विजया जांगळे

ही गोष्टं आहे राजघराण्यातल्या, दोन गोड बहिणींची. मोठी लिलिबेट (एलिझाबेथ दुसऱ्या) आणि लहान मारगॉट (मार्गारेट). दोघींमध्ये चार वर्षांचं अंतर. जगातली सगळी सुखं पायाशी असलेल्या राजप्रासादात राहायचं, तिथल्या हिरवळीवर मनसोक्त खेळायचं, लाडक्या घोड्यांवर बसून घोडेस्वारीचे धडे गिरवायचे, पाळीव श्वानांना गोंजारायचं, आई-बाबांबरोबर सहलींना जायचं, अगदी स्वप्नवत भासावं असं हे आयुष्य… पण लिलिबेट १० वर्षांची असताना, तिच्या काकांना राजेपदावरून पायउतार व्हावं लागलं आणि या चौकोनी कुटुंबाचं भविष्य पूर्णपणे बदलून गेलं. घराबाहेर दंगा करणाऱ्या या मुलींना नॅनी घरात घेऊन आली. घरात गंभीर वातावरण होतं. त्यांचे बाबा आता राजे (किंग जॉर्ज सहावे) झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं. लिलिबेटला आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय याची जाणीव तत्क्षणी झाली असावी. बाबा राजे म्हणजे त्यांच्यामागे राजघराण्याचा मुकुट तिलाच वागवावा लागणार होता. छोटी मारगॉट मात्र आपल्या भविष्याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होती.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Asaduddin Owaisi Statement over Modi
Asaduddin Owaisi : “आंबेडकर जिंदा है तो गोडसे…”, असदुद्दीन ओवैसींची पंतप्रधान मोदींच्या विधानावर जोरदार टीका

बहिणी… मग त्या सर्वसामान्य कुटुंबातल्या असोत, वा राजप्रासादात वाढलेल्या, त्यांच्या नात्यात काही समान पैलू असतातच. तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असं हे नातं. यात एकमेकींविषयी प्रेम तर असतंच, पण त्याच वेळी असूयाही असतेच. लिलिबेट आणि मारगॉटचं नातंही काही वेगळं नव्हतं. त्यांच्या तत्कालीन गव्हर्नेस मेरियन क्रॉफर्ड यांनी ‘द लिट्ल प्रिन्सेसेस’ या पुस्तकात म्हटलं आहे की, या बहिणी अनेकदा एकमेकींशी खेळण्यांवरून आणि कपड्यांवरून भांडत, काहीवेळा मारामारीही करत. कोणीही माघार घ्यायला तयार नसे. मार्गारेट जास्त आक्रमक होती. काहीवेळा एलिझाबेथ माझ्याकडे येऊन हातावर चावा घेतल्याचे व्रण दाखवत तक्रार करत असे. दोघींनाही रात्री त्यांच्या बाबांकडून एक-एक चमचा बार्ली शुगर दिली जात असे. मार्गारेट सगळी शुगर एकदम तोंडात कोंबत असे. लिलिबेट मात्र आरामात चवीचवीने खात असे.

ब्रिटीश राजघराण्यासंदर्भात माहितीपटांची निर्मिती करणाऱ्या यूके डॉक्युमेंटरी चॅनलच्या ‘अनटोल्ड टेल ऑफ टू सिस्टर्स’ या माहितीपटात ब्रिटीश राजघराण्याच्या इतिहासतज्ज्ञ डॉ. ज्युडिथ रोबॉथम सांगतात, लिलिबेट लहानपणापासूनच काहीशी गंभीर, नीटनेटकी आणि आज्ञाधारक होती, तर मारगॉटची विनोदबुद्धी उत्तम होती, ती काहीशी खोडकरही होती. आपल्या मोठ्या मुलीवर साम्राज्ञीपदाच्या जबाबदाऱ्या पडणार आहेत. त्यामुळे तिने सर्व राजशिष्टाचार अवगत करावेत, नीट शिक्षण घ्यावं, याविषयी किंग जॉर्ज आणि क्विन एलिझाबेथ अतिशय आग्रही होते. लाड, मौज-मजा यापासून तिला दूर ठेवावं लागणं ही त्यांच्यासाठी अपरिहार्यता होती. किमान आपल्या धाकट्या मुलीला तरी स्वच्छंदीपणे जगता यावं, असं त्यांना वाटलं असावं.

