अनघा सावंत
‘‘लालबाग म्हणजे गणेशोत्सवाची पंढरी. अशा ठिकाणी मी जन्मले, वाढले. मी खूप नशीबवान आहे की, ज्या माणसाच्या घरात मी जन्मले त्यानं हा उत्सव खूप मोठा केला,’’ हे सांगताना रेश्मा यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते. आणि अभिमान जागा झाला होता तो दिवंगत वडील ज्येष्ठ मूर्तिकार विजय खातू यांच्याबद्दल!
लालबागमधील ‘तेजुकाया मॅन्शन’मध्ये बालपण गेलेल्या रेश्मा या आयईएस शाळेच्या विद्यार्थिनी. वडिलांच्या मूर्तिकामामुळे लहानपणापासूनच घरात गणेशमय वातावरण. महाविद्यालयीन शिक्षणानंतर ॲनिमेशन, ग्राफिक डिझायनिंग, चित्रपट निर्मिती तसेच दिग्दर्शनही त्या शिकल्या. आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीची सात-आठ वर्षं जाहिरातक्षेत्रात काम केल्यानंतर त्या चित्रपट, मालिका, लघुपटांच्या दिग्दर्शनाकडे वळल्या.
दिग्दर्शनाचं काम उत्तम प्रकारे सुरू असताना अवघ्या सहा-सात महिन्यांनीच २६ जुलै २०१७ या दिवशी विजय खातू यांचं आकस्मिक निधन झालं. गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक असताना ओढवलेला हा प्रसंग कुटुंबियांसाठी खूप मोठा आघात होता. हा धक्का पचवणं रेश्मा यांच्यासाठीही खूप कठीण होतं.‘‘ज्या क्षणी ते गेले, त्या क्षणी अशी परिस्थिती होती, की गणेशोत्सव अवघ्या १५ दिवसांवर आला होता. कारखान्यामधील गणेशमूर्ती वितरणासाठी जवळपास तयारच होत्या. त्यामुळे काम थांबवून चालणार नव्हतं.’’
आणखी वाचा : ‘गोविंदा’च्या सातव्या थरावरून ‘माझं बाळ’ कोसळलं तेव्हा…
समाजामध्ये आपल्या वडिलांनी जपलेल्या प्रतिष्ठेचा विचार करून त्यांना खंबीरपणे उभं राहणं गरजेचं होतं. त्यामुळे वडिलांच्या निधनानंतर अवघ्या १५-२० मिनिटांतच त्यांनी मनाशी एक ठाम निर्णय घेतला आणि त्यांच्या कारागीर सिद्धेशला सांगितलं, ‘मी उद्यापासून कारखान्यात येतेय!’
विजय खातू यांच्या निधनानं संपूर्ण कारखान्यावर शोककळा पसरली होती. कारखान्याचं, कारागिरांचं पुढे काय होणार, हे प्रश्नचिन्ह सगळ्यांच्याच चेहऱ्यावर दिसत होतं. रेश्मा म्हणाल्या की, ‘‘बाबा गेले, तेव्हा मला जाणीव झाली की, ते खूप मोठं व्यक्तिमत्त्व आहे. मी घरी जे बाबा बघते आणि बाहेर जे बाबा आहेत, ते खूप वेगळे आहेत. बाबा गेल्यावर जेव्हा त्यांचं पार्थिव कारखान्यात आणलं गेलं, त्यावेळची अफाट गर्दी पाहून प्रचंड नाव आणि माणसं त्यांनी जमवली आहेत, याची जाणीव झाली. मी अक्षरश: भारावून गेले आणि मलाही हे पुढे चालू ठेवायचंय, हा दृढनिश्चय मी त्या क्षणीच मनाशी नक्की केला.’’
आणखी वाचा : ‘यूं ही चला चल राही…’ महिला चालकांच्या हातीच गाडी सर्वाधिक सुरक्षित!
स्मशानभूमीतच रेश्मा यांनी ‘यापुढे कारखान्याची धुरा मी हातात घेतेय’, असं आपले काका राजन खातू यांना सांगितलं. तत्पूर्वी कारखान्यातील या कामाची कोणतीच पूर्वकल्पना रेश्मा यांना नव्हती. त्यामुळे ‘ही मुलगी काय करणार व्यवसाय?’, ‘हे खायचं काम नाही. तिला जमणार नाही’, अशाप्रकारच्या अनेकांच्या टीकेला त्यांना सामोरं जावं लागलं. हे वर्ष शेवटचं असेल आणि परत काही खातूंचा कारखाना उभा राहणार नाही, अशी चर्चाही होऊ लागली. पण रेश्मा यांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. २०१७ हे वर्ष सरलं.
