सुचित्रा प्रभुणे
नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटिल स्वरूप धारण करीत आहे, त्यामुळे घरातील इतर मंडळींपेक्षाही स्वत:च्या आरोग्याबाबत स्वत:च स्त्रीने जागरूक होणं गरजेचे आहे. नोकरीच्या ठिकाणचं काम महत्त्वाचं आहेच, पण आापलं आरोग्य त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे.
अलीकडेच पुणे येथील एका एमएनसी कंपनीत काम करणाऱ्या ॲना पेरिअल या सनदी लेखाकारचा कामाच्या अति ताणामुळे मृत्यू झाला नि पुन्हा एकदा कार्यालयीन स्त्रियांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचा ऊहापोह होऊ लागला. मुळातच कुटुंब आणि कार्यालयीन काम या दोन्हींची जबाबदारी स्त्रीवर असली, तरीही अलीकडच्या काळात बायका सपोर्ट सिस्टीम जसे धुणे-भांडीसाठी बाई, स्वयंपाकासाठी बाई वगैरेंचा आधार ‘विदाऊट गिल्ट’ घेत आहेत. किंबहुना हा आधार ही काळाची जास्त गरज बनत चालली आहे असे म्हटल्यास ते वावगं ठरू नये.
पण तरीही नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याबाबत गंभीर समस्या निर्माण होताना दिसत आहेत. या समस्या निर्माण होण्यामागची नेमकी कारणे लक्षात घेतली तर असे दिसून येते की, एक तर कामाचे स्वरूप बैठे असते किंवा उभे राहून तरी असते. त्यातच घरून रोज भाजी-पोळीचा डबा जरी बरोबर आणत असला, तरी सकाळच्या गडबडीत नाश्ता करायला वेळ न मिळणं, मग कधी ट्रेनमध्ये उभ्या उभ्या खाऊन घेणं किंवा कार्यालयाच्या आसपास असलेल्या ठिकाणाहून ते मागविणं… तर कधी भूक मारण्यासाठी किंवा ताण सहन करण्यासाठी जरुरीपेक्षा जास्त चहा पिणं अशा सवयी लागतात.
हेही वाचा >>>मुकेश अंबानींच्या थोरल्या सूनेची कोण आहे स्टायलिश? नातं आहे खूपच खास, जाणून घ्या….
हे सारं करीत असताना आपल्या शरीरात किती पौष्टिक घटक जात आहेत, याचा फारसा विचार केलेला नसतो. शिवाय व्यायाम, योगा किंवा इतर कोणत्याही प्रकारचे व्यायाम करण्यासाठी वेळ आणि ऊर्जा या दोन्ही गोष्टी नसतात. या सर्वांच्या जोडीला पुरेशी झोप न मिळणं. या सर्व चुकीच्या जीवनशैलीमुळे पाठदुखी, मधुमेह, हदयविकार, नैराश्य, डोळ्यांचे विकार, मासिक पाळीच्या समस्या किंवा मेनापॉझच्या समस्या अशा तऱ्हतऱ्हेच्या समस्या निर्माण होतात.
विशेषत: मासिक पाळीच्या दिवसांत स्त्रियांची अवस्था फारच बिकट असते. चिडचिड होणं, निराश वाटणं, उत्साह न वाटणं या शारीरिक आणि मानसिक समस्यांना समोरे जावे लागते. या कळात शरीराला एक प्रकारचा आराम हवा असतो. पण कामाच्या स्वरूपामुळे तोही मिळत नाही. दुसरे म्हणजे, पुरुष बॉस असेल तर या समस्या देखील नीटपणे मांडता येत नाही. त्यामुळे त्याचाही अनेकींवर नकळतपणे ताण येत असतो. बऱ्याचदा तर ‘स्त्रिया मासिक पाळीचे जरा अतिचकौतुक करतात’, असे टोमणेदेखील सहकाऱ्यांकडून ऐकून घ्यावे लागतात.