मार्गारेटचं चरित्र लिहिणारे ख्रिस्तोफर वॉरविक सांगतात, या दोन राजकन्यांचे वडील किंग जॉर्ज (सहावे) यांनी कधीही मार्गारेटच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला नाही. ते म्हणत लिलिबेट माझा अभिमान आहे आणि मार्गारेट माझा आनंद आहे. पण यामुळे मार्गारेटमध्ये नकळत बेफिकीर वृत्ती वाढत गेली. लिलिबेटला साम्राज्ञी म्हणून सज्ज करण्यासाठी सर हेन्री मार्टीन यांच्याकडून प्रशिक्षण दिलं जाऊ लागलं. वडील किंग जॉर्ज तिला सम्राटाच्या दैनंदिन जबाबदाऱ्यांचा भाग असलेल्या पत्रवहारासंदर्भात माहिती देत. दुसरीकडे मार्गारेटला संगीत, पियानो, फ्रेन्च भाषेचं प्रशिक्षण दिलं जाऊ लागलं. एका चांगल्या कुटुंबात विवाहबद्ध होणं एवढंच तिचं आयुष्य असल्याप्रमाणे वागवलं जाऊ लागलं.

या दोन बहिणींनी दुसरं महायुद्ध एकत्र अनुभवलं. हल्ले तीव्र होऊ लागले तेव्हा त्यांना बकिंगहॅम पॅलेसमधून अधिक सुरक्षित असलेल्या विंडसर कासलमध्ये नेण्यात आलं. मार्गारेट १८व्या वर्षी ब्रिटीश सैन्याच्या ऑक्झिलरी टेरिटोरियल सर्विसमध्ये रुजू झाली. तिथे तिने मोटार मेकॅनिक होण्याचं, बंदूक चालवण्याचं आणि वाहनचालकाचं प्रशिक्षण घेतलं.

२० नोव्हेंबर १९४७ एलिझाबेथ आणि ब्रिटिश नौदलातले अधिकारी फिलिप माउंटबॅटन विवाहबद्ध झाले. या विवाहात मार्गारेट एलिझाबेथची ब्राइड्स मेड होती. १४ नोव्हेंबर १९४८ला चार्ल्सचा जन्म झाला आणि साम्राज्ञी पदाच्या उतरंडीवर दुसऱ्या स्थानी असलेल्या मार्गारेटची जागा चार्ल्सने घेतली.

१९५२ साली किंग जॉर्ज सहावे यांचा अवघ्या ५६व्या वर्षी मृत्यू झाला. परदेश दौऱ्यावर जाताना राजकन्या असलेली एलिझाबेथ ब्रिटनमध्ये परतली तेव्हा साम्राज्ञी झाली होती. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा शोक करण्याऐवजी डोक्यावर पडलेलं जबाबदाऱ्यांचं ओझं सांभाळण्यात, राजकीय डावपेच समजून घेऊन त्यांना तोंड देण्यात एलिझाबेथ व्यग्र झाली. एलिझाबेथने तिच्या एका मैत्रिणीला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, मम्मी आणि मार्गारेट यांना याचा सर्वाधिक धक्का बसला आहे. माझं लग्न झालं आहे, मुलं आहेत आणि साम्राज्ञीपदाची महत्त्वाची जबाबादारीही माझ्यावर आहे. पण त्यांच्यासाठी ही पोकळी भरून निघणारी नाही.

