भाषा हे संवादाचे माध्यम म्हणून सर्वपरिचित आहे. समाज आणि भाषा हे परस्परावलंबी आहे. भाषेशिवाय जीवनाचा विचार करणे अवघड आहे. भाषाविज्ञानामध्ये भाषेचा सामाजिक, ऐतिहासिक, संरचनात्मक, वर्णनात्मक पद्धतीने अभ्यास केलेला आहे. सामाजिक घटकांचा भाषेवर परिणाम होत असतो. यातूनच भाषिक भेद निर्माण होतात. सामाजिक भाषाविज्ञानामध्ये स्त्रियांच्या भाषेचा विशेषत्वाने अभ्यास केलेला आहे. परंतु, स्त्रियांची, पुरुषांची भाषा म्हणजे काय ? आणि ‘स्त्री’ने मराठीला दिलेले भाषिक योगदान जाणून घेणे आवश्यक आहे.

स्त्रियांची भाषा म्हणजे काय ?

भाषेवरती आर्थिक, सामाजिक, व्यवसायानुसार प्रभाव पडत असतात. सर्वच भाषांच्या रचना या पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग यामध्ये विभाजित झालेल्या दिसतात. स्त्रीलिंगी विशेषणे, क्रियापदे, शब्द यांच्यामध्ये भेद दिसतो. स्त्री बोलताना जी स्त्रीलिंगी, वैशिष्ट्यपूर्ण भाषा बोलते तिला स्त्रियांची भाषा असे म्हणतात. याचे दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे म्हणजे- इंग्रजीत पुरुषाला ‘हॅण्डसम’ म्हणतात, पण हे विशेषण स्त्रीला लागू होत नाही. किंवा स्त्रीला ‘ब्युटीफुल’ म्हणतात, ते पुरुषाला म्हणत नाही. संस्कृतमध्ये काही विशेषणे ही पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी दिसून येतात. उदा. लावण्यवान-लावण्यवती, रूपवान-रूपवती. मराठीमध्ये स्त्री-पुरुष दोहोंना सरसकट ‘सुंदर’ म्हटले जाते. काहीच वेळी स्त्रीकरिता ‘सुंदरा’ हा शब्दप्रयोग केलेला दिसतो. विशेषणांप्रमाणे क्रियापदांवरही लिंगाचा प्रभाव आहे. स्त्रीवर्गाला ‘करते’-‘जाते’-‘खाते’-‘पिते’ अशी स्त्रीलिंगवाचक क्रियापदे शिकवली जातात. पुरुषांना ‘करतो’-‘खातो’-पितो’ अशी शिकवली जातात. लहान मुलगा बऱ्याच वेळा आईचे बोलणे ऐकून खाते-जाते असे शब्दप्रयोग करतो. खरंतर क्रिया समान असतात. परंतु, लिंगाचा त्या क्रियापदांवर परिणाम होतो. स्त्रीपरत्वे शिव्याही बदललेल्या दिसून येतात. काही शिव्या, अपशब्द हे स्त्रीकेंद्रित असलेलेही दिसतात, ज्याला सामान्यत: ‘आई-बहिणीवरून दिलेल्या शिव्या’ म्हटले जाते. तसेच मराठीतील अनेक शिव्यांमध्ये स्त्रीत्वाच्या वैशिष्ट्यांचा उपयोग केलेला दिसतो. हिंदी-इंग्रजीमध्येही स्त्रिलिंगी अपशब्दांचा वापर होतो.

Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
maori leader protest in newzealand
विधेयकाचा निषेध म्हणून महिला खासदाराचा ‘वॉर डान्स’; कुठल्या देशाच्या संसदेत घडला हा प्रकार?
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
old womans dead body found in Mutha river police investigation underway
पुणे : मुठा नदी पात्रात ज्येष्ठ महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू
woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला

हेही वाचा : विश्लेषण : बलात्काराची प्रकरणे का वाढत आहेत? बलात्काराची मानसिकता आणि ‘कॉपीकॅट क्राईम’ म्हणजे काय ?

