किशोरी शहाणे-विज
स्टार प्लसवर गेली दोन वर्षे सुरू असलेली लोकप्रिय मालिका ‘गुम है किसी के प्यार में’मधील माझ्या नकारात्मक व्यक्तिरेखेला ‘ITA -इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी अवॉर्ड’ मिळालं… एक नायिका म्हणून माझं नाणं खणखणीत वाजवलं आहे, आपण नकारात्मक व्यक्तिरेखाही उत्तमरीत्या साकारू शकतो, असा विश्वास या भूमिकेने दिला. मराठी चित्रपटातील मुख्य नायिका ते नकारात्मक भूमिका साकारणारी मी… हा पट डोळ्यांसमोर आला तेव्हा माझं मन भूतकाळात गेलं… अर्थात निमित्त ठरलं ते या पुरस्काराचं!
मिठीबाई कॉलेजमध्ये शिकता शिकता ‘मिस मिठीबाई’ झाले. पुढे अभिनयात -जाहिरातींसाठी ऑफर येत गेल्या. त्यासाठी मुद्दाम असा विशेष प्रयत्न करावा लागला नाही. माझी बहीण हवाईसुंदरी आहे. माझ्या आई-वडिलांनी नेहमी आम्हा मुलींना प्रोत्साहनच दिलं. ते दोघेही मुलींनी डे-नाईट काम करायचं नाही, अभिनय क्षेत्रात जायचं नाही सांगणारे नव्हते. त्यांनी चौकटीबद्ध विचार केला नाही. त्यामुळे लहानपणापासूनच मला खुल्या विचारसरणीचं बाळकडू मिळालं. परिणामी करिअर आणि व्यक्तिगत जीवन यांचा समन्वय साधणं सोपं गेलं. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर- सगळं ‘सॉर्टेड’ होऊ शकलं. त्याला कारण ठरली पालकांनी रूजवलेली मूल्यं आणि खुली विचारसरणी !
आणखी वाचा : विवाह समुपदेशन: ‘सोलमेट’चा वैवाहिक नात्याला धोका?
मराठी चित्रपटसृष्टीत माझं करिअर उत्तम चालू होतं. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक दीपक बलराज विज यांनी त्यांच्या ‘हफ्ताबंद’ फिल्ममध्ये जॅकी श्रॉफ, वर्षा उसगांवकर आणि मला घेतलं. मी मराठी चित्रपटांमध्ये खूप काम केलं, पण कुठल्याही दिग्दर्शकानं मला शॉट चांगला दिल्याबद्दल कधी ‘गुड, व्हेरी गुड’ म्हटल्याचं आठवत नाही. दीपक विज मात्र सामान्य शॉटनंतरही ‘व्हेरी गुड’ म्हणत. त्यांची कलाकारांना प्रोत्साहन देण्याची पद्धत मला भावली. आमचं प्रेम जुळलं आणि मी त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ते स्वभावानं संकोची असल्यानं त्यांनी माझ्याकडे कधीही आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या नाहीत. दरम्यान ते पहिल्या पत्नीपासून विभक्त होण्याच्या विचारात होते आणि म्हणूनही त्यांनी मला लग्नाविषयी विचारलं नव्हतं. त्यांना पहिल्या पत्नीपासून दोन अपत्यं आहेत- मेघा आणि वरुण.
मी मराठी आणि दीपक पंजाबी. दीपक दोन मुलांचे पिता, त्यांचे आई-वडील, दोन भाऊ हेदेखील त्यांच्या कुटुंबाचा भाग होते. मी या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पेलू शकेन का, असा प्रश्न दोन्ही कुटुंबांकडून उपस्थित झाला, परंतु दीपकच्या प्रेमापुढे मला या जबाबदाऱ्यांचं ओझं वाटलं नाही. सगळ्या जबाबदाऱ्या मी स्वखुशीने मान्य केल्या. खरं म्हणजे, शारीरिक जबाबदाऱ्यांपेक्षा नैतिक-मानसिक पातळीवर जास्त महत्त्वाचं असतं, हे मी आजवरच्या अनुभवातून शिकले. त्यांच्या पहिल्या पत्नीचंही लग्न झालं.
आणखी वाचा : अगं उर्मिला, किती खरं बोललीस!