२ जून १९५३ रोजी राणीचा राज्याभिषेक झाला. अवघ्या २५ वर्षांची अतिशय सुंदर तरुणी जगातल्या सर्वात मोठ्या राजेशाहीची साम्राज्ञी झाली. हा काळ ब्रिटनसाठी फारसा गौरवशाली नव्हता. वसाहतवादाला धक्के बसत होते आणि ब्रिटनच्या अधिपत्याखाली असलेले अनेक देश स्वतंत्र होत होते. एलिझाबेथ एकीकडे राजकीय आव्हानांना तोंड देत होती, तर दुसरीकडे तिला लहान-मोठ्या गृहकलहांनाही तोंड द्यावं लागत होतं आणि त्यातच तिच्यासमोर एक मोठं आव्हान उभं ठाकलं. मार्गारेट आणि ग्रुप कॅप्टन पीटर टाउनसेन्ड यांचं प्रेमप्रकरण.

टाउनसेन्ड हा जॉर्ज सहावे यांच्या खास मर्जीतला होता आणि त्यांच्या खासगी सेवेत होता. राजप्रासादात त्याचा वावर असे. दुसऱ्या महायुद्धात पराक्रम गाजवलेल्या या तरुणाविषयी मार्गारेटला असलेलं आकर्षण एलिझाबेथच्या राज्याभिषेकप्रसंगी प्रसारमाध्यमांच्या निदर्शनास आलं होतं. तिने त्याच्या शर्टावरचा निघालेला दोरा काढून टाकला. ब्रिटिश राजघराण्यावर भिंग रोखून असलेल्या प्रसारमाध्यमांसाठी एवढा ऐवज पुरेसा होता. या दोघांना लग्न करायचं होतं, पण एक मेख होती. टाउनसेन्ड मार्गारेटपेक्षा १६ वर्षांनी मोठा होता आणि त्याचा नुकताच घटस्फोट झाला होता. त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुलंही झाली होती. ब्रिटिश राजघराण्यातल्या व्यक्तींना घटस्फोटीत व्यक्तींशी विवाह करण्याची परवानगी तेव्हा नव्हती.

एलिझाबेथला त्या दोघांमधलं प्रेम स्पष्ट दिसत होतं, पण त्यांच्या विवाहतले अडथळेही ती जाणून होती. तिचा अद्याप राज्याभिषेकही झाला नव्हता. राज्याभिषेक होऊ दे, सारं काही स्थिरस्थावर होऊ दे, मग काय करता येईल ते पाहू, असं तिने मार्गारेटला सांगितलं. एलिझाबेथने यातून मार्ग काढण्यासाठी आपल्या स्वीय सचिवाशी चर्चा केली असता, त्याने हे शक्यच नसल्याचं सांगितलं. टाउनसेन्डची बदली करण्याचा सल्ला दिला. विन्स्टन चर्चिल यांच्यासारखे काही अपवाद वगळता अन्य राजकीय नेत्यांनीही तिला हाच सल्ला दिला. राणी म्हणून एलिझाबेथ अनेक कायदेशीर आणि धार्मिक संस्थांची प्रमुख होती. तिचं मार्गारेटवर प्रेम होतं, तिला तिच्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करता यावं, तिने आनंदात रहावं, असं एलिझाबेथला वाटत होतं, मात्र राजघराण्याच्या प्रतिष्ठेचा, राणी म्हणून कर्तव्यपालनाचाही प्रश्न होता. तिने वैयक्तिक भावनांपेक्षा कर्तव्यांना प्राधान्य दिलं. मार्गारेटला टाउनसेंडशी लग्न करायचं असेल, तर तिचा राजगादीवरचा अधिकार आणि मिळणारे अलाउन्सेस यावर पाणी सोडावं लागणार होतं. राजघराण्याच्या कर्मठ नियमांमुळे आधी एका राजाला पायउतार व्हावं लागलं होतंच. आता एका राजकन्येला आपलं प्रेम गमावावं लागलं. या प्रसंगामुळे दोन बहिणींमध्ये एक मोठी दरी निर्माण झाली. टाउनसेन्डची बदली करण्यात आली.

