मी प्रीति, एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पदावर आणि चांगल्या पगारावर काम करते. वय २६ वर्षे. घरात तीन भावंडं, त्यात दोघांची लग्न झालीत. मी लहान आहे आणि माझं लग्न अजून व्हायचंय. आता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे मला हे सांगायची सवय झाली आहे. होय, बरोबर वाचलंत तुम्ही. सवय.
काय आहे ना आपल्या समाजात तुम्ही कितीही शिकलात, नोकरीला लागलात, कितीही पैसा कमावत असाल… तरी तुमचं लग्न मात्र लवकर व्हायला पाहिजे. लग्न न करता एखाद्या मुलीने वयाची पंचविशी ओलांडली तर नक्की तिच्यामध्ये काहीतरी दोष आहे, असा सरळ ठपका ठेवला जातो. लोकांना तुमच्या स्वप्नांचं, तुमच्या कर्तृत्त्वाचं, तुमच्या कामाचं, पगाराचं काहीच कौतुक नसतं, त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं ते लग्न.
नातेसंबंध : लक्ष असावं, लुडबुड नको !
आता तुम्ही म्हणाल, मी इतकी शिकलेय तरी ‘कुछ तो लोग कहेंगे’ या गोष्टींना इतकं का महत्त्व देतेय? तर… तुमचं खरंय! म्हणजे खरं तर बाहेरच्या लोकांना माझ्या लग्नाची इतकी काळजी वाटत असती, तर त्याचा विचार मी केला नसता. किंबहुना करतही नाहीच. पण हे लोक जेव्हा आपले जवळचे असतात ना, तेव्हा जास्त त्रास होतो.
सॉफ्टपॉर्नवर आक्षेप नाही मग ऊर्फीवर का?
माझ्या घरात माझ्या लग्नाची काळजी करायला, मुलगा शोधायला माझे आई-वडील समर्थ आहेत. त्यांनाही माहीत आहे की त्यांची मुलगी २६ वर्षांची झाली आहे, मुलीचं लग्न व्हावं, याची काळजी त्यांनाही आहेच. पण, नातेवाईक नावाचा जो काही प्रकार असतो ना, त्यांना ते बघवत नाही. येऊन जाऊन आई-वडीलांना सतत माझ्या लग्नाबद्दल प्रश्न विचारणे, एवढंच काम जणू काही त्यांना उरलंय.
मी तर हल्ली नातेवाईकांकडे जाणंही सोडलंय. त्यातल्या त्यात नात्यात लग्न असेल ना तर मी कटाक्षाने टाळते. कारण त्या लग्नात त्यांना चर्चा करायला माझ्याच लग्नाचा एकमात्र विषय असणार याची मला खात्री पटली आहे.
Urfi Javed तुला लागली कोणाची ‘उर्फी’…!
लग्नाच्या बाबतीत येणारा हा अनुभव फक्त माझा एकटीचा नक्कीच नाही. माझेही अनेक मित्र-मैत्रिणीही याच टप्प्यातून जात आहेत. तुमच्यापैकी अनेकांनाही या गोष्टी जाणवत असतीलच. त्यामुळे मला सर्व नातेवाईकांना एकच सांगायचं आहे. आमच्या लग्नाची काळजी तुम्ही करूच नका. आम्हाला लग्न कधी करायचं, कुणाशी करायचं, आमचं वय वाढतंय, लग्न वेळेत करायला हवं, या सर्व गोष्टी कळतात. त्यामुळे त्यावर तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित केलंत तर जास्त बरं राहील. आणि हो, लग्न ठरेल, तेव्हा पहिली पत्रिका तुम्हालाच देईन… त्यामुळे काळजी नसावी!