वैवाहिकवादामुळे उद्भवणार्या अनेकानेक समस्यांपैकी अपत्य आणि त्याचा ताबा ही एक महत्त्वाची समस्या. असे अपत्य जर अगदी तान्हे असेल तर ही समस्या अजूनच क्लिष्ट बनते. अशाच एका तान्ह्या अपत्याच्या ताब्याचा प्रश्न केरळ उच्च न्यायालयासमोर उद्भवला होता.
या प्रकरणात पती-पत्नीतील वादांमुळे पत्नी आपल्या तान्ह्या अपत्यासह माहेरी निघून गेली होती. पतीने पत्नी निघून गेल्याबद्दल पोलीस तक्रार दाखल केली. कालांतराने पत्नी परपुरुषासोबत राहायला लागल्याचे कळल्यावर पतीने पुन्हा पोलीसात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या सुनावणीकरता पत्नीस न्यायालयात हजर केले असता, पत्नी सज्ञान असल्याचे निष्पन्न झाल्याने न्यायालयाने तिची मुक्तता केली, मात्र अपत्याचा ताबा बालकल्याण समितीकडे दिला. कालांतराने बालकल्याण समितीने अपत्याचा ताबा पतीस दिला. त्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली.
हेही वाचा >>>गर्भधारणा लाभ कायदा हा नोकरीतील कंत्राटापेक्षा वरचढच!
उच्च न्यायालयाने- १. तान्हे अपत्य स्तनपान करत असल्याचे याचिकाकर्तीने लक्षात आणून दिल्यावर पोलीस अधिकार्यांच्या उपस्थितीत स्तनपान करण्याकरता दररोज अर्धा तास भेटण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिली, २. बालकल्याण समीतीने पुरेसा तपास आणि शहानिशा न करता या प्रकरणात मुलाच्या ताब्याचे आदेश दिले आहेत. ३. जर एखाद्या अपत्याचे दोन्ही पालक अपत्याची देखभाल करण्यास असमर्थ असतील तर आणि तरच बालकल्याण समितीची भूमिका सुरू होते. ४. बालकल्याण समितीने केवळ आणि केवळ अपत्याच्या भल्याचा विचार करणे अपेक्षित आहे, पत्नी परपुरुषासोबर राहते किंवा नाही हा बालकल्याण समितीच्या अखत्यारीतला विषय नाही, आणि त्या आधारे कोणताही निकाल करणे किंवा त्याने निकाल प्रभावीत होणे अपेक्षित नाही. ५. इतरांच्या दृष्टीने एखाद्या महिलेचे कृत्य अनैतिक असले म्हणून ती वाईट आई ठरत नाही. ६. या प्रकरणातील अपत्य हे स्तनपान करते आहे हा मुद्दाच लक्षात घेण्यात आला नाही हे आश्चर्यकारक आहे. ७. इतक्या तान्ह्या अपत्यास आणि आईस विभक्त करणे म्हणजे आईचा आणि अपत्याचा स्तनपान करायचा हक्कच नाकारल्या सारखे आहे. ८. तान्ह्या बाळांकरता स्तनपान अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यातील पोषणावरच त्यांचे भविष्यातील आरोग्य अवलंबून असते असे आता आधुनिक वैद्यकशास्त्रानेदेखिल मान्य केलेले आहे. ९. बालकल्याण समितीच्या आदेशामुळे तान्ह्या मुलाची आणि आईची गेल्या एक महिन्यापासून ताटातूट झालेली आहे हे वेदनादयक आहे, अशी महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली. बालकल्याण समितीचा आदेश रद्द केला आणि अपत्याचा ताबा आईकडे देण्याचा आदेश केला.
हेही वाचा >>>‘एअरप्लेन मोड’मधून वेगळं जग पाहणाऱ्या शहनाझ हबीब
बालकल्याण समिती तान्ह्या बाळाचा ताबा नाकारू शकते हे या प्रकरणातील सर्वात त्रासदायक वास्तव म्हणावे लागेल. तान्हे बाळ आणि त्याची आई यांच्या स्तनपानाच्या हक्काबाबत जाहीर घोषणा करणारा म्हणून हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. बदलत्या काळात वैवाहिक नात्यात अनेकानेक समस्या आणि दुरावा निर्माण झाला आहे आणि त्या दुराव्याने जन्मास घातलेला अहंकार हा तान्ह्या बाळाची आणि आईची ताटातूट करायलासुद्धा उद्युक्त करू शकतो हे जळजळीत सामाजिक वास्तव या निकालाने समोर आले हे उत्तमच झाले.
पती-पत्नीमध्ये काहीही बेबनाव किंवा दुरावा किंवा भांडणे झाली तरी त्याची झळ अशा तान्ह्या अपत्याला लागू न देण्याची काळजी दोन्ही जोडीदारांनी घ्यायलाच हवी, अपत्याच्या दीर्घकालीन भल्याकरता ते महत्त्वाचे आहे. अशावेळेस अपत्याचे दीर्घकालीन हीत लक्षात घेऊन आपले वादविवाद आपला अहंकार बाजूला सारणे अधिक योग्य ठरते.