डॉ. लीना निकम
नुकताच ११ जानेवारी २०२३ रोजी एक अतिशय महत्त्वाचा आणि देशासाठी दिशादर्शक निर्णय कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत घेण्यात आला. या संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक पाळीची रजा मिळावी यासाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया प्रणित विद्यार्थी संघटनेने एक सादरीकरण केले होते. संघटनेची प्रदीर्घ काळापासूनची प्रलंबित मागणी लक्षात घेऊन विद्यापीठाने हा निर्णय घेतला. इतर राज्य सरकारांनी महिलांच्या टिकल्या, हिजाब, त्यांनी लग्न कोणाशी करायचे, कपडे कसे घालावेत या प्रश्नांवर समित्या बसवल्या. असे असताना केरळ राज्य मात्र स्त्रियांच्या मासिक पाळीच्या अडचणी समजून घेऊन त्यांना दिलासा देण्याचे काम करत असेल तर ही गोष्ट निश्चितच अभिनंदनास पात्र आहे. या निर्णयासंदर्भात काही तांत्रिक अडचणी विद्यापीठाला येऊ शकतात पण एकूणच स्त्रियांच्या शरीर धर्माचा आदर करणारा हा निर्णय आहे असे वाटते.
आणखी वाचा : मासिक पाळी उशीरा येण्यास ‘ही’ असू शकतात कारणे; जाणून घ्या यावर …
…अन्यथा पाळीविषयी आजही एवढ्या गैरसमजुती आणि घातक रूढी परंपरा समाजात रुळल्या आहेत की असे वाटते केव्हा बदलणार आपला समाज? काही महिन्यांपूर्वीचीच घटना आठवा. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक देवगाव आश्रम शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू होता. दहा मुलींकडून वृक्षारोपण केले जाणार होते. एक सर अचानक म्हणाले , ‘ज्या मुलींची पाळी सुरू असेल त्यांनी झाडे लावायला येऊ नका. कारण त्यांनी झाडे लावली तर झाडे जळून जातात. झाडांना हात सुद्धा त्यांनी लावू नका आणि इकडे फिरकू सुद्धा नका. मागच्या वर्षी लावलेली झाडं जगली नाहीत. ती वाळून गेली कारण मासिक पाळी सुरू असलेल्या मुलींनी ती झाडं लावली होती’ दहा मुलींपैकी एका मुलीची पाळी सुरू होती आणि ती मुलगी बाराव्या वर्गात होती. बाराव्या वर्गातील मुलगी चांगली मॅच्युअर असते. तिने प्रतिप्रश्न केला,’ सर मला झाड का लावू देत नाही? मासिक पाळीचा आणि झाडे लावण्याचा काय संबंध आहे?’ यावर ‘ शेफारू नको .जास्त बोलायला लागलीस!’ असं म्हणून तिचा प्रश्न दाबून टाकण्यात आला. खरं तर स्वतंत्र विचार करण्याची क्षमता तिच्यात आहे. त्या मुलीला तिच्या सरांनी वृक्षारोपणापासून दूर सारावे ही गोष्ट खरोखरच निंदनीय आहे. पुढारलेल्या महाराष्ट्रात मागासलेल्या चालीरीती आणि अंधश्रद्धा अजूनही कशा पाय घट्ट रोवून आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ज्या दिवशी भारताच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर एक आदिवासी महिला आरूढ झाली त्याच्याच दुसऱ्या दिवशी आदिवासी आश्रम शाळेतील मुलींना मासिक पाळी वरून वृक्षारोपण नाकारले जाते यासारखे दुर्दैव ते कोणते? जे शिक्षक या प्रकारचा संस्कार मुलांवर रुजवतात ते वैज्ञानिक दृष्टिकोन कसा रुजवणार? ज्या मासिक पाळीमुळे मानवाची वंशवृद्धी होते तर वृक्षाचे रोपण का होणार नाही? याचा थोडा तरी विचार स्वतःचं डोकं लावून शिक्षकांनी केला असता तर आज त्यांच्यावर जी काही कारवाई होणार ती टळली असती. त्या मुलीने थेट आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांकडे तक्रार केली आहे. खरंतर त्या मुलीच्या हिमतीला दाद द्यायलाच हवी. तिच्यामुळेच असे अंधश्रद्धेचे प्रकार उघड झाले. आता हा प्रकार घडलाच नाही वगैरे सारवासारव करण्यात काही अर्थ नाही. असे प्रकार आजही घडतात ही मात्र शरमेची बाजू आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा? असे म्हणण्याची वेळ आली आहे एवढे मात्र खरे!
