अपर्णा देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिगारेट पिणं हे वाईटच, हे माहीत असतं सगळ्यांना, पण त्यातही ‘ लाईट’, ‘ॲडव्हान्स’ ,‘हार्ड’ हे प्रकार असतात हे कित्येकांना, विशेषत: पालक मंडळींना माहीतच नसतं. अर्थात कुठल्याही प्रकारची सिगारेट हानीकारकच, पण पुढे माता-पिता होणाऱ्यांसाठी तर अधिकच वाईट.

“सिगारेट पिणं ही काय पुरुषांची मक्तेदारी आहे का? तो दायमा दिवसातून पंधरा वीस फंकतो! मी इतकी आहारी गेलेली नाही, तरीही तुम्ही माझ्याकडे फार मोठा गुन्हा केल्यासारखं काय बघताय?” नीरजा तिच्या आई वडिलांवर ओरडून बोलत होती.

“ आवाज खाली कर आधी ! तुझ्या या घाणेरड्या सवयीचं समर्थन होऊच शकत नाही नीरजा. तो दायमा का फायमा जो कुणी असेल त्याला काय करायचं ते तो बघेल, तू असल्या सवयीच्या आहारी गेलीच कशी? वाईट व्यसन हे स्त्री असो की पुरुष, दोघांसाठीही वाईटच ! तुमची कंपनीची बस येते त्या स्टॉपवर अगदी सकाळी सकाळी धुराचे लोट काढतात ही पोरं. इतक्या रम्य सकाळच्या वेळी काय ती अवदसा? ” आईचा पार चढला होता.

“ हे बघा, तुम्ही दोघं उगाच ‘सिन क्रिएट’ करताय. या कार्पोरेट जगात काम करायचं म्हणजे किती टेन्शन, किती स्पर्धा, आणि किती प्रचंड काम, याला रोज उठून सामोरं जायचं म्हणजे गंमत वाटली का तुम्हाला? इथे दुसऱ्यांच्या नाकावर टिचून स्वतःला सिद्ध करावं लागतं. इतरांशी ‘जेल अप’ होण्यासाठी कधी ड्रिंक तर कधी स्मोक करावं लागतं. आणि मी ‘ लाईट’ स्मोक करते. ती जेनी ‘ॲडव्हान्स’ पिते आणि मुलं तर ‘हार्ड’ ओढतात. तुम्हाला नाही कळणार ते.”

“ सगळं कळतंय. कामाचा ताण असतो, मलाही मान्य, पण टेन्शन काय फक्त तुम्हालाच आहेत का बेटा? आम्ही पण त्यातून जातोय किनई ? तणाव कमी करण्यासाठी आपल्याकडे किती उत्तम उपाय आहेत. त्यासाठी हा असा लाईट काय किंवा हार्ड काय, कुठल्याही सिगारेटचा धूर काढून फुफ्फुस खराब करून घेण्याची मुळीच गरज नाही. योगा, प्राणायाम, एखादा खेळ, सायकलिंग, पोहणे किंवा झुंबासारखे व्यायाम असे उपाय करता येतील की ! ऑफिस वरून आलीस, की यापैकी कुठल्याही क्रियेसाठी फक्त अर्धा तास दे, बघ किती फरक पडतो ते. ” बाबा शक्य तितका संयम दाखवत म्हणाले .

“ रिअली बाबा ? इतका वेळ असतो नाही का माझ्याकडे ? संध्याकाळी घरी पोचायला सात साडेसात होतात. मरणाची भूक लागली असते आणि तेव्हा करू हे तुमचे व्यायाम ? ”

आता आई चिडली. म्हणाली, “ वेळ मिळत नसतो गं, तो काढावा लागतो ! पार्टी ठरली की ऑफिस नंतर जाताच ना तुम्ही ? तेव्हा कसा वेळ मिळतो ? स्वतःचं अध:पतन होणार असेल तर ती नोकरी आणि तो पैसा काय कामाचा गं? शरीर पोखरून गेल्यावर त्या पैशांच्या राशी असून काय उपयोग ? आज सिगारेट पिणं, दारू पिणं गैर वाटत नाही, उद्या आणखी स्वैर वागणं गैर वाटणार नाही. आपली मूल्य जपण्याची तुम्हाला गरज वाटत नाही हे दुर्दैव आहे आमचं. तुमची पुढची पिढी तुमच्याकडून काय आदर्श घेणार ? संयमाचे धडे त्यांना कसे शिकवणार तुम्ही? शाळेत चार मार्क कमी पडले, की टेन्शन येऊन लगेच बाहेर जाऊन बिड्या ओढायच्या आणि बाटलीत आणलेली दारू ढोसायची का पोरांनी ? तेव्हा तर तुमची ही स्पर्धा आणखी वाईट झाली असेल. तशात जराही टिकणार नाहीत ती पोरं. कसं शिकवणार तुम्ही त्यांना सगळं? स्वनियंत्रण ( सेल्फ कंट्रोल ) असणं फार आवश्यक असतं बाई ! तुम्ही पोरी उद्याच्या माता आहात. तुमचं शरीर – मन निरोगी, तर मुलं निरोगी. विचार कर . अगदी कमी वयात खंगलेल्या म्हाताऱ्या माणसांसारखे व्हाल तुम्ही. कष्टाने कमावलेल्या त्या लाखो रुपयांचा उपभोग घेण्यासाठी उरणारच नाही तुम्ही. विचार कर. तू यापासून लांब राहण्याचा निश्चय कर, आणि त्या दायमा आणि बाकी पोरांनाही समजावून सांग की मी येऊ कंपनीत? ”

“ए आई, नको हं. पण तुझा शरीराचं नुकसान आणि पुढे जाऊन आई-वडील होण्याचा मुद्दा लक्षात घेतला नव्हता. मी प्रॉमिस करते की मी हे सगळं हळूहळू बंद करेन, आता खुश ?” नीरजा आईच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, तसे बाबा गमतीनं म्हणाले,

“नीरजा, जरा ते लाईट, अडव्हांस, आणि हार्ड, फरक सांगतेस का?”

आणि आईनं बाबांकडे बघून डोळे वटारले .

adaparnadeshpande@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Light advance hard cigarette names cigarettes are harmful chatura article ysh
Show comments