य म्हणजे हा शरीरात वेगाने पसरतो. फुफ्फुसे, यकृत व हाडांमध्ये जलद गतीने पसरतो. उशिरा समजल्याने उपचारास विलंब होतो.
२)पापिलरी : हा सर्वात सामान्य प्रकार आहे. हा कोणत्याही वयात होऊ शकतो.
३) फाॅलिक्युलर सेल : म्हणजे ग्रंथीच्या पेशीपासून उद्भवतो. साधारण ५० ते ५५ वयानंतर होतो.
४) मेड्यूलरी कारसिनोमा : सी सेल्स जिथे कॅलसिटोनिन हार्मोन तयार होते, तिथे हा कर्करोग निर्माण होतो.
५)लिम्फोमा : हाही सर्वात दुर्मीळ प्रकार आहे. थायराॅइडमध्ये एकदा बरा झालेला कर्करोग परत होऊ शकतो. त्याला Recurrence असे म्हणतात. त्यामुळे थायरॉइड चाचणी आणि स्कॅन नियमित करणे खूप गरजेचे आहे.
कर्करोगाची लक्षणे
श्वास घेण्यास तसेच गिळण्यास त्रास होतो. क्वचित ग्रंथींचा आकारही मोठा होतो, घसा दुखतो, केस गळतात, आवाजात बदल होतो, वजन प्रमाणाबाहेर कमी होणे ही त्याची लक्षणे.
कोणत्या चाचण्या कराव्यात?
थायरॉइडच्या कर्करोगासाठी रक्तचाचणी बरोबर इतरही चाचण्यांची गरज भासते. थायरॉइडची सोनोग्राफी, बायोप्सी, एम आर आय, सी टी स्कॅन या चाचण्या कराव्या लागतात.
आणखी वाचा : महिलांमधील हायपरथायरॉइडीझम आहे तरी काय?
उपाय कोणते?
आर ए आय (RAI) रेडिओ थेरपी, किमोथेरपी हे महत्त्वाचे उपाय आहेत. कर्करोगग्रस्त भाग शस्त्रक्रिया करून पूर्णपणे काढून टाकणे हा आणखी एक उपाय. कर्करोग आजूबाजूला पसरलेला असेल तर त्याच्या अवतीभवतीचे ‘लिम्फ नोड्स’ हेसुद्धा कधी कधी काढून टाकावे लागतात.
थायरॉइड इमर्जन्सी
हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची तातडीची गरज भासते असे दोन गंभीर प्रकार किंवा जीवघेणे प्रकार थायरॉइड मध्ये आहेत, ज्याला त्वरित उपचारांची आवश्यकता असते.
आणखी वाचा : गर्भवती आणि बालकांमधील थायरॉइडची समस्या
एक थायरॉइड स्ट्राॅर्म (Thyroid storm) व दुसरा मिक्सीडीमा कोमा (Mxyedema coma). हॉर्मोन्सचे संतुलन धोकादायक पातळी गाठण्या इतके बिघडते. एक तर थायरॉइड अजिबातच हॉर्मोन्स तयार करत नाही (अंडर ॲक्टिव थायरॉइड), त्यामुळे शरीराचे तापमान प्रमाणाबाहेर कमी होते, इतके की मृत्यू येऊ शकतो. त्याला मिक्सीडीमा कोमा असे म्हणतात (Myxedema coma).
या उलट हार्मोन अनियंत्रितपणे स्त्रवले तर, ताप, हृदयाच्या ठोक्यांची अति जलद गती, (arrhythmia, न थांबणारे जुलाब, भ्रमिष्टपणा, अत्यंत थकवा, गोंधळलेली मानसिक अवस्था, फिट्स, प्रचंड कावीळ, BP खूप कमी होणे आणि कोमा… अशी स्थिती निर्माण होते. त्याला थायरॉइड स्ट्राॅर्म असे म्हणतात. दोन्ही गोष्टी अत्यंत दुर्मीळ आहेत. या दोन्हींवर उपचारांची गरज असताना ते न घेतल्यास ही स्थिती उद्भवते किंवा निदानच झाले नाही तर ही स्थिती येते.
हायपोथायरॉईड आजार एरव्ही सहज सोप्या उपचार पद्धतीने लवकर नियंत्रित करण्यासारखा आहे. उपचार पद्धती सर्वात सोपी आहे. आयोडीनयुक्त मीठ व थायरोक्सिनची गोळी नियमित घेतली, योग्य आहार व व्यायाम केल्यास हितकारक ठरते. हायपर थायरॉइडवर नियमित उपचार उपयुक्त ठरतात. वेळीच काळजी घेतली तर फार गुंतागुंत होत नाही. तेव्हा निदान झाल्यावर दुर्लक्ष न करणे हे सर्वात महत्त्वाचे. योग्य ते उपचार झाल्यास थायरॉइड विशेष त्रास देत नाही व त्याचा इतर व्याधींवर काही दुष्परिणाम होत नाही.
oakmedha51@gmail.com