आजवर आपल्या देशातील अनेक महिलांनी विविध क्षेत्रात आपलं वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यात आता अजून एक नाव जोडलं गेलं आहे, ते नाव म्हणजे श्रिया लोहिया. होय, श्रिया लोहिया ही भारतातील पहिली महिला फॉर्म्युला ४ (F4) रेसर बनली आहे.
हिमाचलप्रदेशमधील सुंदर नगर शहरामध्ये जन्म झालेली श्रियानं लहान वयातच म्हणजे अवघ्या ९ व्या वर्षीच रेसिंगच्या दुनियेत आपलं पहिलं पाऊल ठेवलं. श्रिया लहानपणी महाराष्ट्रात राहायला असताना पाचगणी येथे कौटुंबिक सहलीसाठी गेली होती. तिकडे लहान मुलांसाठी गो- कार्ट वर ड्राईव करताना तिनं जो अनुभव घेतला तेव्हाच तिनं मनाशी पक्कं केलं की ती यामध्येच करिअर करणार. आणि तिनं तेव्हाच आईवडिलांना सांगितलं की मला मोठं होऊन रेसिंग ड्रायव्हर बनायचं आहे. तिच्या या स्वप्नपूर्तीसाठी आईवडील वंदना आणि रितेश या दोघांनी पूर्णपणे पाठिंबा दिला.
श्रियाचे वडील रितेश म्हणतात की, त्याला नेहमीच साहसी खेळांबद्दल रुची आहे. त्यामुळे श्रियानं जेव्हा रेसिंगमध्ये रुची दाखवली तेव्हा आम्ही एक पालक म्हणून तिच्यासाठी जे जे शक्य असेल ते ते सर्व करण्याचं ठरवलं.
सुरुवातीला श्रियाच्या वडिलांनी पुण्यात गो कार्टिंगचं प्रशिक्षण केंद्र शोधायला सुरुवात केली तेव्हा त्यांना समजलं की कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये अत्याधुनिक प्रशिक्षित एक प्रशिक्षण केंद्र आहे. मग त्यांनी श्रियाचं बंगलोर येथे प्रशिक्षण सुरू झालं. २०१८ मध्ये केवळ वयाच्या ९ व्या वर्षी श्रियानं प्रशिक्षणाला सुरुवात केली.
कार्टिंगची प्रशिक्षण पद्धत ही इतर खेळांपेक्षा वेगळी असते. ती म्हणते की, कोणत्याही रेसिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेत असताना तुम्ही कितीही प्रशिक्षित असला तरी दोन-तीन दिवस आधी सराव शिबीरमध्ये भाग घ्यावा लागतो.
श्रियानं २०१८मध्ये भारतात आयोजित केलेल्या बिरेल आर्टसोबत रोटॅक्स मॅक्स इंडिया कार्टिंग चॅम्पियनशिपमधून तिनं पदार्पण केलं आणि त्या स्पर्धेत तिनं चौथं स्थान पटकावलं. चौथं स्थान प्राप्त झाल्यावरही नाराज न होता आपला सराव पुढे चालूच ठेवला. अखेर चार वर्षांच्या अथक मेहनतीनंतर फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (FMSCI) च्या मोटोस्पोर्ट्स स्पर्धेमध्ये उत्कृष्ट महिला पुरस्कार पटकावला.
श्रियाचे वडील रितेश म्हणतात की, मोटरस्पोर्ट्स एक खर्चिक खेळ आहे. प्रत्येक चॅम्पियनशिपचा खर्च जवळपास ५ ते ७ लाख रुपये आहे. कधीकधी अडचणी येतात, पण आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तेवढे सक्षम आहोत याचा अभिमानदेखील त्यांना आहे. तसंच श्रिया जसजश्या स्पर्धा जिंकत गेली तसतसं तिला स्पर्धेसाठी स्पॉन्सरदेखिल मिळू लागले आहेत.
श्रियानं आतापर्यंत १२० हून अधिक रेस पूर्ण केल्या असून आठ पुरस्कारदेखील आपल्या नावावर केले आहेत. ती सांगते, ‘‘हा प्रवास दिसतो तितका सोपा अजिबात नाही. इतर क्षेत्रांप्रमाणे यामध्येदेखील खूप आव्हाने आहेत. जेव्हा मी एखाद्या पुरुष स्पर्धकाला मागे टाकते, त्यांना क्रॉस करून पुढे जाते तेव्हा ते माझ्यावर खूप चिडतात, माझा राग- राग करतात. कारण एका स्त्रीकडून हरणं किंवा एका स्त्रीनं आपल्या मागे टाकणं हे त्यांना पचनी पडत नाही. त्यामुळे कधीकधी ते ट्रॅकवर आक्रमकपणे वागत. तर कधीकधी माझ्या ट्रॅकमध्ये अडचणी निर्माण करून, ट्रॅकवरील अनुभव खराब करून माझे मन खच्ची करण्याचे प्रयत्न करतात.’’
श्रिया रेसिंग ट्रॅकवर आपलं वर्चस्व गाजवत तर आहेच, पण होम स्कूलिंग द्वारे तिनं तिचं शिक्षणदेखिल सुरू ठेवलं आहे. खेळासोबत शिक्षणही जरुरी असल्याने तिच्या पालकांनी होम स्कूलिंगचा पर्याय निवडला आहे. श्रियानं आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळवले आहेत. २०२२ मध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. या पुरस्कारामुळे तिचा आत्मविश्वास वाढला आहे.
श्रिया पुढे म्हणते की, भारतात मोटरस्पोर्टला पाहिजे तितकी प्रसिद्धी किंवा व्यापक मान्यता नाहीये. पंतप्रधानांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार हा एक मोटरस्पोर्टला चालना मिळण्याकडे व्यापक स्वरुप मिळण्याकडे एक मोठे पाऊल आहे. यामुळे आम्हाला विश्वास मिळाला की आमच्या प्रयत्नांकडे सरकारचे लक्ष आहे. आणि ही घोडदौड अशीच चालू ठेवून भविष्यात फॉर्म्युला वन (F1) चे जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचं माझं स्वप्न आहे. त्यासाठी मी दिवसरात्र मेहनत घेण्याची माझी तयारी आहे. जर तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुमच्या स्वप्नाआड येणारी सर्व संकटं आणि पिढीजात आलेली बंधनं, परंपरा यांना छेद देत तुम्हाला तुमचं स्वप्न साकार करावं लागेल. पुढे जेव्हा तुम्ही तुमचं सर्वस्व पणाला लावून एखाद्या क्षेत्रात नाव कमवता तेव्हा तुमची प्रतिभाच टीकाकारांचे तोंड बंद करते.