आमचं लग्न अगदी साधेपणाने झालं. लग्नाआधीच माझ्या वडिलांनी दीपक आणि विज कुटुंबीयांना ‘लग्नानंतर करिअर करू देणार का?’ असा प्रश्न विचारला होता! त्यावर दीपक म्हणाले, ‘माझ्याकडून कधीही तिच्या करिअर करण्यावर आडकाठी नसेल! हा निर्णय सर्वस्वी तिनेच घ्यावा. तिला आर्थिक स्वातंत्र्य कायम असेल. तिला मनासारखं जगता येईल!’ परंतु आमच्या लग्नानंतर घरच्या जबाबदाऱ्यांमुळे मला माझं ॲक्टिंगचं करिअर बॅक सीटवर ठेवावं लागलं! दीपकच्या होम प्रोडक्शन ‘बॉम्ब ब्लास्ट’ फिल्मची मी नायिका होते. हा सिनेमा पूर्ण केला आणि आमचं लग्न झालं. आमच्या लग्नाला २९ वर्षे पूर्ण झालीत. ज्या क्षणी मी विज कुटुंबाचा उंबरठा ओलांडला, त्या क्षणापासून या कुटुंबाने मला कल्पनेपेक्षा अधिकच प्रेम दिलं. आदर दिलाच; पण त्यांच्या हृदयातही मला स्थान मिळालं. मेघा आणि वरुण यांना मी माझीच मुलं मानलं होतं. लग्नांनंतर मला मुलगा झाला. त्याचं नाव बॉबी. या तीन मुलांचा घरचा अभ्यास घेण्यापासून ते त्यांचे शाळेचे प्रकल्प, क्लासच्या वेळा, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज, सासू-सासऱ्यांचा सांभाळ, घरात प्रॉडक्शन हाऊसची निर्मितीचं काम… हे सगळं एकाच वेळी – एकाच पातळीवर चालू असे. किमान ४ ते ५ वर्षे या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त होते. अर्थात त्याबद्दल माझ्या मनात ना खेद ना खंत. हे सांसारिक जीवनही मी भरभरून जगले. करिअर तर मी कॉलेजच्या दिवसांपासून सुरू केलं होतंच. ४०-५० मराठी सिनेमा, जाहिराती, अनेक सुपर हिट नाटकं, काही हिंदी चित्रपट करून मी करिअरबाबत समाधानी होते. कुटुंबासमवेत माझा वेळ आनंदात जात होता. लग्नानंतर ‘जरा विसावू या वळणावर’ असा विचार करतच मी माझं मेकअपचं सामान, हेअर विग्ज् देऊन टाकले. परंतु काही काळाने अनेक मराठी निर्मात्यांचे कामासाठी विचारणा करणारे फोन येऊ लागले, मी त्यांना नकार देत असे. पण माझ्या सासूबाईंनीच आग्रह धरला की, तुला अनेक निर्मात्यांचे फोन येत आहेत, तर तू नाही म्हणू नकोस. एखादी भूमिका तुला योग्य वाटली तर तू त्या भूमिकेचा स्वीकार कर!
आणखी वाचा : इंग्लंडमध्ये आता रजोनिवृत्तीसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे; महिलांना दिलासा!
त्यानंतर सचिन पिळगांवकर यांनी ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटासाठी विचारणा केली. सचिन पिळगांवकर एक मान्यवर दिग्दर्शक -निर्माता असल्याने मी या भूमिकेसाठी होकार दिला. त्यानंतर मला सतत ऑफर येत गेल्या. परंतु मी निवडक भूमिकाच स्वीकारत गेले. माझे आई-वडील, सासूबाई यांचा नेहमीच खंबीर पाठिंबा मिळाला. माझ्याकडे काम करणाऱ्या माझ्या तीन सहायक महिला या सगळ्यांमुळे हे सहज शक्य झालं. या जबाबदाऱ्या सांभाळताना खऱ्या आयुष्यातली आईची भूमिका मी समर्थपणे पेलली. माझ्या मुलांनीही माझ्यावर विश्वास टाकला, हीदेखील कौतुकाची बाब. मुलं मोठी झाली आहेत. बॉबी आमच्या होम प्रोडक्शन फिल्म ‘शॉट इन द डार्क -हे राम’द्वारे चित्रपट क्षेत्रात पदार्पण करतोय, तर मेघा ऑस्ट्रेलियन बॅंकेत बॅंकर आहे. तर वरुण प्रसिद्ध ॲड मेकर आहे. तो वडिलांनाही साहाय्य करतो, अनेक दिग्गजांसोबत त्याने जाहिरातीही केल्या आहेत.
माझं घर सांभाळून माझ्या करिअरचाही जितका आनंद घेता आला तो मी घेतलाच आणि पुढेही घेत राहीन. विवाहानंतर करिअरबाबत मी कधीही महत्त्वाकांक्षी नव्हते. पण घरातल्या जबाबदाऱ्या आणि करिअर ही तारेवरची कसरत उत्तमपणे साधता आली. इतकेच नव्हे तर या दोन्हींचा आनंद भरभरून घेतला आणि घेत आहे. खरंच कधी कधी या आनंदापुढे वाटून जातं- स्वर्ग यापुढे थिटा पडे!
samant.pooja@gmail.com