या दिवाळीत तुम्ही आपल्या पारंपरिक फराळातले तमाम पदार्थ तयार केले असतील किंवा निदान विकत तरी निश्चित आणले असतील. पण हल्ली आपण वर्षभर वेळोवेळी स्नॅक्स म्हणून चकल्या, लाडू खातच असतो. त्यामुळे या पदार्थांचं आता पूर्वीसारखं अप्रूप वाटत नाही. आणखी काहीतरी वेगळं असावं असं वाटतं. आज आम्ही तुम्हाला प्रांतोप्रांती केलल्या जाणाऱ्या अशा काही पदार्थांची ओळख करून देणार आहोत, जे ‘दिवाळीचा आगळावेगळा फराळ’ या संकल्पनेत फिट्ट बसतील!
आणखी वाचा : यंदा दिवाळीत काढा, अशी रांगोळी!
स्वीट अवल
पोह्यांचा चटपटीत तिखट चिवडा तर सगळेच करतात. पण तुम्हाला या दिवाळीत काही वेगळं करून पाहायचं असेल तर पोह्यांचा गोड चिवडा करून पाहा! ‘गोड चिवडा’ म्हटल्यावर काहींच्या भुवया उंचावल्या असतील. पण ‘स्वीट अवल’ हा एक सोपा, लोकप्रिय केरळी पदार्थ आहे. तो गोड असतोच, पण इतर पारंपरिक गोड पदार्थांप्रमाणे खाल्ल्यावर जड वाटत नाही. येताजाता फक्की मारून सहज खाता येतो आणि योग्य प्रकारे केला तर खूप दिवस टिकतो. स्वीट अवलसाठी पारंपरिकरित्या लाल (ब्राऊन) रंगाचे जाड पोहे वापरतात. आधी पोहे मंद गॅसवर छान भाजून घेतात. थोडे काळे तीळही (पारंपरिक रेसिपीमध्ये काळे तीळच वापरतात.) भाजून घेतात. गुळात पाणी घालून त्याचं मध्यम घट्ट असं सिरप करून घेतात. (रीतसर रेसिपी इथे देत नाहीयोत. पण साधारणपणे अर्धा किलो पोहे घेतलेत तर दीडशे ग्रॅम किंवा अंमळ जास्त गूळ आणि त्याला पाव कप पाणी असं माप वापरलं जातं. गुळाचं प्रमाण खूप वाढवून चालत नाही. नाहीतर अति पाकामुळे सगळे पोहे एकमेकांना चिकटून बसतील!)
आणखी वाचा : दिवाळीत असा असू द्या आहार
शेवटी थोड्या साजूक तुपावर ओल्या किंवा सुक्या खोबऱ्याचे पातळ तुकडेही भाजून घेतात. त्यात गुळाचं तयार केलेलं सिरप घालतात. मंद गॅसवर त्याला छान बुडबुडे येईपर्यंत गरम होऊ देतात आणि मग त्यात भाजलेले पोहे आणि तीळ घालून पोह्यांवर गुळाचा पाक छान लागेपर्यंत मंद गॅसवरच मिक्स करतात. गॅस बंद करून पोहे थोडे कोमट झाले, की ते पाकचा थर बसून सुके सुके होईपर्यंत वर-खाली असे डावानं हलवतात. पोह्यांवर पाकाचा ओलावा राहतोय असं वाटलं तर थोडंसं तांदळाचं पीठ भुरभुरून चिवडा डावानं मिक्स करून घेतात. या चिवड्याला वेलदोडा, सुंठपूड घालून छान लागते. केरळमध्ये अनेकजण पारंपरिकरित्या वेलदोड्यासह जिरे पावडर फ्लेवरसाठी वापरतात. हा आगळावेगळा गोड चिवडा तुम्हाला नक्की आवडेल याची आम्हाला खात्री आहे.
आणखी वाचा : हिवाळा आला, आहाराची वेळ पाळा
पोट्ट कडल उरुंडई (डाळ्याचे लाडू)
हा तामिळनाडूमध्ये आणि इतरही काही भागांत केला जाणारा एक अगदी सोपा लाडूचा प्रकार आहे. यात डाळ (फुटाण्याची डाळ) हलकं भाजून घेतात. त्यात आपल्या गोडाच्या आवडीप्रमाणे पिठीसाखर आणि वेलची पूड घालून मिक्सरमध्ये पावडर करून ती चाळून घेतात आणि वरून पातळ साजूक तूप घालून छोटे छोटे लाडू वळतात. अगदी झटपट होणारे हे लाडू अगदी खमंग लागतात.
आणखी वाचा : दिवाळीला का करतात अभ्यंगस्नान? त्याचे शास्त्रीय महत्त्व काय ?
