नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तुम्हीही सज्ज असालच. आपल्या प्रियजनांबरोबर सरत्या वर्षाला निरोप देण्याची आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्याची मजा काही औरच असते. त्यासाठी तुमचे प्लॅन्सही ठरले असतील. मोठ्या पार्टीज किंवा मित्र-मैत्रीणींबरोबर हँग आऊट, समुद्रकिनारी, हिल स्टेशनवर किंवा सोसायटीतच… नववर्ष स्वागताच्या जल्लोषासाठी कितीतरी ठिकाणं आहेत. पण तुम्ही जर कोणत्याही कारणाने या कशातही सहभागी होऊ शकत नसाल तरी काळजी करू नका. तुम्ही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एक मस्त पार्टी आयोजित करू शकता. या काही टिप्स लक्षात ठेवा म्हणजे तुम्हीही नवीन वर्षाचं स्वागत अगदी धम्माल पध्दतीने करू शकाल.
१. निमंत्रितांची यादी आणि थीम ठरवा-
तुमची मुलं लहान असतील, तुम्हाला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ऑफिस असेल किंवा अन्य काहीही कारण असेल तरी घरी छान छोटीशी पार्टी आयोजित करू शकता. अगदी तुमच्या आवाक्यात असतील इतकेच पाहुणे बोलवा. आता वेळ कमी असल्याने जास्त लोक बोलावल्यास आयोजनात गडबड होऊ शकते. पाहुण्यांची यादी तयार झाली की लगेचच त्यांना मेसेज करून निमंत्रण द्या. त्यांना यायला नक्की जमणार आहे ना, याची पोचपावती द्यायला सांगा. म्हणजे तुम्हाला नियोजन करताना नेमके किती लोक असतील याचा अंदाज येईल. तसंच सगळ्या पाहुण्यांसाठी तुम्हाला वेळ देता येईल. पार्टीसाठी एखादी छानशी थीम ठरवा. पण सगळ्यांना सहभागी होणं जमू शकेल अशी थीम ठरवा. टीनएजर, शाळकरी थीम, बॉलीवूड, डान्स, कलर थीम अशा सोप्या थीम्स ठेवल्यास सगळ्यांनाच आनंद घेता येईल.
हेही वाचा >>>स्त्री आरोग्य : नववर्षाचा संकल्प; फिट राहा!
२. जागेचे नियोजन-
तुमच्या घरातच पार्टी असेल तर त्यानुसार जागेचे नियोजन करा. हॉल कितपत मोठा आहे, येणारे लोक त्यात ॲडजस्ट होऊ शकतील की फर्निचर तात्पुरतं हलवावं लागेल याचा विचार करा. गच्ची किंवा टेरेसवर पार्टी करणार असाल तर तिथे पिण्याचं पाणी, खुर्च्या यांची व्यवस्था कशी करायची हेही पाहा. प्रत्येकाला पार्टी एन्जॉय करता यावी यासाठी एखादी रूम किंवा अगदी एखादा कोपरा पाहुण्यांच्या सामानासाठी राखीव ठेवा. म्हणजे त्यांचं सामान इकडेतिकडे पसरणार नाही. पार्टीच्या ठिकाणी छानसे लायटिंग करा. पण खूप जास्त झगमगाट करू नका. तुमचं महत्त्वाचं सामान योग्य ठिकाणी ठेवून द्या. घर स्वच्छ व नीटनेटके असणं महत्त्वाचं आहे. विशेषत: बाथरूम आणि टॉयलेट्स स्वच्छ ठेवा.