आणखी वाचा : मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी आता औषधांची गरज नाही; ‘हे’ घरगुती उपाय …
आजही स्त्रीच्या शरीरधर्माविषयी किती वेगवेगळे, जाचक, घातक विचारप्रवाह ठाण मांडून आहेत! खरंतर तिच्या शरीरावर तिचाच हक्क हवा पण तिच्या मासिक पाळी बाबत समाजाने घालून दिलेले पायंडे, नियम, रूढी, चालीरीती अजूनही जोपासल्या जात आहेत. आदिवासी शाळेतील उदाहरण त्याचेच द्योतक आहे. म्हणजेच अंधश्रद्धेची झाडं अजूनही लावली जात आहेत आणि या रोपांना खतपाणी घालण्याचं कामही जोमाने सुरू आहे. पाळीबाबत ज्या अंधश्रद्धा समाजात दृढ होत्या त्यामध्ये बदल मात्र निश्चित झाला आणि होत आहे. पाळीबाबत किती साऱ्या गैरसमजुती होत्या समाजात! मासिक पाळीच्या अवस्थेतील स्त्रीला रजस्वला म्हटले जाई. या चार-पाच दिवसाच्या काळात स्त्रीच्या अंगावरून जाणाऱ्या रक्तामध्ये काही अलौकिक शक्ती आहे अशी समजूत होती. या रक्ताबद्दल एक विलक्षण भीती प्राचीन काळी जगभरच्या सर्व लोकांना वाटत होती. हिंदूंनी तर स्त्रीला अगोदरच अनेक नियमांनी जखडून टाकलेले होते मग रजस्वलेच्या बाबतीत तर जास्तच नियम!
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे मासिक पाळी बंद होण्याचा काळ कोणता | sexual …
निसर्गाने रजोदर्शनाची जबाबदारी पुरुषांवर नाही तर स्त्रीवर टाकली आहे. स्त्रीवर आलेल्या या जबाबदारीचे स्पष्टीकरण करताना तैत्तिरीय संहितेने रजोदर्शनाचा संबंध ब्रह्महत्तेच्या पापाशी जोडणारी पुराणकथा रचली आहे. ती कथा ‘हिंदू संस्कृती आणि स्त्री’ या डॉ. आ.ह. साळुंखे यांच्या अभ्यासपूर्ण ग्रंथात दिलेली आहे. त्या कथेत इंद्राने केलेल्या ब्रह्महत्तेच्या पापाचा वाटा रजस्वला स्त्रियांनी घेतला म्हणून अशा स्त्रीबरोबर संभाषण करू नये, तिच्याजवळ बसू नये, तिच्या हातचे खाऊ नये कारण ती पापाचा रंग असलेले रक्त टाकत असते, असे म्हटले गेले आहे! त्याचबरोबर तीन दिवस तिने कसे वागावे याबाबत बारीक सारीक असे अनेक नियम सांगण्यात आले आहेत. तिने स्नान करू नये, केस विंचरू नयेत, डोळ्यांत काजळ घालू नये, दात घासू नयेत, नखे कापू नयेत, दिवसा झोपू नये, मास व मध खाऊ नये, ग्रहांकडे पाहू नये, हसू नये, जमिनीवर झोपावे, अन्न हातात घेऊन खावे, सधवेने एकदा जेवावे, विधवेने तीन दिवस अन्न वर्ज करावे, रजस्वला स्त्रियांनी परस्परांनाही स्पर्श करू नये या नियमांपैकी कोणत्या नियमाचा भंग केला असता कोणता परिणाम होतो याचेही विवेचन करण्यात आले आहे. रजस्वला असताना विशिष्ट नियम मोडला तर स्त्रीला होणारा पूत्र चोर, रोगी, टक्कल असलेला, नपुंसक, वेडा इत्यादी प्रकारचा होतो असे सांगण्यात आले आहे.