मसाला चुरमुरी/ मसाला मंडक्की
सारखा सारखा फराळ खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर त्यावर उपाय म्हणून तुम्ही ‘मसाला चुरमुरी’ किंवा ‘मसाला मंडक्की’ ही खास डिश करून खाऊ शकता. कर्नाटकमध्ये आणि दक्षिण भारतात काही ठिकाणी तुम्हाला स्ट्रीट फूड म्हणून हा पदार्थ मिळेल. काही लोक याला ‘कारा पोरी’ असंही म्हणतात. ही साधी चुरमुऱ्यांची भेळच आहे. पण त्यात फरसाण, शेव घालायची मुळीच गरज नाही! मजा आहे ना?
सोप्या आणि चटपटीत ‘मसाला मंडक्की’साठी थोड्या तेलावर कढीपत्ता आणि शेंगदाणे परततात आणि आपल्याला हवे तेवढे चुरमुरे त्यात घालून तेही कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतात. फार भाजण्याचीही आवश्यकता नाही. चुरमुरे थोडे थंड व्हायला बाजूला ठेवतात. दुसऱ्या एका मोठ्या पातेल्यात चिरलेला कांदा, किसलेलं गाजर, चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतात. त्यातच मीठ, काश्मिरी लाल तिखट, थोडीशी हळद आणि आवडीप्रमाणे अगदी थोडा गरम मसाला किंवा चाट मसाला घालून मिश्रण एकत्र करून घेतात. त्यात भाजलेलं चुरमुऱ्यांचं मिश्रण घालून वरून लिंबू पिळून एकजीव करतात. कोणतेही फरसाण न घातलेली ही भेळ खूपच छान लागते. फराळावर उतारा म्हणून तर तुम्हाला ती निश्चित आवडेल!
आणखी वाचा : यंदाच्या दिवाळीत ‘असा’ करा झटपट मेकअप; अधिक फुलून उठेल तुमचे सौंदर्य!
अच्च मुरुक्कु
मुरुक्कु म्हणजे दक्षिण भारतीय चकली, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तुम्ही कधी ‘हॉट चिप्स’, ‘अय्यंगार बेकरी’ वा तत्सम दुकानांमध्ये गेला असाल, तर तुम्हाला सुरेख फुलाचा आकार असलेला एक गोलाकार पदार्थ पाकिटांमध्ये विकायला ठेवलेला दिसेल. याला म्हणतात ‘अच्च मुरुक्कु’. याचा फुलाचा आकार एक विशिष्ट साच्यामुळे येतो. या मुरुक्कुचं पीठ आपल्या चकलीच्या पिठासारखं घट्ट नसतं. तांदूळ पीठ आणि डाळीचं पीठ हे प्रमुख घटक. साधारणपणे एक किलो तांदूळ पीठास पाव किलो डाळीचं पीठ घेतात. मात्र हे तांदूळ पीठ तांदूळ आधी धुवून, वाळवून त्यापासून पीठ करून चाळून घेतलेलं असतं. हल्ली शहरात मोठ्या दुकानांत अशी पिठं तयारही मिळतात. या दोन पिठांत फक्त तिखट, मीठ, हिंग एवढंच घालतात आणि धिरड्यासारखं पातळ पीठ तयार करून घेतात. अच्च मुरुक्कुच्या साच्यात एक साखळीला फुलाचा साचा जोडलेला असतो आणि ते हातात धरायला त्याला एक लांब दांडी जोडलेली असते. (हा साचा ऑनलाईन संकेतस्थळांवर सहज मिळतो.) फुलाचा साचा बॅटरमध्ये बुडवायचा आणि तो सावधपणे, अलगद गरम तेलात बुडवायचा, म्हणजे काही सेकंदांनी साच्यातून फुलाच्या आकाराचं मुरुक्कु तेलात वेगळं होतं. मग ते कुरकुरीत तळून घेतात. हा पदार्थ गोडातसुद्धा करता येतो. काही लोक गोडाच्या अच्च मुरुक्कुमध्ये अंडही घालतात.आपल्या हुशार, सुगरण ‘चतुरा’ लगेच युट्यूब वर जाऊन या रेसिपी शोधतील याची आम्हाला खात्री आहे!
आणखी वाचा : सोन्या-चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स; दिवाळीत दिसतील अगदी नव्यासारखे!
हा मुरुक्कु प्रकार किचकट आहे हे निश्चित. पण ‘चतुरा’ तो तो शिकून घेऊन काहीशा सरावानं सहज करू शकतील. आगळीवेगळी दिसणारी ही चकली पाहुणे मंडळींच्या कुतूहलाचा विषय ठरेल!