माणूस वयात आला, की सेक्सचं आकर्षण वाटणं साहजिकच असतं. पण अनेकदा आपल्याकडे या विषयावर खुलेपणानं बोलणं अजूनही शक्य होत नाही. त्यामुळे मनात आलेले प्रश्न तसेच अनुत्तरीत राहातात आणि त्यातून काहीवेळा गंभीर समस्याही उद्भवतात. त्या सगळ्यांसाठी हे व्यासपीठ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नाआधी शरीरसंबंध?

प्रश्न : अलिकडेच माझा व अभयचा साखरपुडा झाला. तीन महिन्यांनी आमचं लग्न होईल. आजकाल आमच्या खूप गाठीभेठी होतात. अनेकवेळा आम्ही एकटे असताना अभय शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह करतो. अजूनपर्यंत मी खरे – खोटे बहाणे करून हे टाळत आले आहे. अभयवर माझं प्रेम आहे. त्याला नाराज करणं मला आवडत नाही. पण लग्नाआधी असे संबंध ठेवणं मला पटत नाही व माझी स्वत:ची तशी इच्छासुद्धा होत नाही. मी काय करू? – मीता

उत्तर : तुमची मन:स्थिती मी समजू शकतो. अनेक पुरुषांमध्ये, अभयप्रमाणे शारीरिक संबंधांबद्दल अशी अधीरता असते. अनेक तरुणी अशा आग्रहांना बळीसुद्धा पडतात. निसर्गाने पुरुषाची लैंगिकता ‘शरीरप्रधान’ ठेवली आहे; त्यामुळे पुरुष स्त्रीच्या शरीराकडे आकर्षित होतो; साहजिकच सेक्सकडे त्याचा ओढा असतो. स्त्रीची लैंगिकता ‘हृदयप्रधान’ असते. जोपर्यंत स्त्री एखाद्या पुरुषावर मनापासून ‘प्रेम’ करत नाही तोपर्यंत तिला त्या पुरुषाबाबत लैंगिक आकर्षण वाटत नाही.

तुमच्या लग्नाला आता थोडेसेच दिवस राहिले आहेत. या काळात शारीरिक संबंधांचा मोह टाळण्यातच दोघांचं हित आहे. समाजाने वैचारिकपणे निर्माण केलेली नैतिकतेची चाकोरी न ओलांडता व थोडासा धीर धरून, लग्नापर्यंत हा लहानसा काळ घालवणं फारसं अवघड नाही.

खरे-खोटे बहाणे बनवत राहण्यापेक्षा, अभयला विश्वासात घेऊन, प्रेमाने त्याला तुमचा मनोदय समजावून सांगा. तुम्हाला लग्नाआधी शरीरसंबंध नको असतील तर तुमच्या विचारांचा, भावनांचा मान राखणं ही त्याचीसुद्धा जबाबदारी आहे. खरे-खोटे बहाणे करत राहण्याने तुम्ही त्याला चुकीचे निर्देश देत आहात. त्यामुळे त्याचा असा समज होईल, की लग्नाआधी संबंध ठेवण्यास तत्त्वत: तुमचा विरोध नाही, पण केवळ परिस्थितीजन्य कारणांमुळे तुम्हाला ते जमत नाही.’ हा गैरसमज निभावणं तुम्हाला अवघड जाईल. मोहाला बळी पडून एकमेकांच्या कमकुवतपणाचे भागीदार होण्यापेक्षा, जागरुकता बाळगून वासनेचा तोल न जाऊ देण्याची दक्षता घेणंच खऱ्या प्रेमाला अभिप्रेत आहे.

लैंगिक संबंधांचं प्रमाण योग्य- अयोग्य असं असतं का?

प्रश्न : आमचं लग्न होऊन सहा वर्षे झाली. सुरुवातीला आम्ही आठवड्यातून तीन-चार वेळा शरीरसंबंध ठेवत असू. हे प्रमाण हळूहळू कमी होत गेलं. सध्या हे प्रमाण महिन्यातून एक किंवा दोन वेळा एवढंच आहे. आमची दोघांची याबाबत काहीही तक्रार नाही. आम्ही दोघेही लैंगिकदृष्ट्या समाधानी आहोत. पण इतरांशी चर्चा केल्यावर त्यांचे संबंध अजूनही आठवड्यात दोन ते तीन वेळा होतात हे ऐकून आम्हाला आमच्यात काही कमतरता तर नाही ना, असा दाट संशय येऊ लागला आहे. काय करावं? – कांचन

उत्तर : लैंगिक संबंधामध्ये समाधानाला महत्त्व असतं, प्रमाणाला नव्हे. या गोष्टी एकमेकांशी तुलना करून ठरवायच्या नसतात. तुम्ही दोघे तृप्त असाल व याबाबत तुमची दोघांची काहीही वैयक्तिक तक्रार नसेल तर खुशाल रहा. कसलीच काळजी करू नका. तुमच्यात कसलीही कमतरता नाही. लैंगिक समाधान हे तुम्ही कितीवेळा शरीरसंबंध ठेवता यापेक्षा त्यापासून मिळणारा आनंद, तृप्ती व उत्कटता यावर अवलंबून असतं.

लैंगिक संबंध हे एकमेकांवरील उत्कट प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. प्रेम व्यक्त करण्याचे इतरही अनेक मार्ग आहेत. तसंच लैंगिक संबंधाव्यतिरिक्त दोन प्रेमी जीवांमध्ये इतरही अनेक भावसंबंध जुळलेले असतात.एकमेकांबद्दलचा आदर, सद् भाव,आपलेपणा, स्नेह असे अनेक पैलू दांपत्यजीवनातील सौख्यात सामावलेले आहेत. ‘पती – पत्नीचं नातं हे शरीराचे बांध ओलांडून भावविश्वात विकसित होण्यासाठी जुळलेलं असावं.

तुमच्या वैवाहिक जीवनात मला काहीच वैगुण्य दिसत नाही. सौख्यभरे नांदा! इतरांच्या अतिशयोक्तीयुक्त व बालिश वल्गना ऐकून जराही विचलित होऊ नका. लग्नानंतर पाच वर्षांनी बहुतांशी नॉर्मल जोडप्यांमध्ये महिन्यातून एक ते दोन वेळा शरीरसंबंध होण्याच प्रमाणच जास्त आढळतं. पुढे हे प्रमाण यापेक्षासुद्धा कमी होईल. वैवाहिक जीवनाचा परिपूर्ण आनंद घेतलेला असेल तर वयाच्या ४५ च्या सुमारास एका पवित्र अशा नवब्रह्मचर्याचा अनुभव आपल्याला येऊ शकेल. हे ब्रह्मचर्य बाहेरून लादलेलं नव्हे, तर आतून उमललेलं असेल. लैंगिकतेचं नैसर्गिक अतिक्रमण(Transcendance) असंही त्याला म्हणतात. तुमचं शारीरिक संबंधांचं प्रमाण कमी होणं हे तुमच्या नैसर्गिक लैंगिक विकासाचं एक स्वस्थ लक्षण आहे.

तुम्ही तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बेधडक विचारा. लैंगिक विज्ञान तज्ञ डॉ. राजन भोसले तुमच्या प्रश्नांची दर सोमवारी इथे उत्तरे देतील. तुम्हाला तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा.

तर मैत्रिणींनो, पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न lokwomen.online@gmail.com या इमेल आयडीवर. सब्जेक्ट मध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know the pros and cons of sex before marriage love spouse sexual wellness nrp