ही घटना घडली तेव्हा मार्गारेट २२ वर्षांची होती. आणखी दोन वर्षं थांबली असती, तर ब्रिटनमधल्या कायद्यानुसार कदाचित ती पार्लमेन्टकडे विवाहाच्या परवानगीसाठी याचिका करू शकली असती. दोन्ही सभागृहांनी संमती दर्शवली असती, तर कदाचित मार्गारेट आणि टाउनसेन्ड यांचा विवाह झालाही असता. मात्र मार्गारेटने टाउनसेन्ड बरोबरचे प्रेमसंबंध संपुष्टात आल्याचं आणि त्याच्याशी विवाहबद्ध होणार नसल्याचं जाहीर केलं.

पुढच्या काळात मार्गारेटच्या राजघराण्यातल्या जबाबदाऱ्यांत वाढ करण्यात आली. जाहीर कार्यक्रमांत सहभागी होत मार्गारेट लोकप्रिय होऊ लागली. तिला बॅले, नाटक आणि कलांत स्वारस्य होतं. त्यासाठी ती काम करू लागली. तिचं ग्लॅमरस, मनमोकळं बिनधास्त व्यक्तिमत्त्व ब्रिटिशांना आकर्षित करू लागलं. ५० आणि ६०चं दशक तिने गाजवलं. काहीवेळा ती वादग्रस्तही ठरली. मार्गारेटने एका मुलाखतीत म्हटलं होतं की माझ्या बहिणीला स्वतःची एक सोज्ज्वळ प्रतिमा निर्माण करण्यासाठी लहानपणापासून प्रशिक्षण दिलं गेलं. माध्यमांना अशा प्रतिमेत स्वारस्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी नेहमीच माझ्यावर विक्षिप्तपणाचा शिक्का मारला.

मार्गारेट ६ मे १९६० रोजी अँथनी आर्मस्ट्राँग या छायाचित्रकाराशी विवाहबद्ध झाली. तो कोणत्याही राजघराण्याचा सदस्य नव्हता, त्याच्या नावे कोणताही भूप्रदेश नव्हता. या दाम्पत्याला दोन मुलंही झाली. पण परस्पर मतभेद आणि व्यसनाधीनतेमुळे हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. अँथनी कामानिमित्त सतत बाहेर राहू लागला आणि मार्गारेट मित्रांबरोबर पार्ट्या करण्यात, व्यसनांत मग्न झाली. १९७८ साली त्यांचा घटस्फोट झाला.

या काळात एकीकडे एलिझाबेथ साम्राज्ञी म्हणून प्रस्थापित झाली होती, ऐतिहासिक घटनांची, बदलत्या काळाची साक्षीदार ठरत होती तर दुसरीकडे राजकन्या मार्गारेट अस्तित्त्वशून्य एकाकी झाली होती. वडिलांप्रमाणेच तिलाही धूम्रपानाचं व्यसन होतं. दीर्घ आजारपणानंतर अखेर ९ फेब्रुवारी २००२रोजी तिचं निधन झालं.ख्रिस्तोफर वॉरविक यांनी नमूद केलं आहे की, एलिझाबेथला साम्राज्ञी म्हणून इतिहासाचा अभ्यास करण्याची जशी संधी मिळाली, तशी आपल्याला मिळाली नाही, याची खंत मार्गारेटच्या मनात होती. ती म्हणत असे, आई-वडिलांची धाकटी मुलगी म्हणून वाढताना मला फारसा त्रास झाला नाही, पण धाकटी बहीण असण्याचा मात्र फार त्रास झाला.

या दोन बहिणींचा जन्म होऊन साधारण शतक उलटत आलं आहे. राजेशाही आणि त्यातील कर्मठ कायदे आज पूर्णपणे कालबाह्य वाटतात. दोन बहिणींच्या गोड नात्यात तणाव निर्माण करण्यात या जाचक कायद्यांचा आणि सतत भिंग लावून बसलेल्या माध्यमांचाही मोठा वाटा होता. ९० वर्षांपूर्वी जन्माला आलेल्यांनी जे भोगलं, ते आजही ब्रिटीश राजघराण्यातील काही सदस्यांना भोगावं लागत आहे. राजेशाहीच्या कडेकोट भिंतींना आता आतूनही हादरे बसू लागले आहेत.

vijaya.jangle@expressindia.com