समाजातील आर्थिक दुर्बळ घटकातील विद्यार्थिनींना १२ वीनंतर व्यावसायिक (प्रोफेशनल) शिक्षणासाठी प्रवेश मिळाला तरी त्यांना हे शिक्षण घेणं, बरेचदा मोठ्या खर्चामुळे कठीण होतं. अशा गुणवंत विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणाचं स्वप्न असं काळवंडू नये म्हणून आपल्या देशात काही उद्योग समूहांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यापैकी प्रमुख उद्योग समूह म्हणजे, कोटक महिंद्रा. या समूहामार्फत कमकुवत घटकातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेणं सुलभ व्हावं यासाठी कोटक कन्या शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येते.
ही शिष्यवृत्ती देशातील सर्व विद्यार्थिनींसाठी लागू आहे. त्यांना देशातील नामवंत व दर्जेदार व्यावसायिक शिक्षण- प्रशिक्षण देणाऱ्या, अभियांत्रिकी (बीई/बीटेक)- वैद्यकीय (एमबीबीएस)- व्यवस्थापन (एमबीए) – अभिकल्प (डिझाइन) – वास्तुकला (आर्किटेक्चर)- एकात्मिक एलएलबी (इंटिग्रेटेड एलएलबी) अशासारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळायला हवा.
नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) किंवा नॅक (नॅशनल असेसमेंट ॲण्ड ॲक्रिडिटेशन काऊंसिल) या संस्थांनी मान्यता दिलेल्या शैक्षणिक संस्था या दर्जेदार संस्था समजल्या जातात.
अटी आणि शर्ती
(१) या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींना १२ वी बोर्डाच्या परीक्षेत किमान ८५ टक्के गुण मिळायला हवेत. (२) या मुलींच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न हे ३ लाख २० हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावं.
शिष्यवृत्तीचे स्वरुप
(१) या योजनेमध्ये निवडल्या गेलेल्या विद्यार्थिनींना अभ्यासक्रमाचा कालावधी संपेपर्यंत दरवर्षी दीड लाख रुपयांचं अर्थसहाय्य केलं जातं. (उदा- अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांचा असतो, तर इंटिग्रेटेड एलएलबीचा कालावधी पाच वर्षाचा असतो. हा कालावधी संपेपर्यंत दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाईल. तथापि या विद्यार्थिनींना या कालावधीत उत्तम गुण मिळवावे लागतील. याचे कट-ऑफ, कोटक- महिंद्रा संस्थेकडून निर्धारित केले जातील. अनुत्तीर्ण विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती दिली जाणार नाही. या कालावधीत शिस्तभंगाचे काही प्रकरण उद्भवायला नको.)
(२) या शिष्यवृत्तीअंतर्गत शिक्षण शुल्क, इंटरनेट शुल्क, लॅपटॉप खरेदी, अभ्यासक्रमाची पुस्तके आणि अभ्यासक्रमासाठी लागणारे इतर साहित्य (स्टेशनरी) यांच्यासाठी खर्च करता येतो. कॅम्पसमध्ये न राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहशुल्काचा यात अंतर्भाव आहे.
अर्ज प्रक्रिया
अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडावी लागतात-
(१) १२ वीची गुणपत्रिका
(२) सन २०२२-२३ साठी संबंधित शैक्षणिक संस्थेच्या शैक्षणिक शुल्काची माहिती देणारी कागदपत्रे
(३) शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळाल्याचं संस्थेचं पत्रं
(४) उत्पन्नाचा दाखला
(५) लागू असल्यास पालकांचा आयटीआर (इंकम टॅक्स रिटर्न) पुरावा
(६) आधार कार्ड
(७) बँक पासबुक
(८) पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
(९) लागू असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र
निवड प्रकिया
या शिष्यवृत्तीच्या निवडीसाठी प्रारंभी सर्वोच्च गुण आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थिनींची गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्यानंतर दोन टप्प्यांमध्ये मुलाखती घेतल्या जातात.
शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थिनीच्या खात्यात जमा केली जाते. त्यांना प्रत्येक सत्राच्या प्रारंभी शैक्षणिक शुल्काचं माहितीपत्रक, मागील सत्राचं गुणपत्रक आणि शुल्क पावती सादर करावी लागते.
संपर्क – दूरध्वनी- ०११-४३०९२२४८, ईमेल-kotakscholarship@buddy4study.com