कॉम्पॅक्ट पावडर कोणत्याच ‘चतुरे’साठी नवी नाही. लहानशा डबीत मिळणारी ही ‘प्रेस्ड पावडर’ कित्येकींच्या तर पर्समध्येच नेहमी असेल. हे मेकअप उत्पादन इतकं उपयुक्त आहे, की त्याची मागणी बहुदा कधीही कमी होणार नाही. मात्र तुम्ही हे पाहिलंय का, की अगदी काॅम्पॅक्ट पावडरसारख्याच पिवळट वा गुलाबीसर रंगाची दिसणारी लूज पावडरदेखील लहान डब्यांमध्ये मिळते. ती अर्थातच डबीत घट्ट बसवलेली नसते आणि डबी हलवली की थोडी थोडी पावडर डबीच्या आतल्या लहान लिडमध्ये गोळा होते. मजा अशी, की लूज पावडर दिसायला साधारणत: त्वचेच्याच रंगाची असली, तरी तिची किंमत मात्र काॅम्पॅक्ट पावडरपेक्षा खूपच कमी असते. बनाना पावडर (पिवळा ‘टिंट’- रंग असलेली पावडर), रोझ पावडर (गुलाबीसर, त्वचेच्या रंगाची), ट्रान्स्ल्युसन्ट पावडर (पांढरी वा ऑफ व्हाईट रंगाची) याही लूज पावडरीच. ही सर्व उत्पादनं खरंतर एकसारखीच वाटत असताना त्यांच्या किमतीतला फरक आपल्याला चक्रावून टाकतो. जर लूज पावडर इतकी स्वस्त मिळते आहे, तर काॅम्पॅक्टसाठी जास्त पैसे घालवावेत का, असंही वाटतं!

तुमचं अगदी बरोबर आहे. ही दोन्ही उत्पादनं खरंतर बऱ्यापैकी सारखी दिसतात. पण त्याचा वापर कुणी, कसा आणि केव्हा करावा, याचे काही ढोबळ नियम आहेत. यातली सर्वांत महत्त्वाची लक्षात घ्यावी अशी गोष्ट म्हणजे काॅम्पॅक्ट पावडर ही अर्थातच डबीत घट्ट बसवलेली असते आणि या ‘टेक्स्चर’साठी त्यात तेलकटपणा अधिक असतो. म्हणूनच तुमच्या चेहऱ्याची त्वचा जर कोरडी असेल, तर काॅम्पॅक्ट पावडर तुमच्यासाठी अधिक फायदेशीर. याउलट त्वचेच्या रंगाशी मिळत्याजुळत्या रंगाच्या लूज पावडरीत तेलकटपणा कमी असतो. म्हणून तुमची त्वचा जर तेलकट असेल, तर लूज पावडर तुमच्यासाठी चांगली ठरू शकेल, कारण ती त्वचेवरचं तेल शोषून घेते.

आणखी वाचा : नातेसंबंध : फेसबुक फ्रेण्ड? जरा जपून…

याबरोबरच काॅम्पॅक्ट पावडर ‘हेव्ही’ असते आणि लूज पावडर ‘लाईट’. याचा अर्थ असा, की काॅम्पॅक्ट पावडर चेहऱ्यावरचे डाग, सुरकुत्या, त्वचेचा खडबडीतपणा अधिक प्रमाणात लपवू शकते. या प्रकारचं चांगलं ‘कव्हरेज’ नुसती लूज पावडर देत नाही. त्यामुळे तुम्हाला जर लगबगीत बाहेर जाताना किंवा ऑफिसात पावडरनं ‘टचअप’ करायचं असेल, तर काॅम्पॅक्ट पावडर चांगली. रोजच्या वापरात काॅम्पॅक्ट लावल्यावर आणखी दुसरा काही मेकअप केला नाही तरी चालून जातं. मात्र तुम्ही रीतसर मेकअप करणार असाल, तर मात्र सुरूवातीच्या ‘मेकअप बेस’ तयार करण्याच्या प्रक्रियेत लूज पावडर चांगली उपयुक्त ठरू शकते. म्हणजे पातळ फाउंडेशन चेहऱ्यावर पसरवून लावल्यानंतर लूज पावडर लावली जाते. म्हणजे फाउंडेशन ‘सेट’ होतं आणि त्याचा परिणाम जास्त वेळ राहातो.

काॅम्पॅक्ट पावडरीबरोबर त्याचा छोटासा पफ दिलेला असतो. लूज पावडरबरोबरही असा छोटासा पफ असतो, पण सहसा लूज पावडर लावायला पावडर ब्रश वापरतात. याला ‘काबुकी ब्रश’ असंही म्हटलं जातं आणि तो हातात धरण्याजोग्या बुटक्या दांड्याचा किंवा बॉलपेनएवढ्या लांब लाकडी दांड्याचा, मऊ ब्रश असतो. थोडीशी लूज पावडर डबीच्या आतल्या लिडमध्ये घेऊन ब्रशनं ती थोडी थोडी चेहऱ्यावर पसरवतात. चेहऱ्यावरची जास्तीची पावडर ब्रशनंच झटकून टाकतात. काही जणी काॅम्पॅक्टसाठीही असा ब्रश वापरतात, पण रोजच्या वापरात त्याची गरज भासत नाही आणि बाहेर जाताना ब्रश बाळगणं व्यवहार्यसुद्धा नसतं. त्यामुळे बाहेर जाताना काॅम्पॅक्ट आणि मेकअप करण्यापूर्वी लूज पावडर असाही एक साधा नियम सांगता येईल.

आणखी वाचा : पारंपरिक-आधुनिक शैलींचा मेळ, गौरींचे ‘ट्रेण्डी’ दागिने

हे लक्षात ठेवा!

अनेकदा आपण त्वचेच्या रंगाचं काॅम्पॅक्ट चेहऱ्यावर लावल्यानंतर नाकाच्या आजूबाजूला, ओठांच्या बाजूच्या भागात, कपाळावर, डोळ्यांच्या बाजूस पावडरच्या बारीक बारीक आडव्या रेषा उमटलेल्या दिसतात. असं झालं, तर समजा, की तुम्ही खूप जास्त काॅम्पॅक्ट पावडर लावली आहे किंवा ती नीट पसरवलेली नाही. यालाच मेकअपवाले लोक ‘पावडरचा बेस ‘केकी’ दिसतोय’ असंही म्हणतात. काॅम्पॅक्ट पावडर जास्त लावली, तर मेकअप किंवा एकूण ‘लूक’ नैसर्गिक दिसत नाही. उगाच खूप काहीतरी चेहऱ्यावर थापल्यासारखं दिसतं. हे टाळण्यासाठी काॅम्पॅक्ट आपल्याला गरजेपुरतंच लावायचं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा.

Story img Loader