‘स्त्री’चे भाषिक योगदान

स्त्री म्हणून असलेले नैसर्गिक वेगळेपण भाषेतही काही प्रमाणात प्रतिबिंबित होते. उदा. स्त्रीची शरीरयष्टी, तिच्या शरीरागात होणाऱ्या घडामोडी हे हेरून विशिष्ट शब्दांची निर्मिती मराठी भाषेत झाली आहे. काही शब्द केवळ स्त्रीसाठी वापरले जातात. चि.सौ.कां, सौभ्याग्यवती, माहेरवाशीण, लेकुरवाळी, जोगीण, पोटुशी. हे शब्द कधीही पुरुषांसाठी वापरले जात नाहीत. काही मराठी शब्द हे स्त्रीत्वाच्या वैशिष्ट्यांचे दर्शक आहेत. धुसफूस, गप्पाबिप्पा, आवराआवर, फुणफुणलेली, नकटी, चेटकीण. मराठी वाक्प्रचारांमध्ये स्त्री वैशिष्ट्यांचे योगदान अधिक आहे. काही म्हणी या स्त्रियांच्या अनुभवावर आधारित आहेत. ‘पावसाने झोडपलं अन् नवऱ्यानं मारलं तर जायचं कुठं’, ‘बाईचा जन्म’, ‘काय करावं बाई’, ‘दिल्या घरी सुखी राहा’, ‘बांगड्या भरल्यायस का’, ‘बायकोच्या ताटाखालचं मांजर’, ‘बायला’, बारा गावची भटक भवानी’, ‘सटवी’, ‘लेकी बोले सुने लागे’ असे शब्दप्रयोग हे पूर्णतः स्त्रीकेंद्रित असल्याचे दिसून येतात. ‘अय्या’, ‘इश्श’, ‘आम्ही नाही जा’ असे विशेष शब्द हे केवळ स्त्रियांसाठी असतात.

पुरुषी वैशिष्ट्यांनी युक्त स्त्री विशेषणे

पितृसत्ताक समाजात पुरुषत्वाच्या गुणवैशिष्ट्यांना अधिक महत्त्व दिल्यामुळे आपोआप स्त्रियांना दुय्यम दर्जा मिळाला. त्यामुळे त्यांच्या स्त्रीत्वाच्या गुणांचे अवमूल्यन काही प्रमाणात केले गेले. स्त्रीने जरी काही धाडसी कामगिरी करून दाखविली, तरी ती स्त्रीत्वाची गुणवैशिष्ट्ये समजली जात नसून तो पुरुषत्वाचा गुणधर्म समजण्यात येते. उदा. निवेदिता मेनन त्यांच्या ‘सिइंग लाईक ए फेमिनिस्ट’ या पुस्तकात सुभद्रा कुमारी चौहान यांची ‘खूब लढी मर्दानी, वोह तो झांसीवाली राणी थी’ या कवितेचा संदर्भ पुरुषी वैशिष्ट्यांनी युक्त स्त्री विशेषणांकरिता दिला आहे. समाजामध्ये प्रमाणित नमुना हा पुरुषांच्या गुणविशेषांचा असल्यामुळे स्त्रियांना नेहमी त्याच प्रमाणित नमुन्याच्या साच्यामध्ये पाहिले जाते. अनेकदा स्त्रीत्वाच्या वर्तणुकीबद्दलचे संदेश, नमुने हे जाहिराती, सामाजिक माध्यमे, शैक्षणिक साहित्य इत्यादी माध्यमांतून स्त्रियांवर ठसविले जातात. चित्रपट, जाहिराती यांच्या माध्यमांतून ‘नवीन स्त्री’ प्रारूप समोर येते; जे स्त्रीत्वाची पुन्हा एकदा परिभाषा करताना दिसते. यामध्ये सशक्त, आत्मविश्वासू, आधुनिक पेहराव केलेली, स्वतंत्र स्त्री अशी स्त्रीची प्रतिमा उभी केली जाते; मात्र असे असूनही तिच्यावर आधुनिकता व पारंपरिकता या दुहेरी परस्परविरोधी संकल्पनांची सांगड घालण्याचे ओझे असल्याचे दिसून येते. ‘टॉम बॉय’ ही संकल्पना स्त्रीसाठी वापरली जाते. ‘स्त्री’त्वाचा जो समाजाने साचा तयार केला आहे, त्यात न बसणाऱ्या स्त्रिया, मुलग्यांप्रमाणे वर्तन करणाऱ्या स्त्रियांना ‘बॉयीश’, ‘टॉम बॉय’, ‘पुरुषी’, ‘रावडी गर्ल’ अशी विशेषणे वापरली जातात. तिने मर्दानी खेळ खेळला, तिच्यात रग आहे. अशी विशेषणे वापरली जातात. ड्रामा क्वीन, निगेटिव्ह नॅन्सी, डेबी डाउनर अशी काही अपमानास्पद विशेषणेही स्त्रियांसाठी वापरली जातात.

जात आणि लिंग यांच्या आधारे केले जाणारे भेद हे भाषेवरतीही प्रभाव टाकत असतात. केवळ वाक्यरचनांपुरते मर्यादित न राहता, सांस्कृतिकही परिणाम ते घडवत असतात.

समाजामध्ये राहताना-बोलताना आपण अनेक वेळा स्त्रीकेंद्रित शब्दांचा प्रयोग करत असतो. हे शब्द, वाक्य, म्हणी खासकरून स्त्रीवैशिष्ट्यांनी युक्त असतात, हे आपल्याला कधी-कधी लक्षात येत नाही. परंतु, भाषासुद्धा लिंगभेदामुळे प्रभावित होते, याचे उदाहरण म्हणजे स्त्रीकेंद्रित भाषा होय.