आपली बाग तयार करताना आपण ऋतूनुसार आखणी करतोच. फुलझाडांबरोबर सदैव हिरवीगार राहणारी, पण फुलं न येणारी अशी काही झाडंही लावली तर बागेत सदोदित एक चैतन्य खेळतं राहील. जेव्हा अगदी कमी फुलं असतील त्यावेळीही बाग हिरवीगार,आनंदी आणि तजेलदार राखण्याचं काम ही हिरवी झाडं करतील. यात नेचे वर्गीय वनस्पतींचा फारच चांगला उपयोग होतो.
नेच्याची झाडं ही जंगलात जमिनीलगत वाढत असतात. उष्णकाळात एक विशिष्ट ओलावा, थंडावा टिकवून ठेवण्याचं काम ती करतात. वाळलेल्या पानांच्या ढिगावर, मोठ्ठाल्या दगडांच्या कपारीत, झाडांच्या बुंध्याशी नेच्याची दाटी असते. तो तेवढा परिसर मग अगदी तजेलदार दिसतो. नेमके हेच सूत्र पकडून आपल्या बागेत आपण असं वातावरण निर्माण करत फर्न लावली तर बागेचं सौंदर्य शतपटीनं वाढतं. नेहमी हिरवीगार दिसणारी, लांब देठाची, झुपक्याची रचना असलेली अशी झाडं निवडावीत- ज्यामुळे बागेला एक भरीवपणा येईल.
फर्न प्रथमच लावणार असू तर वाढीच्या दृष्टीने सोप्या जाती निवडाव्यात. जेणेकरून फार कष्ट न घेता अपेक्षित परिणाम साधता येईल. इतर इनडोअर झाडांच्या तुलनेत फर्न ही वाढवायला सोपी असतात. ही अपुष्प गटात मोडतात, त्यामुळे त्यांना फुलं येतं नाहीत. फुलं नाहीत तर अर्थातच फळांची निर्मिती होत नाही. फळांऐवजी यांच्या पानांवर सुरेख काळे ठिपके दिसतात. पानांच्या मागे ओळीने रेखाटलेले असे हे ठिपके म्हणजे स्पोरेन्जिया किंवा बिजाणूधान्या असतात. यामधे बिजाणू तयार होतात. हे बिजाणू रूजून नवीन रोप तयार होते. अर्थातच या सगळ्याला जास्त कालावधी लागतो. पण नवीन लावलेल्या रोपांच्या खोडांना आलेले फुटवे किंवा सकर्स जर आपण वेगळी केली तर त्यापासून नवीन रोपे तयार करता येतील.
थोडक्यात काय तर, पाणथळ जागी, विहिरी काठी उगवलेलं एखादं रोपं जरी मिळवलं तरी आपण त्यापासून हवी तेवढी रोपं तयार करू शकतो. फर्नमध्ये फिकट हिरवा, गडद हिरवा असे रंग आढळतात. काही जातींमध्ये चक्क लालसर, नारींगी छटा, चांदीसारखा चमकदार असे मनोहारी रंग आढळतात. रंगांचा मेळ साधत जर यांची लागवड केली तर बाग फारच सुंदर दिसते. शिवाय प्रत्येक पानावर उमटणारी बिजाणूधानीची रेघ झाडांच्या सोंदर्यात भरच घालते.
फर्नसाठी माती तयार करणं फार सोपं असतं. कोकोचिपस्, नारळाच्या काथ्या, कोळशाचे तुकडे, कोकोपीट, थोडीशी माती, बारीक दगड असे उपलब्ध होतील ते घटक मिळवून त्याने कुंडी भरावी. शिंकाळ्यात म्हणजे हँगिंग बास्केटमध्ये लावणार असाल तर मॉस वापरावं. मॉस, कोकोपीट, कोकोचीप हे घटक पाणी धरून ठेवतील, तर कोळसा आणि बारीक दगड हे अतिरीक्त पाण्याचा निचरा करून झाडाला रोगाचा संसर्ग होऊ देणार नाहीत. एकंदर जंगलातील सावलीच्या जागांसारखं वातावरण निर्माण केलं तर फर्न आनंदाने वाढतात.
उन्हाळ्यात वाळलेल्या पानांचा कचरा कुंडीतील मातीवर आच्छादन म्हणून वापरला तर ओलावा टिकून राहतो आणि वारंवार पाणी द्यावे लागत नाही. या कृतीला मलचिंग करणं म्हणतात. जरा कल्पकता दाखवत आपण नेच्याच्या जाती निवडल्या तर बाग विलक्षण सुंदर दिसते.
शहामृग फर्न हा प्रकार फारच सुंदर दिसतो. पक्षाच्या मानेसारखी उंचावलेली यांची पाने फारच वैशिष्ट्यपूर्ण असतात. नवशिक्या लोकांसाठी बटण फर्न फारच उपयोगी पडते.याची फारशी देखभाल करावी लागत नाही. छोट्या कुंडीपासून कुठेही हे सहज वाढवता येते. वेस्टर्न स्वार्ड फर्नची पानं एखाद्या तलवारी सारखी दिसतात. गडद हिरवी, दणकट अशी ही मोठी पानं पुष्परचना करताना फार उपयोगी पडतात. खूप वेळ ताजी, टवटवीत राहतात. लेडी फर्न ही जात फार सुरेख दिसते. जपानी फर्नची पानं तर चांदीसारखी चमकदार दिसतात. फुलं, पानांचा वापर करून कापडावर ठसे उपमटवले जातात त्या कलेत सिल्व्हर फर्नचा फार छान उपयोग होतो.
रीबन फर्न ही रिबीनी सारखी तर क्रिसमस फर्न ही छान झालरी सारखी दिसतात. स्टेग हॉर्न फर्न तर अतिशय देखणे दिसते. सशाच्या कानासारखी याची पानं असतात. एक आड एक रचना असलेली पानं एखाद्या चेंडूचा आकार धारण करतात. मेडन हेअर फर्नच्या काही जातींमध्ये सुरेख लालसर, नारींगी छटा आढळतात.
शतावरीच्या पानासारखी रचना असलेलं अस्पारागस फर्न फारच मोहक दिसतं. याच प्रकारात मोडणाऱ्या फॉक्स टेल फर्नला कोल्ह्याच्या शेपटीसारखी पानं येतात. रॅबिट फुट नावाचं फर्नसुद्धा मोठं वैशिष्ट्यपूर्ण असतं. याची मुळं काहीशी केसाळ आणि मखमली असतात. त्यांचा तपकीरी रंग झाडाचं सौंदर्य द्विगुणित करतो. नेचाच्या अशा निरनिराळ्या जाती निवडून जर कल्पकतेने त्या आपल्या बागेत वाढवल्या तर बाग अधिकच खुलून दिसेल.
mythreye.kjkelkar@gmail.com