२०१८ मध्ये रेश्मा यांनी मोठ्या उमेदीनं पुन्हा सुरुवात केली, परंतु एक मुलगी म्हणून त्यांच्यावर अविश्वास दाखविला गेला आणि त्यामुळे गणपती करण्यासाठीचं मुख्य स्थळ ‘परळ वर्कशॉप’ मैदान त्यांच्या हातातून गेलं. तरीही न खचता जिद्दीनं त्यांनी एका छोट्याशा जागेत आपल्या कार्याला सुरुवात केली. २०१८ च्या गणेशोत्सवात रेश्मा यांच्या या कार्यशाळेतून ज्या मूर्ती बाहेर पडल्या, त्या पाहून मात्र लोकांनी उद्गार काढले, ‘‘विजय खातू जिवंत आहेत!’’ आपल्या वडिलांना जिवंत ठेवायचा अट्टहास बाळगलेल्या रेश्मा यांच्यासाठी ही खूप मोठी पोचपावती होती.
आणखी वाचा : गणेशोत्सव विशेष : गणपतीची इकोफ्रेंडली सजावट, फक्त शंभर रूपयांत!
एक मुलगी म्हणून रेश्मा यांना त्यांच्या वडिलांच्या नावाचं वलय आयतं मिळतंय, हे काही मूर्तीनिर्मिती उद्योगातील प्रतिस्पर्ध्यांच्या पचनी पडलं नाही. पण तरीही या हितशत्रूंना न जुमानता २०१८ मध्ये त्यांनी अनेकांचा विश्वास संपादन केला. पुढे २०१९ मध्ये आर्थर रोड येथे मोठी जागा घेऊन आपली घोडदौड त्यांनी चालूच ठेवली. पुढे २०२०च्या गणेशोत्सवाच्या काळातील अनुभवाबद्दल त्या म्हणाल्या, ‘‘२०२०च्या या काळात माझी मंडळं, माझे कारागीर फोडण्याचा प्रयत्न झाला. माझ्याकडून काही मंडळं गेलीसुद्धा. काही कारागीरसुद्धा छुप्या पद्धतीने, तर काही उघडपणे काम करायचे. हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. पण हे जे काही घडतंय, याचा अनुभव घेणंही खूप गरजेचं आहे, असा विचार मी केला. मात्र यावेळी मनाशी मी निर्धारच केला की करोनाचं टळलेलं असू दे किंवा नसू दे मला पुन्हा परळ वर्कशॉपमध्ये यायचंच. मला कमी लेखण्याचा जो प्रयत्न केला जातोय, तो मला खोडून काढायचा पाहिजे.’’
जवळजवळ तीन वर्षांनी २०२१च्या जुलै महिन्यात रेश्मा यांनी पहिल्यांदाच स्वत:च्या हिमतीवर परळच्या कारखान्यात काम सुरू केलं आणि खातूंचा कारखाना पुन्हा एकदा नव्या दिमाखात उभा राहिला. याविषयी त्या म्हणाल्या, ‘‘हा कारखाना घेताना नुकसान, फायदा याचा विचार मी केला नाही. ‘परेल वर्कशॉप’ हे खातूंचं म्हणून ओळखलं जातं. २२ वर्षं या पवित्र वास्तूत माझ्या बाबांनी जे कमावलं ते मला कधीही पुसायचं नाही. माझे बाबा हे एका झाडाचं मूळ आहेत आणि त्यांनी घडविलेले मूर्तिकार म्हणजे या झाडाच्या अनेक पारंब्या आहेत. म्हणून हे मूळ मला टिकवायचंय.’’
२०२० मूर्तीसाठी अन्यत्र गेलेली अनेक मंडळं रेश्मा यांच्या विश्वासावर परतली. पुरुषी मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात एका प्रसिद्ध मूर्तिकाराची मुलगी असूनही त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं. तरीही हे आव्हान झेलून सध्या आपल्या कारागिरांसोबत हा डोलारा त्या एकटीने यशस्वीपणे पेलत आहेत. गेल्या चार वर्षात कोणाची बहीण तर कोणाची मुलगी म्हणून त्यांनी अनेक नातीही जोडली आहेत. काही मानाच्या मंडळांच्या गणेशमूर्तीचे मुखकमल ही त्या त्या मंडळाची एक स्वतंत्र ओळख आहे आणि ही ओळख (Signature face) कायम ठेवण्याचे अनमोल कार्य रेश्मा खातू करीत आहेत. पुढेही हे कार्य अविरत चालू ठेवण्याचा त्यांचा निश्चय आहे. गणेशोत्सवाच्या तीन महिन्यांव्यतिरक्त इतर महिने त्या आपल्या चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत असतात. मात्र “गणेशोत्सवाच्या काळात मी पूर्णतः सगळं विसरून त्या वातावरणात तल्लीन होऊन जाते”, असे त्या आवर्जून सांगतात. परदेशातही रेश्मा यांनी घडवलेल्या सुंदर गणेशमूर्ती पोहोचल्या आहेत. परदेशात विजय खातू यांचं नाव आदरानं घेतलं जातंच, पण अजूनही मोठ्या प्रमाणात ते पुढे न्यायचंय, हा रेश्मा यांच्या मधला आत्मविश्वासच त्यांची पुढची दिशा लख्खपणे जाणवून देतो.
anaghasawant30@rediffmail.com