वैवाहिक वाद हे मुळातच किचकट आणि क्लिष्ट असतात, त्यातच जेव्हा अशा वादात अपत्य, त्याचा ताबा इत्यादी मुद्दे येतात तेव्हा त्याची क्लिष्टता अजूनच वाढते. अशा परिस्थितीत एखाद्या आईने आपल्या अपत्याचा ताबा घेतला तर त्यास अपहरण म्हणता येईल का ? असा महत्त्वाचा प्रश्न तेलंगणा उच्च न्यायालयात पोचला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणात पती-पत्नीमध्ये वैवाहिक वाद होते आणि त्या अनुषंगाने न्यायालयीन प्रकरणेसुद्धा सुरू होती. या प्रकरणांमधील आदेशानुसार अपत्याचा ताबा पतीला म्हणजेच अपत्याच्या वडिलांना मिळालेला होता. मात्र पत्नीने म्हणजे अपत्याच्या आईने त्या अपत्याचा ताबा घेतला आणि अपत्यास घेऊन गेली. पत्नीच्या या कृत्यविरोधात पतीने पत्नीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवला. यागुन्ह्याविरोधात पत्नीने तेलंगणा उच्च न्यायालयात दाद मागितली.

हेही वाचा >>>पत्नी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते

तेलंगणा उच्च न्यायालयाने- १. पत्नीने मातृत्वाच्या नैसर्गिक भावनेतून अपत्याचा ताबा घेतला असे पत्नीचे म्हणणे आहे, २. ताब्याच्या न्यायालयीन आदेशाचा भंग झालाच असेल तर त्याविरोधात पतीने संबंधित कौटुंबीक न्यायालयात दाद मागणे आवश्यक आहे ,मात्र पतीने त्या ऐवजी पत्नीवर खोटे आरोप करुन गुन्हा दाखल केलेला आहे. ३. अपत्याचे जैविक आई-वडील हे दोघेही अपत्याचे पालनकर्ते असल्याचे स्पष्ट निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आशीष मुळे खटल्याच्या निकालात नोंदविलेले आहे. ४. प्रस्तुत प्रकरणात जैविक आईने अपत्याचा ताबा घेतलेला आहे ज्यायोगे अपत्य एका पालनकर्त्याकडून दुसर्‍या पालनकर्त्याकडे गेलेले आहे. ५. मुंबई उच्च न्यायालयाचा आशिष मुळे प्रकरणातील निकाल प्रस्तुत प्रकरणास चपखलपणे लागू पडतो आहे अशी निरीक्षणे नोंदविली आणि पतीने पत्नीविरोधात नोंदविलेल्या गुन्ह्याच्या कारवाईवर मनाई हुकूम (स्टे ऑर्डर) दिला.

सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे अपत्याचा सामावेश असलेली वैवाहिक वादाची प्रकरणे अधिकच क्लिष्ट असतात. कोणत्याही अपत्याचे जैविक आई-वडील हे दोघेही त्याचे पालनकर्ते आहेत हे स्थापित कायदेशीर तत्त्व आहे आणि त्यास आशीष मुळे खट्ल्याच्या निकालाने भक्कमता आलेली आहे हे याच निकालाच्या आधारे पतीने पत्नीवर अपहरणाचा गुन्हा दाखल करून पत्नीला त्रास द्यायचा प्रयत्न हाणून पाडणारा म्हणून तेलंगाणा उच्च न्यायालयाचा हा निकाल महत्त्वाचा आणि कौतुकास्पद आहे.  

हेही वाचा >>>विभक्त राहणारे वडील मुलीच्या पासपोर्टला हरकत घेऊ शकत नाहीत

एकमेकांना एकमेकांच्या काही गोष्टी नाही पटल्या आणि त्यातून वैवाहिक वाद निर्माण झाले तर वयस्क आणि परिपक्व लोकांप्रमाणे त्याचे निराकारण करावे अशी एक साधारण अपेक्षा असते. मात्र बहुतांश प्रकरणांत ही आशा फलद्रुप होत नाही. बहुतांश वैवाहिक प्रकरणे ही केवळ वादांपुरती मर्यादित राहत नाहीत तर त्यात बदल्याची भावना कधी येते हे पतीपत्नीलादेखिल कळत नाही. मला त्रास झाला तरी चालेल, पण समोरच्यालासुद्धा त्रास व्हायला हवा अशी अतार्किक भूमिका अनेक प्रकरणांमध्ये घेतली जाते. मुख्य म्हणजे यात फारसा लिंगभेद नाहीए. म्हणजे अशा भूमिका पतीकडूनच घेतल्या जातात किंवा पत्नीकडूनच घेतल्या जातात असे नाही. अतार्किक भूमिका घेण्याचे पती पत्नीचे प्रमाण अंदाजे समसमानच असावे.

अभा अतार्किक भूमिकांना पती पत्नीच्या निर्णयप्रक्रियांमध्ये सामील मित्रमंडळी किंवा कौटुंबिक सदस्य हेसुद्धा काहीवेळेस कारणीभूत असतात. वैवाहिक वाद निर्माण झाला तरीसुद्धा तो सन्मानपूर्वक मिटवता येतो किंवा सन्मानपूर्वक विभक्त होता येते ते शक्य आहे हे पतीपत्नींना सांगणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chatura a mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision amy