३. खाणे-पिणे
पार्टीमध्ये मेन्यू सगळ्यांत महत्त्वाचा आहे. ही नवीन वर्षाची पार्टी असल्याने सगळ्यांचा मूड जरा लाईट असेल, त्यामुळे मेन्यूही तसाच ठेवा. तुमच्या पार्टीला येणाऱ्या पाहुण्यांचा वयोगट लक्षात ठेवून मेन्यू ठरवा. स्टार्टर्स जास्त ठेवून मेन कोर्स थोडा हलक्या पदार्थांचा ठेवू शकता. पावभाजी, पुलाव किंवा चायनीज,पिझ्झा, बर्गर यांसारखे जंक पर्याय आहेतच, पण थोडेसे हेल्दी पर्याय ठेवता येतील का तेही बघा. जर तुम्हाला घरी स्वयंपाक करणं शक्य नसेल तर बाहेरून ऑर्डर करा. चाट काऊंटरचा पर्याय यासाठी चांगला आहे. त्याशिवाय जागा असेल तर लाईव्ह किचनमध्ये डोसा कॉर्नर, पावभाजी कॉर्नर असंही ठेवू शकता.मात्र ३१ डिसेंबर असल्याने ऐनवेळेस मेन्यू ठरवून ऐन वेळेस ऑर्डर देण्याच्या फंदात पडू नका. आधीच पदार्थ ठरवून ऑर्डर करून ठेवा. सगळ्यांना गप्पा मारता मारता खाता येतील, स्वत:च्या हाताने घेता येतील असे पदार्थ ठेवा. खूप जास्त पदार्थ ठेवू नका. कोल्ड ड्रिंक्स ठेवणार असाल तर त्याची आधीपासून सोय करा. ड्रिंक्स घेणारे किंवा पिणारे असतील तर शक्यतो मुलांसमोर त्याचं प्रदर्शन मांडू नका. कोणीही जास्त ड्रिंक्स घेणार नाहीत याकडे नीट लक्ष द्या. कोणाला कुठली ॲलर्जी आहे का हे विचारून ठेवा.
हेही वाचा >>>निसर्गलिपी : कमी खर्चात, जागेत सजणारं कोकोडेमा
४. पार्टी गेम्स
पार्टी गेम्सशिवाय नवीन वर्षांच्या पार्टीत रंगत नाही.पार्टीत येणाऱ्या पाहुण्यांचं वय लक्षात घेऊन पार्टी गेम्स निवडा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण सहभागी होतील असे सोपे गेम्स निवडा. गेसिंग नेम्स (Guessing names), संगीत खुर्ची, वन मिनिट टास्क असे काही गेम्स आहेत. त्याशिवाय मोठ्यांसाठी नवीन वर्षात कोणी काय संकल्प केले असू शकतात हे ओळखण्यासाठी Guessing The Resolutions अशासारखे गेम्स ठरवू शकता. त्याशिवाय गेल्या वर्षभरात काय झालं त्या घटनांचा एक मस्त रिप्ले करू शकता. सगळ्यांना आवडेल असा छानसा चित्रपट बघू शकता. किंवा तुमच्यातल्याच काही कलाकारांना त्यांच्या कला सादर करण्याची संधी देऊन छानसा कार्यक्रमही करू शकता.
५. संगीत-
म्युझिक म्हणजेच संगीत ही तर नवीन वर्षाच्या पार्टीची जान असते. सगळ्यांनाच थिरकायला लावणाऱ्या म्युझिकमुळे पार्टीमधली रंगत आणखी वाढते. डान्स करता येतील अशी मस्त गाणी आधीच निवडून त्याची प्लेलिस्ट बनवून ठेवा. महत्त्वाचं म्हणजे म्युझिक सिस्टीम योग्य स्थितीत आहे ना हे तपासून ठेवा. पार्टीत गाण्यांचा आवाज मोठा असला तरी त्यामुळे आजूबाजूच्यांना त्रास होणार नाही याचीही काळजी घ्या.
६. सुरक्षा आणि इतर गोष्टी
तुमच्या घरी पार्टी करत असाल तर येणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेची काळजी ही तुमची जबाबदारी आहे. ही पार्टी अर्थातच उशिरापर्यंत सुरू असते, त्यामुळे कोण त्यांच्या घरी कसे जाणार याची आधीच विचारपूस करून घ्या. खूप उशीर झाला किंवा जास्त लांब अंतरावर राहणारे लोक असतील तर ते तुमच्याकडेच राहणार आहेत का हे विचारून त्यानुसार सोय करून घ्या.
तेव्हा आता नवीन वर्षाचं स्वागत तुमच्याच घरात… तुमच्या खास लोकांबरोबर… तुम्हाला हवी तशी पार्टी करून जल्लोषात करा!