घराभोवती छोटीशी बाग करणं, तिची देखभाल करणं ही अतीव आनंदाची गोष्ट आहे. गावातील घरांना परसदारी, अंगण असतं तर शहरात गच्ची, डेक किंवा मोठ्या बाल्कनी असतात. हेही नसेल तेथे चक्क स्वयंपाक घराची खिडकी किंवा एखाद्या छोट्या कठड्यावर ही बाग फुललेली असते. झाडांची आवड असणारी प्रत्येक व्यक्ती आपलं हिरवं नातं असं प्राणपणाने जपत असते. कोणाला हा अट्टहास वाटतो तर कोणाला वाटतं, किती ती हौस ! घरातल्या कुंडीत लावलेल्या आंब्याला येऊन येऊन असे कितीसे आंबे येणार ?
कुणाला तर हे आजचे दिखाऊ छंद वाटतात. खऱ्या निसर्गप्रेमी व्यक्तीला मात्र त्यातून लाख मोलाचा आनंद मिळत असतो.
आमच्या घराच्या वरती असलेल्या गच्चीवर मी जेव्हा बाग लावली त्यावेळी अशाच प्रतिक्रिया मलाही ऐकाव्या लागल्या. त्याकडे दुर्लक्ष करत मी काम सुरूच ठेवलं. त्या शहरी बागेने मला इतके आनंदाचे क्षण दिले की वाटलं, हा छंद जर जडला नसता तर केवढ्या आनंदाला आपण मुकलो असतो.
या बागेत लावलेलं प्रत्येक छोटं मोठं झाड मला महत्त्वाचं होतं. ऋतूबदल झाला की त्याची जाणीव बागेत होणाऱ्या बदलांमुळे अधोरेखित व्हायची. सभोवतालच्या वातावरणात होतं जाणारे प्रासंगिक, अल्पकाळाचे बदलही बागेमुळेच कळून यायचे. यातच नकळतपणे निरीक्षण करण्याची क्षमता विकसित होत गेली. एक स्वतःचं असं वेगळं सजीव जग भोवताली तयार होत गेलं. या सगळ्या जमेच्या बाजू बघितल्या की वाटतं खरंच प्रत्येकाने अगदी जमेल तितकं, जमेल तसं असं एखादं जग आपल्याभोवती निर्माण करावं.
हेही वाचा >>>निसर्गलिपी : बहराचा उत्सव
बागेला पाणी घालणं हे खरं तर एक वेळखाऊ काम. बाग छोटी असेल तर मग फारसा त्रास वाटत नाही, पण जर ती बऱ्यापैकी मोठी किंवा जास्त कुंड्या असलेली असेल तर मग नक्कीच बराच वेळ लागतो. मी लावलेल्या बागेत नेमकं हेच होत होतं. पाणी द्यायला कमीत कमी पाऊण तास लागत असे. एवढा वेळ अगदी नियमाने काढावा लागे. त्याला पर्याय नसे, पण त्या लागणाऱ्या वेळामुळेच अनेक आनंदाचे क्षण मला टिपता आले.
पावसाळ्यात आवश्यक तेव्हा तर हिवाळ्यात साधारण उन हलकं चढू लागलं की मी पाणी देत असे. उन्हाळ्यात मात्र अगदी सकाळी आणि मग संध्याकाळी असं दोनवेळा पाणी द्यावे लागे. झाडांना पाणी देताना ऋतूबदलानुसार आणि त्यांच्या गरजे प्रमाणे पाण्याचे वेळापत्रक सांभाळावे लागते. योग्यवेळी आणि योग्य प्रमाणात पाणी मिळालं तर झाडांच्या वाढीचं अर्ध काम होऊन जातं. यानंतर उरतं ते खत आणि किटकनाशकांचा योग्य वापर करण्याचं तंत्र.
हेही वाचा >>>आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
मी हे पाण्याचं तंत्र कसोशीने सांभाळत होते. वसंत ऋतू सुरू झाला होता. हवेतला गारवा कमी होऊन, उन्हाचा चटका हळूहळू वाढू लागला होता. आता दिवसातून दोन वेळा पाणी देणं आवश्यक होतं.त्यानुसार अगदी सकाळी मी बागेत पोहोचले. एकाएका झाडाला निगुतीने पाणी देत होते. हिवाळ्यात लावलेले कोबी, फ्लाॅवरचे गड्डे अजूनही वाढत होते. कोथिंबीर बरीचशी काढून झाली होती. मटाराच्या वेलींचा शेंगांचा बहर ओसरला होता. काही शेंगा बियांसाठी राखल्या होत्या, पावटा, फरसबीच्या वेलींना अजूनही फुलं येतं होती. घोसाळी आपल्या प्रजोत्पत्तीच्या कमात व्यस्त होती. पालक आणि मेथीचा तिसरा, चौथा बहर संपला होता. पिटूनिया, डायांधथस यांची फुलं ओसरत आली होती. झेंडूच्या बीज निर्मितीच काम सुरू होतं. कमळाची हिवाळी झोप संपून उन्हाच्या प्रतिक्षेत असलेली त्यांची इवली पानं आता मोठी होऊ लागली होती. बाग एका ऋतूतील आपली कामं उरकून नवीन ऋतूच्या स्वागतासाठी सज्ज होती. प्रत्येक झाडाला पाणी घालताना मी हे छोटे छोटे बदल टिपत होते. पाणी देऊन पुढील झाडाकडे वळत होते. शांतपणे माझं काम चालू होतं एवढ्यात पंखांची फडफड ऐकू आली मागे वळून बघितलं तर काळा कोतवाल आपली दुभंगलेली शेपटी मिरवत चक्कर मारत होता. आपलं किड्यांचं खाद्य शोधण्यात तो अगदी गढून गेला होता. त्याच्या या अगोचरपणामुळे छोटे सनबर्ड मात्र अगदी धास्तावले होते. कोबीच्या गड्ड्यांमधील उमललेल्या पानांमध्ये साठलेल्या पाण्यात ते आंघोळ करत होते. एका एका गड्ड्यात एक एक सनबर्ड असे ते निवांत डुंबत होते. काही चिमण्या कमळांच्या तळ्यांमधे आंघोळी उरकून घेत होत्या. मुंग्यांची आणि डोंगळ्यांची एक मोठी रांग एका ठिकाणाहून दुसरीकडे निघाली होती.
सकाळच्या वेळी बागेत सुरू असलेली ही लगबग मला बरंच काही शिकवून जात होती. आपल्या भोवतीच्या जगालाही त्यांचं असं वेळापत्रक असतं, त्यांची अशी कामं असतात. आपणच व्यस्त असतो असं नाही तर ते ही गुंतलेले असतात,त्यांची आयुष्य सावरण्यास. मग त्यांच्या कामात ढवळाढवळ न करता आपलं काम कसं करावं याचा एक वेगळा धडा ती सकाळ मला शिकवून गेली. अशीच काही निरीक्षणं आणि काही सुंदर अनुभवांबद्दल जाणून घेऊया पुढील लेखात.
mythreye.kjkelkar@gmail.com