भारतातल्या सक्षम, समर्थ नारीशक्तीचं दर्शन पुन्हा संपूर्ण जगाला घडणार आहे. ९ आणि १० सप्टेंबर रोजी दिल्लीत ‘जी-२०’ शिखर संमेलन होणार आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘ग्रुप ऑफ २०’ म्हणजे जी-२० या समूहाचं विशेष महत्त्व आहे. या संमेलनासाठी जगभरातून येणाऱ्या पाहुण्यांसाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. यात त्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यात विदेशी पाहुण्यांसाठी बुलेटप्रुफ लिमोझिन कार तैनात असतील. त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना खास ‘मार्क्समॅन’ प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यात महिला पोलीसांनाही हे विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जी-२० परिषदेच्या दरम्यान संरक्षणासाठी एकूण ४५ हजार जवान तैनात करण्यात येत आहेत. एखाद्या विशेष महत्त्वाच्या प्रसंगासाठी मार्क्समेनचं प्रशिक्षण दिलं जातं. या ‘मार्क्सविमेन’च्या पहिल्या तुकडीत १९ महिला कमांडो आहेत. मध्य प्रदेशच्या करेरा येथील ‘आयटीबीपी सेंटर’मध्ये या महिला कमांडोंना एक महिना अत्यंत कठोर प्रशिक्षण देण्यात आलं. भारत-तिबेट सीमा पोलीसदलाच्या प्रशिक्षण टीमनं त्यांना हे प्रशिक्षण दिलं आहे. उंचच उंच इमारतींवर चढणं- उतरणं, अगदी दुरूनही स्नायपरनं लक्ष्याचा अचूक भेद घेणं, असं अत्यंत खडतर प्रशिक्षण या सगळ्यांनी पूर्ण केलं. या महिला कमांडो देशातील वेगवेगळ्या राज्यांतील आहेत. स्वसंरक्षणाबरोबरच त्यांना बंदूक चालवण्याचंही प्रशिक्षण देण्यात आलं. हे ट्रेनिंग विशेषत: अचूक लक्ष्य भेदण्यासाठी होतं. त्यांना अत्याधुनिक हत्यारं, बुलेटप्रूफ जॅकेटस्, गम बूट देण्यात आले आहेत. जी-२० शिखर परिषदेच्या सर्व कार्यक्रमांच्या दरम्यान फ्रंटलाईन सुरक्षा गार्डसह शार्पशूटर म्हणून त्या काम करतील. आता जवळपास १०० यार्डांवरूनही या महिला लक्ष्याचा अचूक भेद घेऊ शकतात.

हेही वाचा… कामजिज्ञासा: मला इच्छाच होत नाही सेक्सची काय करू?

या महिला कमांडोंना अत्यंत सावध- ‘अलर्ट’ राहावं लागणार आहे. ‘चित्त्यासारखा प्रचंड वेग, ऊर्जा आणि ससाण्यासारखी तीक्ष्ण नजर’ या संकल्पनेप्रमाणे या महिला कमांडो आपल्या देशात येणाऱ्या पाहुण्यांच्या संरक्षणासाठी सज्ज असतील. अत्याधुनिक हत्यारं वापरण्यापासून आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी या महिला कमांडो तयार आहेत. बॉम्ब निकामी करणं, उंच इमारतींवर चढणं, हत्यारं चालवणे आणि संकटात सापडलेल्यांची करणे, या गोष्टींचं विशेष प्रशिक्षण त्यांना मिळालं आहे. दहशतवादी आणि हल्लेखोरांशी सामना करण्यासाठी शहरी ऑपरेशन्सबरोबर जंगल ऑपरेशन्समध्येही त्यांना विशेष तयार करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याचीही जबाबदारी त्यांच्यावर असेल.

हेही वाचा… चॉइस तर आपलाच: करियर आणि गृहिणीकामातला बॅलन्स कसा साधणार?

पोलीस दल किंवा लष्करातील महिलांची संख्या हळूहळू वाढते आहे. अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची जबाबदारी आता महिलांवर सोपवण्यात येत आहे. संरक्षणाची आताची ही जबाबदारी महिला कमांडो चोख पार पाडतील हा विश्वास या निमित्तानं दिसला. स्वातंत्र्य दिनी किंवा प्रजासत्ताक दिनी संरक्षण दलातील आपल्या स्त्री शक्तीच्या सामर्थ्याचं दर्शन संपूर्ण जगाला यापूर्वी झालेलं आहेच. त्या सक्षमतेचा हा आणखी एक आविष्कार आहे.

‘जी २०’ काय आहे?

‘जी-२०’ म्हणजे ‘ग्रुप ऑफ २०’- हा जगभरातील १९ राष्ट्रांचा समूह आहे. यामध्ये भारतासह अमेरिका, चीन, रशिया, ब्राझील, कॅनडा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, इटली, इंडोनेशिया, जपान, मेक्सिको, कोरिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्कस्तान व ब्रिटन या देशांचा समावेश आहे. परस्परांमधील व्यापारी व अन्य संबंध वाढवणं, हवामानबदलापासून महत्त्वाच्या विषयांवर संवाद घडवणं, हे या परिषदेमागील हेतू आहेत.

lokwomen.online@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ladies commandos have responsibility to protect foreign delegates also in g 20 summit in delhi dvr