दिल्लीतलं शाहबाद प्रकरण का घडलं? पुण्यातलं सदाशिव पेठेत भररस्त्यात कोयता हातात घेऊन धावण्याची हिंमत नराधमात कुठून आली? हे सगळं एकतर्फी प्रेमातून घडलं? प्रेमाला नकार दिला म्हणून घडलं? की आजूबाजूच्या लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली म्हणून घडलं? असे अनेक सामाजिक प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून उपस्थित होत आहेत. परंतु, ही प्रकरणं घडली ती पीडितांनी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन केला म्हणून. समाजातलं दडपण, अब्रू जाण्याची भीती आदींमुळे मुली शांत बसल्या आणि या शांततेला दुर्बलता समजून रोड रोमिओंनी भर रस्त्यात मुलींवर वार केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या आजूबाजूला काय घडतंय? कोण ओरडंतय, किंचाळतंय, धाय मोकलून रडतंय याकडे पाहायला ना कोणाकडे आवड आणि नाही सवड. कोणीतरी हातात चाकू, सुरा, कोयता घेऊन रस्त्यावरून धावत सुटलेला असतो, पण त्याला थांबवण्याचं, अडवण्याचं धाडस कोणीच करत नाही. या शस्त्रधाऱ्यांना थांबवणं तसं जिकरीचं. एकट्याला जमणं शक्यच नाही. पण रहदारीच्या ठिकाणी अनेक हात एकत्र आले तर सहज या गोष्टींना नमवलं जाऊ शकतं. पण गर्दीला जसा चेहरा नसतो तसंच, हातही नसतात का? मग लेशपाल जवळगेसारखा एखादा धाडसी तरुण उठतो आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बिथरलेल्या तरुणीचे प्राण वाचवतो. पण हा लेशपाल किती आणि कुठे कुठे पोहोचणार? दिल्लीतील शाहबाद येथंही तो असता तर कदाचित त्या प्रकरणातील पीडिता आज जिवंत असती. लोकांनी डोळ्यांवर बांधलेल्या पट्टीमुळे या मुलीचा नाहक जीव गेला. त्यामुळे, अशा प्रकरणांमध्ये तुम्हा-आम्हालाच धगधगती अग्निशीखा बनून उभं राहावं लागणार आहे. आपल्यालाच आपल्यावरील होणाऱ्या हल्ल्यांविरोधात प्रतिहल्ला करावा लागणार आहे.

हेही वाचा >> “त्या मुलीची जात कुठली?…”, पुण्यातील कोयता हल्ल्याप्रकरणी लेशपालची इन्स्टा स्टोरी चर्चेत

महिला सोशिक, संवेदनशील, भावनाशील असतात. पण त्या करारी आणि रणरागिणीही असतात. पण याची जाण तुम्हा-आम्हाला वेळेत झाली पाहिजे. महिलांवर होणारे जीवघेणे हल्ले अचानक घडत नाहीत. त्याआधी अनेक छोट्या मोठ्या घटनांना या महिला सामोऱ्या गेलेल्या असतात. या छोट्या मोठ्या प्रसंगांकडे दुर्लक्ष केल्यानेच पुढे जाऊन डोक्यात दगड आपटला जातो किंवा भररस्त्यात कोयत्याने वार केले जातात. त्यामुळे पहिल्याच छेडछाडीच्या वेळी जर लिंगपिसाटांच्या सणसणीत कानशिलात लगावली तर पुढच्या वेळेस मुलींकडे नजर वर करून पाहतानाही हे नराधम दहा वेळा विचार करतील. अशा नराधमांना फक्त कानशिलात लगावून नाही तर वेळीच कायदेशीर कारवाई करून वठणीवर आणल्यास पुढे होणारे बरेच अनर्थ टाळता येतील. या बाबी फक्त बोलण्याकरता नसून फक्त एकदा हल्ल्याविरोधात प्रतिहल्ला करण्याची हिंमत दाखवा. मग ही हिंमत प्रत्येक प्रसंगी कशी बळावत जाते ते तुम्हीच पाहा.

आपल्यावरील अत्याचार रोखण्यासाठी कोणीतरी येऊन आपल्याला मदत करेल अशी अपेक्षा करण्यापेक्षा महिलांनीच पुढे होऊन आपला आवाज वाढवला तर अधिक लवकर परिवर्तन घडून येऊ शकेल. नकोसा असलेला स्पर्श, किळसवाणी नजर, गर्दीचा फायदा घेत मारलेला धक्का, अश्लील मेसेज, प्रेमाची जबरदस्ती या सार्‍या घटनांमध्ये महिला गप्प राहतात. लोक काय म्हणतील, घरचे आपल्यालाच नावे ठेवतील या दडपणामुळे प्रत्युत्तर देत नाहीत, प्रतिकार करत नाहीत आणि यामुळेच अशा नीच माणसांचं अधिक फावतं.

आपल्या ठायी असलेले प्रेम, मायाळूपणा, स्नेहभाव हे गुण दुर्बलतेची लक्षणे नाहीत. आपल्यात जशी लक्ष्मी, सरस्वती वसलेली आहे तशीच चंडिका, रणरागिणीही वसलेली आहे. त्यामुळे या चंडिकेचे उग्र रुप धारण करून आपण समाजाला वठणीवर आणूच शकतो. आपल्यामध्ये एखाद्या गोष्टीविरोधात सामना करण्याचं बळ निसर्गताच असते. केवळ या बळाची जाणीव आपल्याला होत नाही. आपल्यातील हीच आत्मशक्तीची जाणीव वेळेत झाली तर समाजातील असे अनिष्ट प्रकार लवकरच संपुष्टात येतील. एकीचं पाहून दुसरीलाही आपोआप बळ मिळत जाईल आणि समाजातील असंख्य महिला आपोआप शक्तीशाली बनत जातील. फक्त समाजाचं असलेलं दडपण झुगारून लंपट, मजनू, संधीसाधू, लिंगपिसाट व्यक्तींना तिथल्या तिथं ठेचण्याची हिंमत ठेवा. कारण, प्रत्येकवेळी लेशपाल जवळगे आपल्या आजूबाजूला असेलच याची खात्री नाही!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leshpal javalge will not reach everywhere defend yourself in every situation article on delhi shahbad case darshana pawar and pune koyata attack incident sgk
Show comments