आणि जोपर्यंत गंभीर समस्या निर्माण होत नाही, तोपर्यंत स्त्रिया या आरोग्यविषयक बाबींकडे फारसे लक्षदेखील देत नाहीत. किंवा आपणच जर आराम करू लागलो तर घरच्यांचे कसे होईल, सर्वांचेच हाल होतील या विचारापायी त्या या समस्यांकडे दुर्लक्ष करतात किंवा आपल्याच मनाने काहीतरी पेनकिलरसारखी औषधे घेऊन तात्पुरता आराम मिळवितात. पण या सर्व गोष्टींचा घातक परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय, ही बाब त्या ध्यानातच घेत नाही.
यासंदर्भात डॉ. स्वाती काळे म्हणाल्या की, सर्व्हायकल, पीसीओ, कंबर आणि पोट सुटणे, पहिल्याच बाळाच्या गर्भ धारणेला उशीर होणे, हार्मोनल इमबॅलन्स आणि पाळी व मेनोपॉज या समस्यांनी त्रस्त असलेल्या स्त्री रुग्णाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आणि यात तरुणींपासून ते ५०-५५ वयोगटातील स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. कारण काम आणि घर या दोन्ही ठिकाणचा ताण स्त्रिया अधिक घेत असतात, त्यामुळे वयानुसार आणि कामाच्या स्वरूपानुसार या समस्या होणारच, ही खुणगाठ मनाशी बांधलेली असते. त्यामुळे काही झालं तर नंतर असा काहीसा दृष्टीकोन असतो. जर प्रत्येक स्त्रीने स्वत:चा मेनोपॉजचा कालावधी लक्षात घेऊन त्यानुसार त्या काळाच्या तीन वर्षे आगोदर पासून स्वत:च्या जीवनशैलीत तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आवश्यक ते बदल केल्यास- जसे योग्य आहार-विहार ध्यान-धारणा, व्यायाम नाहीतर नियमित सूर्य नमस्कार घातल्यास निश्चितच फरक दिसून येईल. दुसरे असे की, सकाळचे जेवण १० आणि संध्याकाळी ६ वाजता असा जरी बदल केल्यास निश्चितच खूप चांगला फरक दिसून येतो. फारफार तर संध्याकाळचे जेवण ८/८.३० पर्यंत करण्याचा प्रयत्न करावा. पण त्यापुढे जेवल्यास आरोग्याच्या अनेक तक्रारी निर्माण होतात.
यासंदर्भात महत्त्वाची बाब नमूद करताना त्यानी असंही सांगितलं की, एखादया समस्येवर डॉक्टरी सल्ल्यानुसार मात केली आणि ती समस्या आटोक्यात आली की स्त्रिया पुन्हा एकदा स्वत:कडे दुर्लक्ष करायला लागतात. आरोग्याच्या बाबतीत स्त्रियांनी ही धर-सोडवृत्ती सोडणं अपेक्षित आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
कार्यालयीन स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्यांकडे आता गंभीरतेने बघण्याची वेळ आली आहे. अनेकदा स्त्रिया आपल्या मासिक पाळीबाबत मौन बाळगातात. बॉसला या विषयी कसं सांगायचं, पुरुष सहकाऱ्याला काय कारण सांगायचं याचं मानसिक दडपण आपल्या मनात बाळगतात. पण तसं न करता मोकळेपणाने आपल्या बॉसला मासिकपाळीसंबंधी समस्यांविषयी मोकळेपणाने सांगा. म्हणजे तुमच्या मनावरील ताण कमी होईल. कारण त्याचा दुष्परिणाम तुमच्याच तब्येतीवर होईल हे लक्षात घ्या. फारवेळ बसून किंवा उभे राहून कशा स्वरूपाचे काम आहे, त्यामध्ये ब्रेक घेऊन कशा प्रकारे शरीराची हालचाल होईल, कामाच्या ठिकाणी जाणविणाऱ्या ताणाला ताण न घेता कशा तऱ्हेने हाताळावे याबाबतचे समुपदेशनआणि या जोडीला इतर लोकांबरोबर स्वत:चे आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे, ही बाब स्त्रियांमध्ये रुजविणं ही काळाची गरज होत चालली आहे. तेव्हा वेळीच सावध होणं गरजेचे आहे.